Friday, July 5, 2024

काळजावर घाव करणारी बातमी! प्रसिद्ध विनोदी अभिनेता भूषण कडूच्या पत्नीचे निधन

‘बिग बॉस मराठी १’ फेम आणि विनोदी कलाकार भूषण कडू याच्या पत्नी कादंबरी कडूचे कोव्हिडमुळे निधन झाले आहे. अभिनेत्याने व त्याच्या पत्नीने काही दिवसांपूर्वी कोरोनाची चाचणी केली होती, जी पॉझिटिव्ह आली. भूषण बोरिवलीमध्ये एका रुग्णालयात दाखल होता. मात्र, पत्नीची प्रकृती गंभीर असल्याने तिला ठाण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हापासून कादंबरी या जीवघेण्या विषाणूशी झुंज देत होती. परंतु दुर्दैवाने, शनिवारी (२९ मे) तिने अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ३९व्या वर्षी ती हे जग सोडून गेली.

भूषणच्या एका जवळच्या मित्राने, ईटाइम्स टीव्हीशी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्याने सांगितले की, “भूषणची पत्नी कादंबरी कडू कोरोनामुळे निधन पावली. ती गेल्या काही दिवसांपासून त्या विषाणूशी लढा देत होती. अगोदर तिला ठाण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि नंतर केईएम रुग्णालयात हलविण्यात आले. दुर्दैवाने, तिने आज अखेरचा श्वास घेतला. भूषणसोबत पूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. भूषणला एक ७- ८ वर्षाचे मूलही आहे. त्याच्या संपूर्ण कुटुंबासाठी ही दुर्दैवी वेळ आहे. तिच्या आत्म्याला शांती लाभो.”

कादंबरी ही भूषणची दुसरी पत्नी होती. भूषणला प्रकिर्त कडू नावाचा एक मुलगा आहे. जेव्हा अभिनेत्याने बिग बॉसच्या घरात प्रवेश केला, तेव्हा त्याने चाहत्यांसोबत त्याच्या पत्नी आणि मुलाची ओळख करुन दिली होती.

भूषण कडू त्याच्या अनोख्या कॉमिक टायमिंगसाठी ओळखला जातो. टीव्ही शो ‘कॉमेडी एक्सप्रेस’ मध्ये काम केल्यानंतर, तो खूप प्रसिद्ध झाला. त्यानंतर ‘बिग बॉस मराठी’ च्या पहिल्या सीझन मध्ये सहभागी झाला होता. मात्र, लवकरच तो शोमधून आऊट झाला.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा