शोबिझच्या या चकाकणाऱ्या जगामागे अशा काही घटना घडतात, ज्या प्रत्येकाला सुन्न करून सोडतात. अशीच एक धक्कादायक बातमी सध्या सिनेइंडस्ट्रीतून समोर येत आहे. फॅशन मॉडेल आणि अभिनेत्री शहाना (Shahana) शुक्रवारी (१३ मे) कोझिकोडमध्ये मृतावस्थेत आढळून आली.
शहानाचा मृतदेह तिच्याच घराच्या खिडकीच्या रेलिंगला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. शहानाचे वय अवघे २१ वर्षे होते. दीड वर्षापूर्वीच तिचे लग्न झाले होते. ती पतीसोबत भाड्याच्या घरात राहत होती. शहानाच्या आईने तिच्या पतीवर हत्येचा आरोप केला असून, त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, पतीची कसून चौकशी सुरू आहे. (malayalam model actress shahana found dead in kozhikode on her birthday)
एका न्यूज चॅनलशी केलेल्या संवादात मॉडेल शहानाच्या आईने सांगितले की, “ती कधीच आत्महत्या करू शकत नाही. तिने तिच्या वाढदिवसाला आम्हा सर्वांना आमंत्रित केले होते. आम्ही सर्वांनी मिळून तिचा वाढदिवस साजरा करण्याचा प्लॅन केला होता.” शहानाच्या आईने अभिनेत्रीचा पती सज्जादवर आरोप करत सांगितले की, सज्जाद आणि त्याचे कुटुंब शहानाला त्रास देत होते. शहानाच्या आईने त्यांना वेगळे राहण्याचा सल्ला दिला होता, मात्र वेगळे राहूनही सज्जाद पैशासाठी शहानाला त्रास देत असे. तिच्या आईने सांगितले की, सज्जादनेच तिच्या मुलीची हत्या केली आहे.
शहानाची आई म्हणाली, “माझी मुलगी नेहमी घरगुती हिंसाचाराबद्दल सांगायची की, तिचा नवरा तिला मारहाण करतो.” शहानाच्या आईने सांगितले की, तिला तिच्या वाढदिवशी कुटुंबीयांना भेटायचे होते, परंतु सज्जादने यासाठी देखील तिला रोखले होते. शेजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सज्जादचा आरडाओरडा ऐकून ते घटनास्थळी पोहोचले, तेव्हा त्यांना शहाना बेशुद्ध अवस्थेत पडल्याचे दिसले. शेजाऱ्यांच्या सांगण्यावरून सज्जादने पोलिसांना मृत्यूची माहिती दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, सज्जाद पूर्वी कतारमध्ये काम करायचा. शहानाच्या वाढदिवसाशी सज्जाद उशिरा घरी आला, यावरून दोघांमध्ये वाद झाला होता. आता हा खून की आत्महत्या, या दोन्ही कोनातून पोलीस तपास करत आहेत.
हेही वाचा