Friday, September 20, 2024
Home बॉलीवूड ‘या’ हॉलिवूड सिंगरकडे पाहून बप्पी दा झाले होते प्रभावित, विचार करायचे, ‘माझ्याकडेही पैसा असता…’

‘या’ हॉलिवूड सिंगरकडे पाहून बप्पी दा झाले होते प्रभावित, विचार करायचे, ‘माझ्याकडेही पैसा असता…’

बॉलिवूडमध्ये ‘डिस्को किंग’ अशी ओळख असणाऱ्या बप्पी लहरी यांची १६ फेब्रुवारी रोजी प्राणज्योत मालवली आहे. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. अनेक सुपरहिट गाणी दिलेल्या बप्पी यांनी खूप कष्ट करून त्यांचे नाव कमावले आहे. अगदी शून्यातून सुरुवात करून त्यांनी त्याचे करिअर घडवले आहे. जाणून घेऊया त्यांचा जीवनप्रवास.

जन्म
पश्चिम बंगालच्या जलापाईगुडी येथे २७ नोव्हेंबर, १९५२ रोजी बप्पी (bappi lahiri) यांचा जन्म झाला होता. कदाचित अनेकांना माहिती नसेल, परंतु बप्पी यांचे खरे नाव हे अलोकेश लहिरी असे आहे. त्यांना ‘बप्पी दा’ म्हणूनही ओळखले जाते.

करून दिली भारतीय चित्रपटसृष्टीतील संगीताला नव्या युगाची ओळख
बप्पी लहिरी (Bappi Lahiri) हे बॉलिवूडमधील असे प्रसिद्ध संगीतकार आणि गायक आहेत, ज्यांचा उल्लेख आल्यावर सोन्याचे दागिने जडलेल्या, मौजमजेत मग्न असलेल्या व्यक्तीचे चित्र डोळ्यापुढे आपसुकच येते. मात्र, बप्पी दा यांनीच भारतीय चित्रपट उद्योगाच्या संगीताला एका नव्या युगाची ओळख करून दिली होती. ज्या काळात लोक रोमान्सने भरलेली गाणी ऐकायचे, त्या काळात डिस्को डान्सची ओळख झाली. आपल्या नवीन आणि मस्त सूर आणि गाण्यांनी अनेक चित्रपटांना यश मिळवून देणाऱ्या बप्पी दा यांनी यश मिळवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. सोन्याच्या दागिन्यांमध्ये दिसणाऱ्या बप्पी यांच्याकडे सुरुवातीच्या काळात एक चैनही नव्हती. याविषयी जाणून घेण्यापूर्वी आपण त्यांच्या संगीताच्या प्रवासावर एक नजर टाकूया.

संगीत प्रवास
ज्या वयात मुलं बोलणे आणि चालणे शिकत असतात, त्या वयात बप्पी दा यांनी वाद्यांवर आपला हात साफ करण्यास सुरुवात केली होती. असे म्हणतात की, बप्पी दा यांनी अवघ्या वयाच्या तिसऱ्या वर्षी तबला वाजवण्यास सुरुवात केली होती. वयाच्या १७ व्या वर्षापर्यंत पोहोचता- पोहोचता त्यांनी आपल्या कारकिर्दीची दिशा ठरवली होती. बप्पी दा यांना घरातूनच संगीताचे बाळकडू मिळाले. मात्र, ते प्रसिद्ध संगीतकार, गायक एसडी बर्मन यांच्यामुळे संगीतक्षेत्रात आले. बप्पी दा यांना बर्मन यांची गाणी खूपच आवडायची. त्यामुळेच त्यांनी त्यांची गाणी खूप ऐकली. विशेष म्हणजे, ते दररोज नियमानुसार रियाज करायचे.

‘या’ चित्रपटातून मिळाली संधी
बप्पी दा यांनी सन १९७२ मध्ये ‘दादू’ या बंगाली चित्रपटाला संगीत दिले होते. यानंतर संगीतकार म्हणून त्यांचा पहिला चित्रपट हा सन १९७३ मध्ये आलेला ‘नन्हा शिकारी’ हा होता. बप्पी यांना खरी ओळख आणि रुपये हे ताहिर हुसैन यांच्या ‘जख्मी’ या चित्रपटातून मिळाले. सन १९७५ मध्ये आलेल्या या चित्रपटातही त्यांनी संगीत दिले आणि पार्श्वगायक म्हणून गायनही केले. यासाठी त्यांना चांगले मानधन मिळाले होते.

या चित्रपटाच्या यशानंतर बप्पी लहिरी यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. यासोबतच त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत एका नव्या युगाची सुरुवात करत प्रेक्षकांची संगीताची आवडच बदलून टाकली.

सोन्याची आवड
आता जाणून घेऊया बप्पी दा यांच्या सोन्याच्या आवडीबाबत… जस-जसे यश मिळत गेले, तस-तसे बप्पी दा यांच्या शरीरावरील सोन्याच्या दागिण्यांची संख्याही वाढतच गेली. हात आणि गळ्यात नेहमी भरपूर दागिने घालण्याचे शौकीन असलेल्या बप्पी दा यांच्यावर हॉलिवूड गायक एल्विस प्रेस्लीचा प्रभाव आहे.

माध्यमांना दिलेल्या एका मुलाखतीत बप्पी दा यांनी सांगितले होते की, “एल्विस प्रेस्ली सोन्याची चैन परिधान करत होते आणि ते मला खूप आवडायचे. त्यावेळी मी विचार करायचो की, जेव्हा मी यशस्वी व्यक्ती बनेल, तेव्हा स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण करेल. जेव्हा माझ्याकडे पैसे आले, तेव्हा मी इतके सोने परिधान करू शकलो. सोने माझ्यासाठी लकी आहे.”

बप्पी दा यांनी संगीत दिलेले चित्रपट
बप्पी दा यांनी ‘डिस्को डान्सर’, ‘डान्स- डान्स’, ‘शराबी’, ‘नमक हलाल’ यांसारख्या अनेक चित्रपटात शानदार संगीत देत सुपरहिट बनवले. बप्पी लहिरी हे केवळ प्रसिद्ध गायकच नाही, तर ते संगीत दिग्दर्शक, रेकॉर्डिंग प्रोड्युसरसोबतच अभिनेतेही आहेत. त्यांनी काही चित्रपटात अभिनेता म्हणूनही काम केले आहे.

हेही वाचा :
टीव्हीवरील साधी- भोळी सून टीना दत्ता बनलीय बोल्ड; टॉपलेस फोटो शेअर करत वाढवला इंटरनेटचा पारा
जाणून घ्या बप्पी लहिरी यांच्या आयुष्याशी संबंधित असलेल्या ‘या’ काही गोष्टी

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा