Monday, May 13, 2024

भारतीय सिनेसृष्टीतील पहिल्या ‘आई’ लीला चिटणीस ठरल्या होत्या ‘लक्स’ची जाहिरात करणाऱ्या पहिल्या अभिनेत्री; वाचा त्यांच्याबद्दल

हिंदी चित्रपटांना १०० पेक्षा अधिक वर्षांची परंपरा आहे. या एवढ्या वर्षांमध्ये या क्षेत्राने अनेक मोठे कलाकार होताना पाहिले आहे. अनेक स्त्रियांनी या अभिनयाच्या जगात त्याकाळी काम करायला सुरुवात केली, जेव्हा महिलांना घराबाहेर पडणे देखील वर्ज्य होते. महिला चित्रपटांमध्ये काम करत नसल्याने पुरुषांनाच स्त्रियांचा पोशाख घालून तयार केले जायचे. अशा काळात काही महिलांनी हिंमत आणि ध्येय यांच्या बळावर समाजाकडे दुर्लक्ष करत, चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात होती. आज २०२१ सालामध्ये आपण मागे वळून पाहिले, तर अशा अनेक अभिनेत्री असतील ज्यांनी वेगवेगळ्या भूमिका निभावत त्या भूमिकेला एक विशिष्ट दर्जा मिळवून दिला. अशाच एक अभिनेत्री म्हणजे लीला चिटणीस. लीला चिटणीस या आघाडीची अभिनेत्री असणाऱ्या काजोलच्या पणजी आजी आहेत. आज लीला चिटणीस यांची पुण्यतिथी. जाणून घेऊया त्यांच्याबद्दल अधिक माहिती.

ज्या काळात स्त्रियांना फक्त चूल आणि मूल याचीच परवानगी होती, त्या काळात लीला चिटणीस घराबाहेर पडल्या आणि त्यांनी चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली. लीला या चित्रपटसृष्टीतल्या पहिल्या ‘आई’ होत्या. त्या हिंदी सिनेसृष्टीतील पहिल्या ब्लॉकबस्टर समजल्या जाणाऱ्या ‘कंगन’ सिनेमातील अभिनेत्री होती.

साल १९१२ मध्ये ९ सप्टेंबरला महाराष्ट्रात लीला यांचा जन्म झाला. खूप कमी वयात त्यांचे लग्न झाले आणि पुढे खूपच लवकर त्या चार मुलांच्या आई बनल्या. हळूहळू त्या आणि त्यांच्या पतीमध्ये वाद होण्यास सुरुवात झाली. त्यांचे पती गजानन यशवंत चिटणीस त्यांचे वाद इतके विकोपाला गेले की, त्यांनी वेगळे होण्याचे ठरवले आणि त्यांचे लग्न तुटले. वेगळे झाल्यानंतर लीला यांनी मुलांच्या संगोपनासाठी एका शाळेत शिक्षिका म्हणून काम करण्यास सुरुवात केली. सोबतच त्यांनी नाटकांमध्ये देखील काम करायला सुरु केले.

लीला यांना त्यांच्या मेहनतीच्या जोरावत ‘सागर मुव्हिटोन’ सिनेमात एक्स्ट्रा म्हणून काम मिळाले. मग त्याच कंपनीत ‘जेंटलमन डाकू’ सिनेमात काम करायची संधी मिळाली. या सिनेमात त्यांनी पुरुषाचा पोशाख घालून काम केले. पुढे त्यांनी मास्टर विनायक यांच्या ‘छाया’ सिनेमात काम केले. त्यांना महाराष्ट्राच्या पहिल्या ग्रेजुएट सोसायटी लेडीचा किताब देखील मिळाला होता.

आतापर्यंत लीला या त्यांच्या करियरच्या सर्वात मोठ्या आणि यशस्वी वळणावर पोहचल्या होत्या. त्या ज्या गोष्टींना हात लावायच्या, ती गोष्ट सोन्यात बदलायची. त्यांना ‘बॉम्बे टॉकीज’सोबत जोडण्याची एक संधी मिळाली. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन बॉम्बे टॉकीजने त्यांना सुपरस्टार अशोक कुमार यांच्यासोबत ‘कंगन’ सिनेमात काम दिले. लीला या सिनेमात मुख्य अभिनेत्री म्हणून झळकल्या आणि हा सिनेमा सुपरहिट झाला. यानंतर त्यांनी अशोक कुमार यांच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले. तसेच लीला चिटणीस या ‘लक्स’ साबणाची जाहिरात करणाऱ्या पहिल्या अभिनेत्री होत्या.

पुढे त्यांना ‘शाहिद’ सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदा दिलीप कुमार यांच्या आईची भूमिका करण्याची संधी मिळाली. सिनेसृष्टीत त्यांनी अनेक ‘आई’च्या भूमिका साकारल्या आणि हीच त्यांची ओळख बनली. लीला यांना आईचे खरे रूप अगदी हुबेहूब पडद्यावर उभे करण्याचे कसब माहित होते. त्यांनी राजकपूर यांच्या ‘आवरा’ सिनेमातही आईची भूमिका निभावली होती. १९८७ साली आलेला सिनेमा ‘दिल तुझको दिया’ हा त्यांच्या शेवटचा सिनेमा होता. या सिनेमानंतर त्यांनी या क्षेत्राला रामराम ठोकला आणि त्यांच्या मुलाकडे अमेरिकेला निघून गेल्या. तिथे जाऊन त्यांनी त्यांचे ‘चंदेरी दुनियेत’ हे आत्मचरित्र लिहिले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा