Wednesday, July 3, 2024

“आपल्या बुद्धीच्या पलीकडच्या गोष्टी…” मिलिंद गवळी यांच्या ‘त्या’ पोस्टने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष

मराठी मालिका विश्वातील अतिशय प्रभावी अभिनेते म्हणून मिलिंद गवळी यांची ओळख आहे. त्यांनी त्यांच्या अभिनयाने आणि त्यांच्या कमालीच्या फिटनेसने सगळ्यांचीच मनं जिंकून घेतली आहे. टोकाची नकारात्मक भूमिका साधत असत असूनही त्यांना मिळणारी लोकप्रियता भरवणारी आहे. मिलिंद यांची अजून एक ओळख म्हणजे त्यांच्यात असणारा हौशी लेखक. मिलिंद हे अभिनेते असले तरी ते उत्तम लेखक देखील आहे. ते त्यांच्या मनातील भावना, मतं, आठवणी अतिशय प्रभावी पद्धतीने मांडत लोकांपर्यंत पोहचवतात.

आता पुन्हा मिलिंद गवळी एक नवीन पोस्ट, नवीन आठवण घेऊन आले आहेत. आज जरी मिलिंद हे त्यांच्या मालिकेमुळे गाजत असले तरी त्यांनी काही वर्षांपूर्वी अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यातल्याच एका सिनेमाचा किस्सा त्यांनी या पोस्टमध्ये शेअर करत त्याच्याशी संबंधित त्यांच्या आईच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Milind Gawali (@milindgawali)

मिलिंद यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, ““आई”
“आई रेणुका लय भारी “
या चित्रपटाचा शूटिंग कोल्हापुरात झालं, काही भाग रेणुका आईच्या यल्लम्मा मंदिरात , सौंदत्ती कर्नाटका मध्ये झाला,
आणि या चित्रपटाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे अलकाताई कुबल यांनी या चित्रपटांमध्ये विलनची भूमिका केलेली आहे, अलकाताई विलन म्हणजे त्यांच्या सोशिक प्रतिमेच्या अगदी विपरीत अशी भूमिका.
हा चित्रपट आज शेमारू वर संध्याकाळी सहा वाजता वर्ल्ड प्रीमियर होणार आहे असं आमच्या प्रोड्युसराने म्हणजेच सांगलीचे अण्णासाहेब उपाध्ये यांनी मला सांगितलं, इतक्या वर्षानंतर हा चित्रपट लोकांसमोर आता येणार आहे म्हणून मला खूप छान वाटलं.
मी स्वतःला खरंच भाग्यवान समजतो कारण चित्रपटात काम करण्याच्या निमित्ताने मला या अशा पवित्र स्थळावर जायची संधी मिळाली आणि आई रेणुका यल्लमा देवीचे दर्शन छान पद्धतीने घेता येईल, माझी आई गेल्यानंतर ज्या ज्या वेळेला मी अशा ठिकाणी गेलोय तिथे मला माझ्या आईचा नेहमी भास होतो,
शूटिंगच्या दिवशी मी मेकअप करून मंदिरात पोचलो, रेनूका आईचं दर्शन घेतलं आणि शॉर्ट साठी वाट बघत होतो, मला आमचे डिरेक्टर म्हणाले “तुम्ही गाडीत बसा आमची तयारी झाली की तुम्हाला बोलवतो”, गाडीत बसून मनात विचार चालले होते की आज माझी आई असती आणि तिला कळलं असतं की मी रेणुका मंदिरात शूटिंग करतो आहे तर तिला खूप आनंद झाला असता, आणि काही क्षणातच एक गरीब म्हातारी बाई डोक्यावर एक टोपली घेऊन माझ्या समोर आली, ती कान्नडी भाषेमध्ये काहीतरी बोलायला लागली, ती काय बोलतेय हे मला काही कळलं नाही, मी पैसे काढून तिला द्यायला लागलो तर ती नाही पैसे नको आहेत असं म्हणाली, तिने टोपलीतून दोन भाकऱ्या काढल्या , त्याच्याबरोबर पिठलं आणि मेथीची भाजी त्या भाकऱ्यांवर ठेवली आणि त्या भाकऱ्या तिने मला दिल्या , मला म्हणाली “ईद्धनु तिन्नू”. ड्रायव्हर कानडी होता तो मला म्हणाला “ आजी म्हणतात खाऊन घे “
मी पैसे द्यायला लागलो तर आजी नको म्हणाली आणि भाकर्या देऊन निघून गेली. मी त्या मंदिराच्या परिसरात बसून त्या दोन्ही भाकऱ्या मनापासून खाल्ल्या.
अनेक वर्ष हे स्मरणात राहिलेलं, आज संध्याकाळी सहा वाजता हा सिनेमा जेंव्हा लोकांसमोर येत आहे असं मला जेव्हा कळलं, तेव्हा पटकन हि गोष्ट डोळ्यासमोरून गेली आणि ती वयस्कर बाई जिने मला भाकरी दिली ती पटकन डोळ्यासमोर येऊन गेली.
खरच काही गोष्टी आपल्या अकलनाच्या पलीकडच्या, आपल्या बुद्धीच्या पलीकडच्या गोष्टी असतात,
इतक्या वर्षानंतर “आई कुठे काय करते” चं यश आणि आजच्या दिवशी “आई रेणुका” च्या सिनेमा चं एका चॅनेलवर वर्ल्ड प्रीमियर.
या दोघांमध्ये सामान्य घटक काय असेल तर ते आहे
“आई” !

दरम्यान मिलिंद गवळी यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत त्यांच्या पोस्टवर आपली मतं दिली आहेत. सोबतच त्यांच्या या सिनेमाचे आणि लिखाणाचे कौतुक देखील केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-
तमन्नाला कुणी दिला जगातला पाचवा सर्वात मोठा हिरा? आकडा वाचून तुम्हालाही येईल आकडी
One Friday Night: रवीनाच्या नवीन सिनेमाचा टीझर रिलीज, सस्पेन्स आणि थ्रिलचा भडीमार; तुम्हीही पाहाच

हे देखील वाचा