Monday, July 1, 2024

हॅप्पी बड्डे मनोजबाबू! एकेकाळी रेल्वे स्टेशनवर झोपणारे आज आहेत कोट्यवधींचे मालक, वाचा भोजपुरी सुपरस्टारची सुप्पर कहानी

मनोज तिवारी भोजपुरी चित्रपटसृष्टीतील मोठे, प्रसिद्ध आणि लोकप्रिय नाव. आज मनोज तिवारी त्यांचा ५० वा वाढदिवस साजरा करत आहे. मनोज तिवारी म्हणजे भोजपुरी चित्रपटाची कमाई छप्पर फाड होणार हे नक्की. यश आणि मनोज तिवारी हे समीकरण आजही कायम आहे. भोजपुरी सिनेमा ते राजकारण असा अनेक चढ-उतारांनी भरलेला मनोज तिवारी यांचा प्रवास केवळ आणि केवळ त्यांचा जिद्दीमुळे आणि मेहनतीमुळेच यशस्वी झाला.

टेलिव्हिजनच्या सर्वात विवादित बिग बॉस या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाल्यानंतर त्यांना संपूर्ण देशात, जगात ओळख मिळाली. आज मनोज तिवारी यांच्या वाढदिवसानिमित्ताने आम्ही तुम्हाला त्यांच्या अभिनेता ते यशस्वी राजकारणी या प्रवासाबद्दल सांगणार आहोत.

मनोज तिवारी यांनी २००४ साली आलेल्या ‘ ससुरा बड़ा पईसावाला’ या भोजपुरी चित्रपटातून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले. हा सिनेमा प्रचंड हिट झाला. म्हणजे फक्त ३० लाख रुपयांमध्ये तयार झालेल्या या सिनेमाने ९ कोटी रुपयांचा बिजनेस केला. या सिनेमातून मनोज तिवारी संपूर्ण भोजपुरी चित्रपट सृष्टीमध्ये ओळखले जाऊ लागले.

मनोज तिवारी यांनी अभिनयासोबतच त्याच्या गायकीनेही लोकांना वेड लावले. मनोज तिवारी यांनी त्यांच्या गाण्यातून कोणतीच अश्लीलता दाखवली नाही. अतिशय उत्तम आणि भोजपुरी संस्कार असलेले गाणे त्यांनी केले. त्यांच्या भोजपुरी गाण्यांमध्ये विशेषतः ‘रिंकिया के पापा…’, ‘जिया हो बिहार के लाला…’, ‘गोरिया चांद के अंजोरिया…’ और ‘हाफ पैंट वाली से…’ आदी गाणी प्रचंड गाजले.

मनोज तिवारी यांनी एका मुलाखतीमध्ये त्यांच्या संघर्षाच्या दिवसांबद्दल सांगताना म्हटले, “खूप गरिबीत माझे बालपण गेले. शाळेत जाण्यासाठी आम्ही चार चार किलोमीटर पर्यंत पायी चालायचो. त्यानंतर रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवरच झोपायचे, जे मिळेल ते खायचे. रोजच खायला मिळेल याची शाश्वती देखील नसायची. मात्र नशिबाने साथ दिली आणि सोबत मेहनतीची जोड असल्याने मी आज इथपर्यंत पोहचलो.”

मनोजजी २००९ साली महानायक अमिताभ यांच्यासोबत ‘गंगा’ चित्रपटाची शूटिंग करत होते. त्यावेळी त्यांची पहिल्यांदाच अमरसिंग यांच्यासोबत भेट झाली. त्या भेटीनंतर मनोज तिवारी यांनी राजकारणात जाण्याचे ठरवले. त्याच वर्षी त्यांनी समाजवादी पार्टीमध्ये प्रवेश केला. २००९ सालीच त्यांनी गोरखपूरमधून निवणूक लढवली. मात्र योगी आदित्यनाथ यांनी त्यांचा पराभव केला. २०१२ साली त्यांची नरेंद्र मोदी यांच्यासोबत भेट झाली. त्यानंतर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. मोदी यांच्या सांगण्यावरून तिवारी यांनी २०१४ साली दिल्लीमधून निवडूक लढवली आणि जिंकली देखील. मनोज तिवारी यांनी दिल्ली भाजपाचे अध्यक्षपद देखील भूषवले.

मनोज तिवारींबद्दल ही गोष्ट खूपच कमी लोकांना माहिती असेल की, ते राज्यस्तरीय क्रिकेट देखील खेळले आहेत. मनोज हे सेलिब्रिटी प्रीमियर लीगमध्ये भोजपुरी दबंग या बिहारच्या टीमचे प्रतिनिधित्व सुद्धा करतात.

मनोज तिवारी यांचे वैयक्तिक जीवनही खूप चर्चेत आले. एक महिन्यापूर्वीच मनोज तिवारी यांना वयाच्या ५० व्या वर्षी कन्यारत्न प्राप्त झाले. मागच्या वर्षी लॉकडाऊनमध्ये मनोज तिवारी यांनी दुसऱ्यांदा लगीनगाठ बांधली. १९९९ साली त्यांनी पहिल्यांदा गायिका राणी तिवारीसोबत लग्न केले. त्यांना एक मुलगी देखील आहे. मात्र या दोघांनी २०१२ मध्ये घटस्फोट घेतला. मीडिया रिपोर्ट्सनुसार असे सांगितले जाते की, मनोज तिवारी आणि श्वेता तिवारी यांच्याही नात्याच्या बऱ्याच चर्चा रंगल्या आणि याचमुळे हा घटस्फोट झाला. मनोज यांना त्यांच्या पत्नीला घटस्फोट द्यायचा नव्हता, पण निव्वळ त्याच्या पत्नीच्या इच्छेमुळे त्यांनी हा घटस्फोट घेतला. त्यानंतर त्यांनी एप्रिल २०२० मध्ये सुरभी यांच्यासोबत लग्न केले. त्यांना दोन्ही लग्नांतून दोन मुली असून या दोन्ही मुली त्यांना खूपच जवळच्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

जाळ अन् धूर संगटच! रितेश पांडे आणि अक्षरा सिंगच्या नव्या गाण्याची यूटुबवर चलती, लाखो हिट्सचा होतोय वर्षाव

भोजपुरी अभिनेत्रीलाही नाही आवरला मोह, थेट नेहा कक्करच्या ‘या’ गाण्यावर धरला ठेका

हे देखील वाचा