Wednesday, July 3, 2024

‘कोंबडी पळाली’ या गाण्याने मिळाली खरी ओळख, असा होता मराठमोळ्या क्रांती रेडकरचा चित्रपट प्रवास

आपल्या ‘कोंबडी पळाली’ या गाण्यावर परफॉर्मन्स करून सर्वांना तिच्यासोबत ठुमके मारण्यासाठी प्रवृत्त करणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे क्रांती रेडकर. क्रांतीने चित्रपटसृष्टीमध्ये तिची एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. तिच्या अभिनयाने आणि डान्सने ती आज महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली आहे. गुरूवारी (17 ऑगस्ट) क्रांती तिचा 42 वा वाढदिवस साजरा करत आहे. चला तर जाणून घेऊया तिच्या आयुष्यातील काही खास गोष्टी.

क्रांतीचा जन्म 17 ऑगस्ट, 1982मध्ये मुंबई येथे झाला आहे. ती एक उत्कृष्ट डान्सर आणि परफॉर्मर आहे. तिने अनेक स्टेज शो केले आहे. तिला यानिमित्त अनेक पारितोषिकांनी गौरवण्यात आले आहे. तिचे शिक्षण मुंबईमधील रुईया कॉलेजमध्ये पूर्ण झाले आहे. सुरुवातीला तिला अभिनयात जास्त रस नव्हता, पण तिला काही कमर्शिअल नाटकाच्या ऑफर येऊ लागल्या त्यानंतर तिने हे सगळं गांभीर्याने घ्यायचे ठरवले. (kranti redkar celebrate her birthday lets know about her)

क्रांती रेडकरने 2000 साली ‘सून असावी अशी’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तिच्यासोबत अंकुश चौधरी होता. त्यानंतर तिने ‘किडनॅप गर्ल’ या चित्रपटात काम केले. त्यानंतर तिने अजय देवगणसोबत ‘गंगाजल’ या हिंदी चित्रपटात काम केले. परंतु तिच्या ‘कोंबडी पळाली’ या गाण्याने तिला सर्वत्र ओळख मिळाली. हे गाणे ‘जत्रा’ या चित्रपटातील आहे. या गाण्यात तिच्यासोबत भरत जाधवने परफॉर्मन्स दिला होता.

क्रांतीने ‘काकण’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करून दिग्दर्शनाच्या दुनियेत पहिले पाऊल टाकले. या चित्रपटात उर्मिला कोठारे आणि जितेंद्र जोशी हे मुख्य भूमिकेत होते. तिने तिच्या करिअरमध्ये ‘शिक्षणाच्या आयचा घो’, ‘फक्त लढ म्हणा’, ‘नो एन्ट्री पुढे धोका आहे’, ‘खो खो’, ‘मर्डर मिस्ट्री’, ‘करार’ यांसारख्या अनेक चित्रटपटात काम केले आहे.

क्रांती रेडकरच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बोलायचे झाल्यास, तिने 2017 मध्ये समीर वानखेडे यांच्याशी लग्न केले आहे. तिचे पती आयएसआर अधिकारी आहेत. त्या दोघांना दोन मुली आहेत. सध्या ती चित्रपटसृष्टीपासून दूर आहे, पण सोशल मीडियावर ती मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

अधिक वाचा- 
अभियांत्रिकी सोडून शरत सक्सेनाने मनोरंजन विश्वात पदार्पण, पण ‘या’ लोकप्रिय व्हिलनला आहे ही भीती
बॉलिवूडमधून केली होती कारकिर्दीची सुरुवात, पण दाक्षिणात्य चित्रपटांनी दिली खरी ओळख; वाचा निधी अग्रवालबद्दल न ऐकलेल्या गोष्टी

हे देखील वाचा