Wednesday, July 2, 2025
Home मराठी Tirsat Movie Review | ‘प्रेमात हरलं तरी आयुष्यात जिंकता येतं’ सांगणारा तिरसाट

Tirsat Movie Review | ‘प्रेमात हरलं तरी आयुष्यात जिंकता येतं’ सांगणारा तिरसाट

मित्रांनो माणूस आयुष्यात अनेकवेळा प्रेम करतो, पण खऱ्या प्रेमात तो एकदाच पडतो. अशीच एका आगळ्या वेगळ्या प्रेमाची परिभाषा शिकवणारा ‘तिरसाट‘ (tirsat)चित्रपट आज रिलीझ झाला. चित्रपटगृहातून बाहेर पडताना एकच विचार मनात डोकावत होता की, प्रेम माणसाला एवढं कसं बदलवू शकतं? ब्रोकन हार्टपासून सुरु झालेल्या या चित्रपटाचा शेवट दोन जुळलेल्या मनांनी होतो. प्रदीप टोणगे आणि मंगेश शेंडगे यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी स्वीकारली आहे. तसेच दिनेश किर्वे (dinesh kirve)हे या चित्रपटाचे निर्माते आणि लेखक आहेत.

चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारे तेजस्वीनी शिर्के आणि नीरज सूर्यकांत (neeraj surykant) याच्या बाळू आणि समी या पात्रांनी कहाणीत प्रेमाची झलक दाखवली. प्रेमकहाणी असली, तरी या चित्रपटातील व्हिलन मात्र चांगलाच भाव खाऊन गेला. अभिनेता सुजित चौरे (sujit chaure) याने विन्या ही भूमिका अत्यंत सुंदर पद्धतीने साकारली आहे. सुजित या चित्रपटात जरी व्हिलनची भूमिका साकारत असला, तरी देखील त्याची भूमिका खूपच मनोरंजक आहे. स्क्रीनवर जेव्हा जेव्हा सुजित दिसलात तेव्हा तेव्हा सर्वत्र पाहताच हशाच पिकलाय. श्रीमंत बापाचा बिघडलेला मुलगा जो काहीही कारण नसताना उगाच सगळ्यांशी पंगे घेत असतो. त्याची स्टाईल, कपडे , बोलणे एकंदरीत सगळं आकर्षित करणारं आहे. तसेच कोणत्याही प्रसंगानंतर अर्रर्र जत्रा हा डायलॉग देखील त्याच्या पात्राकडे लक्ष वेधणारा आहे.

त्यांच्या पात्रांव्यतिरिक्त चित्रपटातील निल्या आणि मनीची प्रेमकहाणी सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आणणारी होती. प्रपोज करताना हा शेतकऱ्याचा मुलगा तुला चटणी भाकरी दुसरं काहीही देऊ शकतं नाही हे निल्याचे डायलॉग सगळ्या प्रेमवीरांना नक्कीच भावतील. या भूमिका ओंकार यादव आणि पल्लवी घुले यांनी साकारल्या आहेत. बाकी चित्रपटात बाकी खास अशी काही स्टारकास्ट घेतलेली दिसत नाहीये. अभिनेत्री श्रुती उबाळे हिची खास झलक चित्रपटात पाहायला मिळत आहे. काही प्रमाणात मनोरंजनात्मक आणि इमोशनल बेसवर तयार केलेला हा चित्रपट तरुणाईला भुरळ घालणारी आहे. या सगळ्यात बाप आणि मुलातीळ भावुक क्षण देखील या चित्रपटाची उत्कंठा वाढवतो. सतत मुलगा वाया गेला असं म्हणणारे बाळूचे वडील जेव्हा समीने नकार दिल्यानंतर जीव द्यायला गेलेल्या बाळूला दुःखातून बाहेर काढतात आणि मिठी मारतात. तो सगळ्यांना भावुक करणारा क्षण होता. त्यानंतर बाळूने करिअरमध्ये जी काही भरारी घेतली ती आजकालच्या मुलांना प्रेरित करणारी आहे.

चित्रपटात खटकणारी गोष्ट म्हणजे सुरुवातीला बाळू त्याची ही कहाणी प्रेक्षकांना सांगताना दिसत आहे. परंतु शेवटी तो कहाणी न सांगता चित्रपट सरळ पुढे जाताना दिसत आहे. अगदी शुन्यातून एक यशस्वी व्यावसायिक झालेला बाळूचा प्रवास पाहण्यासारखा आहे. ते म्हणतात ना, प्रेम माणसाला घडवूही शकतं आणि बिघडवू देखील शकतं. अशाच समीने नकार दिल्यानंतर बाळूने त्याच्या करिअरची गाडी अशी १०० च्या स्पीडने पळवली की, बघताना तुम्हाला देखील भारी वाटेल. एक गावरान लव्ह अँगलने सुरु झालेला प्रेमाचा प्रवास कधी मॉर्डन होतो हे चित्रपट पाहताना समजत नाही. चित्रपट गावाकडे शूट झाल्याने आपल्याला गावाकडील अनेक गोष्टी पाहायला मिळत आहे. मंदिर, विहीर, शेत या ठिकाणी जास्त सीन शूट झालेले दिसत आहे.

चित्रपटात एकूण तीन गाणी आहे, वरात स्पेशालिस्ट आणि फर्मान आलया या गाण्यांनी तर नुसता धुमाकूळ घातला. गाणी ऐकून कोणीही स्वतःला थिरकण्यापासून थांबवू शकत नाही. वरात स्पेशालिस्ट या गाण्याला गायक आदर्श शिंदे याने आवाज दिला आहे.

बऱ्याचवेळा आजचे तरुण त्याचे प्रेम मिळाले नाही तर पुढचा मागचा कसलाही विचार न करता त्यांचे आयुष्य संपवतात आणि याचा परिणाम त्यांच्या आई-वडिलांना भोगावा लागतो. पण मंडळी जरी तुम्ही आयुष्यात कधी कोणावर खरे प्रेम केले असेल आणि ते प्रेम मिळवण्यासाठी तुमचे प्रयत्न कमी पडत असतील तर तुम्ही हा चित्रपट नक्की पाहू शकता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा