काहीच दिवसांपूर्वी कंगना राणावत १०५ दिवसांनी मुंबईत परतली. आल्या आल्या तिने मुंबईत सिद्धिविनायक आणि मुंबादेवी यांचे दर्शन घेतले. आता तिने तिच्या बहिणीसोबत वांद्रे पोलिस ठाण्यात समाजात अशांतता पसरवणाऱ्या आणि देशद्रोहाच्या आरोपांवर जबाब नोंदवला आहे. कंगना ज्यावेळी पोलीस ठाण्यात आली तेव्हा ती खूप कॉन्फिडन्ट दिसत होती.
यासोबतच कंगनाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना तिने लिहिले की, “का मला मानसिक, भावनात्मक आणि आता शारीरिक त्रास दिला जात आहे? मला या देशाकडून ह्या प्रश्नाचे उत्तर पाहिजे. मी नेहमीच तुमच्यासाठी उभी राहिली आहे. आता तुमची वेळ आहे माझ्यासाठी उभे राहण्याची. जय हिंद.” यासोबत तिने तिचा एक मिनिट तीस सेकंदांचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओतून तिने अनेक प्रश्न उपस्थित करत तिला होणार त्रास सांगितला आहे.
कंगना या व्हिडिओ म्हणाली , ” जेव्हा पासून मी देशाच्या हितासाठी बोलायला सुरुवात केली तेव्हापासून माझ्यावर अन्याय होत आहे. माझे घर पाडण्यात आले, माझे शोषण होत आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनावर बोलल्यामुळे रोज अनेक केस माझ्यावर नोंदवल्या जात आहे. एकाने तर मी हसली म्हणून सुद्धा माझ्यावर केस टाकली आहे.”
“कोरोनाच्या काळात माझ्या बहिणी रंगोलीने डॉक्टरांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात बोलल्यामुळे तिच्यावर देखील केस टाकण्यात आली आणि त्या केसमध्ये माझे देखील नाव टाकण्यात आले. तेव्हा तर मी ट्विटर देखील नव्हती. शिवाय मला पोलीस ठाण्यात जाऊन हजेरी देखील लावायला सांगितली जात आहे. आता मला ही हजेरी का लावावी लागते ते सुद्धा समजत नाहीये. मला हे सांगितले आहे की मी या सर्व गोष्टींबाबत कुठेच काहीही बोलू शकत नाही.
मला सुप्रीम कोर्टाला एक प्रश्न विचारायचा आहे की, हे एक मध्ययुग आहे का आणि मी या मध्ययुगातील महिला आहे का जिला जिवंत जाळले जाते.? आणि तिला शांत केले जाते. अशा प्रकारचे अत्याचार माझ्यावर संपूर्ण जगासमोर होत आहे,” असेही कंगना व्हि़डीओमध्ये म्हणाली.
https://twitter.com/KanganaTeam/status/1347433867683131393
दरम्यान १७ ऑक्टोबर २०२० ला कंगना विरोधात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी वांद्रे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल केल्यानंतर वांद्रे पोलिसांनी कंगनाला आधी दोन वेळा नोटीस बजावून चौकशीसाठी बोलावले होते. मात्र , वैयक्तिक कारण देत ती चौकशीसाठी हजर झाली नाही. यानंतर पोलिसांनी तिला तिसरी आणि अंतिम नोटीस बजावली होती. पण तिने तिसऱ्या नोटिशीला देखील प्रतिसाद न देता हा गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली. त्यानंतर हायकोर्टाने तिला चौकशीसाठी सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे कंगना वांद्रे पोलीस स्टेशन येथे चौकशीसाठी हजर झाली.
–कंगना नंतर आता बीएमसीच्या रडारवर सोनू सूद, पाहा का दिलीय पोलीसांत तक्रार?