Thursday, November 21, 2024
Home कॅलेंडर अनेक कलाकारांनी यावर्षी सोडली आपली साथ, कोरोनासोबतच मोठ्या कलाकारांच्या निधनामुळे आठवणीत राहणारे वर्ष

अनेक कलाकारांनी यावर्षी सोडली आपली साथ, कोरोनासोबतच मोठ्या कलाकारांच्या निधनामुळे आठवणीत राहणारे वर्ष

आपण २०२०च्या शेवटाकडे जात आहोत. २०२० हे वर्ष भारतापुरते नाही तर संपूर्ण जगासाठी त्रासदायक होते. २०२० हे वर्ष सामान्य लोकांपासून ते तारे, तारकांपर्यंत सर्वांसाठीच अगदी कठीण होते. आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या महामारीने २०२०च्या सुरुवातीलाच भारतात एन्ट्री घेतली आणि २०२०च्या पहिल्या ३ महिन्यातच संपूर्ण देश थांबला.

एकीकडे कोरोनाचा लढा सुरु असतांना दुसरीकडे अनेक मोठ्या कलाकारांनी आपली साथ सोडली. २०२० हे वर्ष कोरोनासोबतच या कलाकारांच्या आकस्मिक जाण्यामुळे सुद्धा आठवणीत राहणार आहे.
या लेखात आपण असेच काही कलाकार बघणार आहोत ज्यांनी २०२० मध्ये या जगाचा निरोप घेतला.

निम्मी :
बॉलीवूडच्या जेष्ठ अभिनेत्री निम्मी यांनी २६ मार्च रोजी अखेरचा श्वास घेतला. निम्मी यांनी बरसात, दीदार, दाग, उडन खटोला, मेरे मेहबूब, पूजा के फुल या गाजलेल्या चित्रपटांमध्ये भूमिका केल्या होत्या. निम्मी या मागील काही दिवसांपासून आजारी होत्या.

इरफान खान :
नुसतेच बॉलीवूड नाही तर हॉलिवूडमध्ये देखील आपल्या अभिनयाने एक वेगळे स्थान निर्माण करणारा इरफान खान याने २९ एप्रिल ला या जगाचा निरोप घेतला. इरफान बऱ्याच काळापासून कॅन्सरशी झुंज देत होता. इरफानची अकाली एक्सिट सगळ्यांनाच त्रासदायक ठरली.

ऋषी कपूर :
३० एप्रिलला जेष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन झाले. कपूर घराण्याचा अभिनयाचा वारसा समर्थपणे पुढे नेणारे आणि आपल्या सशक्त अभिनयाने रसिकांचे मन जिंकणारे ऋषी कपूर हे वयाच्या ६७ व्या वर्षी जग सोडून गेले. बालकलाकार ते जेष्ठ कलाकार असा अविस्मरणीय प्रवास त्यांनी केला.
अवघ्या २४ तासात इरफान खान आणि ऋषी कपूर या दोन दिग्ग्ज कलाकार सर्वानी गमावले.

वाजिद खान :
साजिद – वाजिद ही बॉलीवूड मधील प्रसिद्ध संगीतकार जोडी. त्यातील वाजिद खान यांचे १ जूनला मुंबईत निधन झाले. वाजिद खान यांना किडनीचा आणि हृदयविकाराचा त्रास होता. त्यातच रुग्णालयात ऍडमिट असतांना त्यांचा करोना चाचणी अहवाल देखील पॉझिटिव्ह आला होता. वाजिद खान सलमान खानच्या अतिशय जवळचे होते.

बासु चटर्जी :
बॉलीवूडमध्ये ज्येष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक, पटकथा लेखक म्हणून ओळखले जाणारे बसू चॅटर्जी यांचे ४ जूनला निधन झाले. त्यांनी ‘छोटी सी बात’, ‘रजनीगंधा’, ‘बातों बातों में’, ‘खट्टा-मीठा’ यासारख्या क्लासिक हिट चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

योगेश गौर :
एकापेक्षा एक सरस गाणी लिहणारे प्रसिद्ध गीतकार योगेश गौर यांचे २९ मे ला वृद्धापकाळाने निधन झाले. योगेश यांनी एक रात, मिली, छोटी सी बात, आनंद, आजा मेरी जान, मंजिलें और भी हैं, बातों-बातों में, रजनीगंधा, मंजिल, आनंद महल, प्रियतमा, किराएदार, हनीमून, चोर और चांद, बेवफा सनम, जीना यहां, लाखों की बात आदी चित्रपटांसाठी गीतलेखन केले होते.

सुशांत सिंग राजपूत :
हँडसम हंक आणि उत्कृष्ट अभिनय अशी ओळख असणारा सुशांत १४ जून रोजी हे जाड सोडून गेला. सुशांत त्याच्या वांद्रे येशील घरात मृत अवस्थेत आढळला होता. सुशांत काही काळापासून डिप्रेशन मध्ये होता. सुशांतच्या जाण्याने संपूर्ण सिनेसृष्टीला आणि त्याच्या फॅन्सला मोठा झटका बसला आहे

सरोज खान :
अनेक मोठं मोठ्या बॉलीवूड कलाकारांना आपल्या तालावर नाचवणाऱ्या प्रसिद्ध आणि जेष्ठ नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांनी ३ जुलैला या जगाचा निरोप घेतला. सरोज खान यांनी २ हजारांहून अधिक गाण्यांचं नृत्य दिग्दर्शन केलं होतं. त्यांना तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होती.

जगदीप :
प्रसिद्ध कॉमेडियन जगदीप यांनी ९ जुलैला वयाच्या ८१ वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांची ‘शोले’ चित्रपटातील ‘सूरमा भोपाली’ ही भूमिका विशेष गाजली. तब्बल ४०० चित्रपटांमधून त्यांनी भूमिका साकारली.

कुमकुम :
जेष्ठ अभिनेत्री कुमकुम यांचे २८ जुलै रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. कुमकुम यांनी १०० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं होतं. किशोर कुमार आणि गुरू दत्त यांच्यासोबत त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं.

समीर शर्मा :
टीव्ही कलाकार समीर शर्मा याने ६ ऑगस्ट रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येमागील कारण नैराश्य असल्याचे सांगितले होते.

एसपी बालासुब्रमण्यम :
प्रख्यात तेलुगु, तामिळ, हिंदी गायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांनी २५ सप्टेंबरला जगाचा निरोप घेतला. त्यांची कोरोना चाचणी पॉसिटीव्ह आली होतो. आपल्या सुरेल आवाजाने त्यांनी लोकांची मने जिंकली. काही लोक त्यांना सलमान खानचा आवाज म्हणून ओळखायचे.

सीन कॉनेरी :
ऑस्कर पुरस्कार मिळवणारे सीन कॉनेरी यांचे वयाच्या ९० व्या वर्षी वृद्धापकाळाने ३१ ऑक्टोबरला निधन झाले. त्यांनी सात सिनेमात बॉण्डची भूमिका साकारली होती. सीन यांना ऑस्कर, बाफ्टा आणि तीन गोल्डन ग्लोब्ज यासह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं.

फराज खान :
राणी मुखर्जीच्या ‘मेहेंदी’ या सिनेमातील अभिनेता फराज खान याचा ४ नोव्हेंबरला मृत्यू झाला. दीर्घकाळापासून तो एका आजाराशी झुंज देत होता. बंगळुरूमधील एका रुग्णालयात त्याने अखेरचा श्वास घेतला.

दिव्या भटनागर :
दिव्याचे ४ डिसेंबरला मुंबईत कोरोनामुळे निधन झाले. दिव्या टीव्ही क्षेत्रात प्रसिद्ध होती. तिने अनेक मालिकांमध्ये काम केले होते. तिच्या अचानक जाण्याने टीव्ही क्षेत्रावर शोककळा पसरली.

वीजे चित्रा :
प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री वीजे चित्रा ९ डिसेंबरला एका हॉटेलच्या रूममध्ये मृत अवस्थेत दिसली.

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा