श्रावणाचा पवित्र महिना सुरू आहे. यावेळी सर्वत्र भोलेनाथाच्या भजनाचा गजर होत आहे. पण सध्या सर्वात जास्त ऐकले जाणारे एक भजन म्हणजे ‘हर हर शंभू’. कावड यात्रेदरम्यान हे भजन प्रचंड गाजले. हे भजन यूट्यूब गायिका फरमानी नाझने (Farmani Naaz) तिच्या मधुर आवाजात गायले आहे. हे भजन ऐकून एकीकडे लोक भक्तीत लीन होत आहेत, तर दुसरीकडे यावरून वादही सुरू झाले आहेत. खरे तर ‘हर हर शंभू’ हे भजन गायल्यानंतर फरमानी नाझ मुस्लिम कट्टरवाद्यांच्या निशाण्यावर आली आहे. या भजनामुळे देवबंदी उलेमा फरमानीवर संतापले आहेत.
सासरच्यांच्या छळाला कंटाळून परतली होती घरी
गायक फरमानी नाझ उत्तर प्रदेशातील मुझफ्फंजर जिल्ह्यातील मोहम्मदपूर माफी या छोट्याशा गावची रहिवासी आहे. २०१७ मध्ये तिचा निकाह मेरठमधील छोटा हसनपूर गावातील इमरानसोबत झाला होता. लग्नानंतर फरमानी नाझचे नशीब पूर्णपणे बदलले. सासरच्या घरून तिला टोमणे ऐकावे लागत. मुलगा झाला, त्यानंतरही परिस्थिती बदलली नाही. म्हणून ती पुन्हा वडिलांच्या घरी आली. त्याचवेळी पतीने दुसऱ्या मुलीशी लग्न केले. (life story of har har shambhu song singer farmani naaz)
‘असे’ सुरू केले युट्युब चॅनल
फरमानीच्या मुलाचे नाव मोहम्मद अर्श आहे. अर्शला घशाचा आजार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्याच्या उपचारासाठी फरमानी नाझने रात्रंदिवस मेहनत करून पैशांची व्यवस्था केली. तिला गाण्याची आवड आहे. रिपोर्ट्सनुसार, एके दिवशी फरमानी एक गाणे गात होती, जे गावातील राहुल नावाच्या तरुणाने रेकॉर्ड केले आणि ते यूट्यूबवर टाकले. हे गाणे खूप पसंत केले गेले. यानंतर फरमानीने स्वतःचे यूट्यूब चॅनल सुरू केले, ज्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतो.
रियॅलिटी शोमध्येही घेतलाय भाग
फरमानी नाझने प्रसिद्ध रियॅलिटी शो ‘इंडियन आयडल सीझन १२’मध्ये भाग घेतला होता. यादरम्यान, फरमानी नाझने या शोमधील तिच्या शानदार गायनाने प्रसिद्ध गायक नेहा कक्कर, हिमेश रेशमिया आणि विशाल ददलानी यांना तिचे चाहते बनवले होते. मात्र, मुलगा अर्शची तब्येत बिघडल्याने फरमानीला शो मध्येच सोडून घरी परतावे लागले. आता ती तिच्या या गाण्यामुळे चर्चेत आहे. फरमानीचे यूट्यूबवर ३.८४ दशलक्ष सबस्क्राइबर्स आहेत. तिने गायलेल्या ‘हर हर शंभू’ या गाण्याला ७ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा