अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या मागील संचालकांनी ‘मानाचा मुजरा’ या कार्यक्रमात गैरव्यवहार केल्याचा आरोप ठेवत धर्मादाय सहआयुक्तांनी १० लाख ७८ हजार रुपये भरण्याचे आदेश दिले आहेत. माजी अध्यक्ष प्रसाद सुर्वे, अभिनेते विजय पाटकर, दिग्दर्शक विजय कोंडके, अभिनेत्री अलका कुबल व प्रिया बेर्डे यांच्यासह ११ जणांना हे आदेश लागू करण्यात आले आहेत.
२०१० ते २०१५ या कालावधीत ‘मनाचा मुजरा’ हा कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमात घोटाळा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
दोन वर्षांपूर्वी आलेल्या निकालात नजरचुकीने टंकलेखनात चूक झाली होती. ‘खात्यांमधून पैसे भरा’ असे टंकलेखनात पाहिजे होते मात्र ‘खात्यामधून भरा’ असे चुकीने टाईप झाले. याच चुकीचा फायदा घेत हे पैसे अद्यापही भरले गेले नव्हते. मात्र, अखेर आज धर्मादाय आयुक्त कार्यालयाने ही चूक दुरुस्त करत या संचालक मंडळाला येत्या १५ दिवसात पैसे भरण्याचे आदेश दिले आहेत.
धर्मादाय कार्यालयाने १८ जानेवारी २०२१ला त्यांची ही चूक दुरुस्त करत, येत्या पंधरा दिवसात २०१०-२०१५ मधील सर्व माजी संचालकांना पैसे भरण्याचे दिले. तत्कालीन संचालक मंडळाने १० लाख ७८ हजार रुपये जमा केले नाहीत तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत धर्मदाय सहआयुक्तांनी दिले आहेत.