Tuesday, July 9, 2024

‘बघतोय रिक्षावाला फेम’ मानसी नाईक लवकरच अडकणार विवाहबंधनात, नवरा आहे प्रसिद्ध मुष्टियोद्धा!

मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री मानसी नाईक लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. आंतरराष्ट्रीय बॉक्सर प्रदीप खरेरा हे तिच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव आहे. नोव्हेंबर महिन्यांत या दोघांनी गुपचूप साखरपुडा केला होता. आता या दोघांच्या लग्नाची तारीख समोर आली आहे. १९ जानेवारी २०२१ मध्ये ही जोडी विवाहबंधनात अडकणार आहे.

मराठी टेलिव्हिजन आणि चित्रपटक्षेत्रातील सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि नृत्यांगना म्हणजे मानसी नाईक. मानसीने प्रेक्षकांना तिच्या अभिनयासोबतच नृत्याचे देखील वेड लावले. आपले सौंदर्य, अभिनय, नृत्यकौशल्य, अदा आणि एक्सप्रेशनने मानसीने लोकांना अक्षरशः वेड लावले. मानसीने ‘चार दिवस सासूचे’ या ब्लॉकबस्टर मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या मालिकेत तिने ‘प्रियांका’ नावाची भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. त्यानंतर तिची अभिनयाची गाडी सुसाट धावायला सुरुवात झाली. मानसीने २००७ साली महेश कोठारे यांच्या ‘जबरदस्त’ या सिनेमातून चित्रपटक्षेत्रात पाऊल टाकले. त्यानंतर तिने टार्गेट, तुक्या तुकाविला नाग्या नाचविला, कुटुंब, तीन बायका फजिती ऐका आदी सिनेमात काम केले. मानसीने ‘वाट बघतोय रिक्षावाला’, ‘बाई वाड्यावर या’ या सुपरहिट गाण्यातून नृत्याची कमाल दाखवत प्रेक्षकांना थिरकायला लावले. शिवाय तिने ढोलकीच्या तालावर, मराठी तारका या शो मधून तिने तिच्या डान्सचे जलवे दाखवले.

मानसीसाठी २०२० हे वर्ष खूप संस्मरणीय ठरले आहे. २०२० च्या सुरुवातीलाच मानसीने तिच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे फेब्रुवारी २०२० मध्ये तिच्या आणि प्रदीपच्या नात्याची कबुली चाहत्यांना दिली होती. २०२० च्या शेवट म्हणजेच नोव्हेंबर महिन्यात तिने प्रदीप सोबत साखरपुडा केला.साखरपुड्याची माहिती मानसीने अचानक दिल्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने साखरपुड्याची माहिती दिली. Engaged, Future Mrs. Kharera म्हणत तिने आपल्या साखरपुड्याचे फोटो शेअर केले. त्यानंतर डिसेंबर २०२० मध्ये तिने तिच्या आणि प्रदीपच्या लग्नाची तारीख जाहीर करत २०२० चा शेवटी आनंददायी केला.

येत्या नवीन वर्षात म्हणजे १९ जानेवारी २०२१ मध्ये मानसी मिसेस प्रदीप खरेरा होणार आहे. पुण्यात जवळचे नातेवाईक आणि मित्रपरिवारांच्या उपस्थितित छोटेखानी समारंभ करत मानसी आणि प्रदीप लग्न करणार आहेत. १८ जानेवारीला मेहेंदी आणि संगीतचा कार्यक्रम होईल तर १९ ला सकाळी म्हणजे लग्नाच्या दिवशी हळदीचा कार्यक्रम होणार आहे.

कोण आहे प्रदीप खरेरा जरा जाणून घेऊया!
प्रदीप खरेरा हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील बॉक्सर असून त्याने अनेक मोठ्या आणि नावाजलेल्या स्पर्धा जिंकल्या आहेत. एवढेच नाही तर मिस्टर इंडिया युनायटेड कॉन्टिनेट्स २०१८ सालचा तो विजेता असून सोबतच तो मॉडेल आणि अभिनेताही सुद्धा आहे. मानसी नाईकप्रमाणेच प्रदीप खरेराही सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असून, तो त्याचे व्यायामाचे आणि मॉडेलिंगचे अनेक फोटो, व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असतो. प्रदीप खरेराचे इन्स्टाग्राम अकाउंट हे व्हेरीफाइड असून इन्स्टावर त्याचे जवळजवळ ८२ हजार फॉलोवर्स आहेत.

हे देखील वाचा