Saturday, July 6, 2024

‘राजा हिंदुस्तानी’ मधील अभिनेता आहे पतौडी घराण्याचा जावई; बालकलाकार म्हणून कमवलंय बरंच नाव!

ही त्या कलाकाराची कहाणी आहे, ज्याने बालपणीच आपल्या अभिनयाची छाप सोडायला सुरूवात केली होती. त्याने आपल्या अभिनयाने सर्वांना खूप हसवले आणि खूप रडवलेही. आज तो बॉलिवूडचा एक सुप्रसिद्ध अभिनेता आहे. हा अभिनेता इतर कोणी नाही, तर पतौडी घराण्याचा जावई कुणाल खेमू आहे.

 

कुणाल खेमूचा जन्म २५ मे १९८३ रोजी काश्मिरी पंडित कुटुंबात झाला होता. त्याच्या वडिलांचे नाव रवी आहे, जे एक अभिनेता होते, तर त्याच्या आईचे नाव ज्योती आहे. मुख्य अभिनेता म्हणून कुणाल मोठा अभिनेता म्हणून अजून नाव कमाऊ शकला नाहीये, परंतु सहकलाकार म्हणून त्याने बर्‍याच चित्रपटांमध्ये काम केले. दुसरीकडे, तो व्यावसायिक आयुष्यापेक्षा आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जास्त चर्चेत राहिला आहे. याशिवाय तो बर्‍याच वेळा वादातही घेरला गेला होता. गेल्या काही काळापासून, कुणाल बॉलिवूड चित्रपट आणि अभिनयाच्या दुनियेपासून दूर आहे. अभिनेत्याशी संबंधित अशा बर्‍याच मनोरंजक गोष्टी आहेत, ज्या तुम्हाला क्वचितच माहित असतील.

वडिलांकडून मिळाले होते अभिनयाचे बाळकडू
कुणालने मुंबईतील निरंजनलाल डालमिया हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले होते. यानंतर त्याने मुंबईतील अ‍ॅमिटी युनिव्हर्सिटीमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले. कुणालने त्याचे वडील रवी खेमू यांच्याकडून, अभिनयाची कौशल्ये आत्मसात केली. फार कमी लोकांना माहित असेल की, कुणाल खेमूचे आजोबा मोतीलाल खेमूदेखील अभिनयाशी संबंधित होते. ते काश्मीरमधील नाटककार होते.

पतौडी घराण्याच्या मुलीशी लग्न

 

कुणालच्या लग्नाने त्यावेळी बऱ्याच चर्चा रंगविल्या होत्या. याचे कारण असे की, नवाब पतौडी यांची मुलगी आणि सैफ अली खानची बहीण सोहा अली खानशी त्याने लग्न केले. ‘ढूंंढते रह जाओगे’ चित्रपटाच्या वेळी त्याची मैत्री सोहा अली खानची झाली होती. यानंतर दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि २५ जानेवारी २०१५ रोजी त्यांचे लग्न झाले. या जोडप्याला इनाया नौमी खेमू नावाची एक प्रेमळ मुलगीही आहे.

 

महेश भट्टच्या चित्रपटाद्वारे पदार्पण

कुणाल खेमूने २९८७ मध्ये दूरदर्शनचा शो ‘गुल गुलशन गुलफाम’मध्ये बालकलाकार म्हणून कारकिर्दीत सुरुवात केली होती. त्यानंतर १९८३ मध्ये त्याने महेश भट्टच्या ‘सर’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ‘राजा हिंदुस्तानी’, ‘जख्म’, ‘भाई’, ‘हम हैं राही प्यार के’ या चित्रपटात तो बाल कलाकार म्हणून दिसला आहे.

‘कलयुग’ चित्रपटाद्वारे मुख्य अभिनेता म्हणून पदार्पण

यानंतर २००५ मध्ये त्याने ‘कलयुग’ चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्याच वर्षी तो मधुर भंडारकरचा पहिला चित्रपट ‘ट्रॅफिक सिग्नल’चा भाग बनला. यानंतर तो ‘ढोल’, ‘ढूंंढते रह जाओगे’, ‘जय वीरू’ आणि ‘गोलमाल’ च्या सिरीजमध्ये दिसला. त्याचा ‘गोलमाल’ शिवाय कोणताच चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालला नाही.

कुणाल खेमू अशा कलाकारांमध्ये येतो, ज्यांनी बाल कलाकार म्हणून बरेच नाव कमावले, परंतु मोठे झाल्यावर तितकी कमाल करू शकले नाहीत. सन २०२० मध्ये खेमू हा ‘मलंग’ चित्रपटाचा एक भाग होता. चित्रपटात त्याने नकारात्मक भूमिका साकारली. याशिवाय ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीझ झालेल्या ‘लूटकेस’मध्येही तो दिसला.

हे देखील वाचा