Friday, July 5, 2024

आईसोबत बाजारात भाजी आणायला गेला संकर्षण कऱ्हाडे, भन्नाट कॅप्शनसह फोटो होतोय व्हायरल

मराठमोळा अभिनेता संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade) अभिनय, नाटक छोटया पडद्यांवरील भूमिका अशा प्रत्येक क्षेत्रात सध्या गाजताना दिसत आहे. संकर्षणच्या अभिनयाचे नेहमीच सोशल मीडियावर कौतुक होत असते. संकर्षण त्याच्या चित्रपटांतील अभिनयाइतकाच सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असतो. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन तो नेहमीच वेगवेगळ्या फोटो आणि पोस्ट शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. सध्या संकर्षण त्याच्या आईसोबत बाजारात गेलेला फोटो सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्याने या फोटोला दिलेला कॅप्शन सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. 

अभिनेता संकर्षण कऱ्हाडे त्याच्या अभिनयाइतकाच प्रतिभावान लेखक, आणि कवी म्हणूनही सर्वत्र लोकप्रिय आहे. त्याच्या अनेक कविता सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ज्यामधील त्याच्या  हळव्या कवी मनाचे नेहमीच कौतुक होताना दिसत असते. संकर्षण त्याच्या साध्या आणि गावाशी जुळलेला  कलाकार म्हणूनही प्रसिद्ध आहे. याचीच प्रचिती देणारी एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये संकर्षण त्याच्या आईसोबत बाजारात भाजी आणायला गेल्याचे दिसत आहे.

या व्हायरल होणाऱ्या फोटोसोबत संकर्षणने  “आई,  कित्ती वर्षांनी मी आई सोबत भाजी मंडईत पिशव्या उचलतोय,
भाजी घेतांनाचा आईचा कॉनफिडन्स त्याला तोड नाही, आईच्या हातची चव इतकी कमाल आहे की, भाज्या ओरडून ओरडून म्हणत होत्या आम्हाला घेउन जा,” असा मजेशीर कॅप्शन दिला आहे. संकर्षणची ही पोस्ट त्याच्या चाहत्यांना खूपच आवडली असून ते त्यावर जोरदार प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. दरम्यान अभिनेता संकर्षण कऱ्हाडे सध्या ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे. संकर्षणच्या या भूमिकेला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद पाहायला मिळत आहे.

हे देखील वाचा