सिनेसृष्टीमधे अनेक कलाकार मधेच गायब होतात मात्र त्यांचे अजरामर सिनेमे आणि त्यांचा प्रभावी अभिनय सतत लोकांच्या स्मरणात राहतो. चित्रपटांमध्ये दिसणारे चेहरे जेव्हा दिसेनासे होतात तेव्हा लोकांना देखील त्या कलाकारांचा आणि त्यांच्या कलेचा विसर पडतो. मराठी इंडस्ट्रीमध्ये देखील असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी त्यांच्या अभिनयाने अनेक अविस्मरणीय सिनेमे दिले.
असाच एक मराठीमधील ८० च्या दशकात आलेला आणि तुफान गाजलेला सिनेमा म्हणजे ‘फटाकडी’. अशोक सर्फ, निळू फुले, विजू खोटे, श्रीराम लागू, रमेश देव, उषा किरण आणि सुषमा शिरोमणी आदी दमदार कलाकारांच्या अभिनयाने संपन्न असा हा ‘फटाकडी’ सिनेमा अतिशय हिट झाला. याच सिनेमातील मुख्य अभिनेत्री म्हणजे ‘सुषमा शिरोमणी’. आज या लेखातून याच सुषमा शिरोमणी यांच्याबद्दल जाणून घेऊया.
सुषमा शिरोमणी यांनी मराठीमध्ये अतिशय सुंदर चित्रपटांमध्ये काम केले. मात्र सध्या त्या चित्रपटांपासून दुरावल्या आहेत. सुषमा यांनी त्यांच्या चित्रपटांमधील त्यांनी साकारलेली ‘डॅशिंग’ अभिनेत्री त्याकाळी खूपच भाव खाऊन गेली. भिंगरी, फटाकडी, मोसंबी नारंगी, भन्नाट भानू, गुलछडी आदी चित्रपटांमध्ये त्यांनी स्त्रीची एक वेगळीच आणि दमदार बाजू पडद्यावर उतरवली जी प्रेक्षकांनाही खूपच भावली. अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या सुषमा यांनी स्वबळावर त्यांचे या ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये स्थान निर्माण केले. एक प्रतिभावान अभिनेत्री असण्यासोबतच त्या एक उत्कृष्ट दिग्दर्शिका, निर्माती आणि कथालेखिका देखील आहेत. त्यांनी त्यांच्या अनेक चित्रपटांमधून ग्रामीण भागातील महाराष्ट्राला पडद्यावर उतरवले. त्यांच्या चित्रपटांचे वैशिष्ट्य म्हणजे त्या सर्वच स्त्रीप्रधान सिनेमे करायच्या.
सुषमा शिरोमणी यांनी त्यांच्या चित्रपटांमध्ये अनेक हिंदी कलाकारांना मराठी चित्रपटांमध्ये आणले होते. अरुणा इराणी (भिंगरी), रेखा (फटाकडी), जितेंद्र (मोसंबी नारंगी), रती अग्निहोत्री, मौसमी चॅटर्जी (गुलछडी) हिंदी चित्रपटातील अनेक मोठमोठ्या कलाकारांना मराठी पडद्यावर आणण्याचे काम सुषमा शिरोमणी यांनी केले. त्यांना हिंदी चित्रपट निर्मिती संस्था ‘इम्पा’ या संघटेनेच्या अध्यक्ष होण्याचा मान मिळाला.
इम्पा या चित्रपट निर्मात्यांच्या संघटनेतही त्या अनेक वर्षे सक्रिय राहिल्या. ‘भन्नाट भानू’ हा चित्रपट केल्यानंतर त्यांनी चित्रपटांमधील त्यांचे काम थांबवले, मात्र काही काळाने त्यांनी मिथुन चक्रवर्ती, धर्मेद्र, नीलम, मीनाक्षी शेषाद्री अशा कलाकारांना घेऊन त्यांनी ‘प्यार का कर्ज’या हिंदी चित्रपटाचीही निर्मिती केली. सुषमा यांना त्यांच्या मनोरंजनविश्वातील योगदानासाठी विविध पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आले आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा –