Friday, March 29, 2024

‘कुणी म्हणाले वेडी कुठली’ गातं अमृता फडणवीस पुन्हा आल्या चाहत्यांच्या भेटीला, महिला दिनी भेट दिलं नवं कोरं गाणं

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतात. प्रोफेशनली त्या एक बँकर आहेत. मात्र कामाव्यतिरिक्त त्या वेगवेगळे छंद जोपासतात. त्यातलाच एक छंद म्हणजे गायकी!

त्या नेहमी वेगवेगळ्या माध्यमातून त्यांचे गाणे प्रेक्षकांसमोर सादर करतात. त्यांच्या गाण्याच्या माध्यमातून त्या विविध सामाजिक विषयांवर भाष्य करत असतात. या गाण्यांमुळे त्यांना बऱ्याचदा ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागला आहे. सतत होणाऱ्या ट्रोलिंगला सडेतोड उत्तर देत, अमृता फडणवीस एक नवीन गाणे घेऊन आल्या आहेत. गाण्याचे बोल आहेत, “कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी!”

या गाण्यात गावाकडील मुलीची परिस्थिती दाखवण्यात आली आहे. जिचे आजोबा तिच्या इच्छेविरुद्ध तिचे लग्न ठरवण्याचा प्रयत्न करीत असतात. मात्र तिला नृत्याची आणि गाण्याची आवड असते. मुलीचे आई-वडिल तिच्या कलेला दाद देत असतात; परंतु आजोबांना हे मान्य नसते. यामुळे ती कोणालाही न सांगता घरातून निघून जाते व तिच्या आवडत्या क्षेत्रात यशस्वी होऊन दाखवते. शेवटी आजोबांसहित सर्वजण तिचे कौतुक करतात.

हे गाणे महिला दिनाचे औचित्य साधून त्यांनी प्रदर्शित केलं आहे. गाणे स्वतः अमृता यांनी गायले आहे. तर बोल स्वप्ना पाटकर यांचे असून रोहन-रोहन याने गाण्याला संगीत दिले आहे. गाण्यामध्ये अमृता यांच्या व्यतिरिक्त शशिकांत गंधे, अतुल काळे, श्रद्धा श्रेयकर आणि प्राची लेंगारे हे कलाकार पाहायला मिळाले. तसेच हे गाणे यु ट्यूबवर टी-सिरीज मराठीद्वारे प्रदर्शित करण्यात आले आहे.

गाणे प्रदर्शित होताच व्हायरल होऊ लागले आहे. या गाण्याद्वारे अमृता फडणवीसांनी ट्रोलर्सवर जोरदार निशाणा साधल्याचे दिसून येते. गाण्याला अवघ्या 2 तासांतच तीन हजाराहून अधिक व्हिव्ज मिळाले आहेत. महत्वाची बाब म्हणजे, अमृताजींच्या या गाण्यालाही ट्रोल्लिंगचा सामना करावा लागतोय.

हे देखील वाचा