Wednesday, August 6, 2025
Home कॅलेंडर राम कदमांचे तांडव! सैफच्या बहुचर्चित सिरीजमधील ‘त्या’ दृष्यावरुन राम कदमांची पोलीसांत तक्रार

राम कदमांचे तांडव! सैफच्या बहुचर्चित सिरीजमधील ‘त्या’ दृष्यावरुन राम कदमांची पोलीसांत तक्रार

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानची बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चित असलेली ‘तांडव’ ही सीरिज आताच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. मात्र, ही सीरिज प्रदर्शित होताच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या सीरिजमध्ये हिंदू देव-देवतांचा अपमान झाल्याचे म्हणत या सिरीजवर टीका केली जात आहे.

भारतीय जनता पक्षाकडून या वेबसिरीज संदर्भात बंदी आणण्याची मागणी केली जात आहे. भाजप आमदार राम कदम यांनी घाटकोपर पोलिस ठाण्यात सिरीज विरोधात तक्रार दाखल केली आहे. या वेबसीरिजमध्ये अभिनेता झिशान आयुब याच्यावर चित्रीत एका दृश्यावर काहींनी तीव्र आक्षेप घेतला आहे. या दृश्यामुळे हिंदू देवी-देवतांचा अपमान झाल्याचा आरोप करण्यात येत असून, निर्मात्यांनी माफी मागावी अशी मागणीही केली जात आहे.

या संबंधित आमदार राम कदम यांनी एक ट्विट करत सैफ अली खानवर निशाणा साधला आहे.

‘सध्या नेहमीच चित्रपट आणि वेबसिरीजच्या माध्यमातून हिंदू देवी देवतांचा अपमान केला जात आहे. अलिकडचे ताजे उदाहरण म्हणजे नवीन वेबसिरीज तांडव. सैफ अली खान पुन्हा एकदा अशाच चित्रपट, सिरीजचा भाग झाला आहे, ज्यातून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी ते दृश्य हटवले पाहिजे,’ अशा आशयाचे ट्विट राम कदम यांनी केले आहे.

https://twitter.com/ramkadam/status/1350671227451551751

भाजप आमदार मनोज कोटक यांनीही या वेबसिरीजला विरोध दर्शवला आहे. या वेबसिरीजवर बंदी घालण्यात यावी आणि वेबसिरीजच्या निर्मात्याने माफी मागावी अशी मागणी कोटक यांनी केली आहे. तशा स्वरूपाचे एक पत्रच त्यांनी माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी लिहिले आहे. तांडव ही वेबसिरीज दलित विरोधी आणि हिंदू धर्मियांविरुद्ध राग पसरवणारी असल्याचे बीजेपी नेते कपिल मिश्रा यांनी सांगितले आहे.

या सीरिजच्या पहिल्याच एपिसोडमध्ये भगवान शंकराच्या वेशात अभिनेता जीशान अय्यूब विद्यार्थ्यांना शिकवताना दिसत आहे. यामध्येच श्रीरामांचा देखील उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे हिंदू देव-देवतांची हेटाळणी केली जात असल्याचं म्हटले जात आहे.

हिमांशु किशन मेहरा आणि अली अब्बास जफरद्वारा निर्मित ‘तांडव’ ही सीरिज ९ भागांची असून, त्यात सैफ अली खानसोबत डिंपल कपाडिया, सुनील ग्रोव्हर, तिग्मांशू धुलिया, डीनो मोरिया, कुमुद मिश्रा, गौहर खान, अमायरा दस्तूर, मोहम्मद झीशान अय्यूब, कृतिका कामरा, सारा जेन डायस, संध्या मृदुल, अनूप सोनी, हितेन तेजवानी, परेश पाहुजा आणि शोनाली नागराणी हे कलाकार आहेत.

हे देखील वाचा