Thursday, September 28, 2023

दहावीला असतानाच झाली होती दोघांची पहिली भेट, ‘अशी’ आहे प्रिया अन् उमेशची लव्हस्टोरी

मराठी चित्रपटसृष्टीत अनेक अभिनेत्री आहेत, त्यातील काही अभिनेत्री अशा आहेत, ज्यांचे केवळ नाव घेतले तरी त्यांचा चित्रपटसृष्टीतील सगळा प्रवास डोळ्यासमोर येतो. त्यांच्या कामाने त्यांनी सिनेरसिकांच्या मनात त्यांचे स्थान ध्रुव ताऱ्याप्रमाणे केले आहे. यातीलच एक म्हणजे अभिनेत्री प्रिया बापट होय. प्रियाने मराठी मालिका, मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट, नाटक, वेबसीरिज या सगळ्या माध्यमात काम करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. प्रेक्षक देखील नेहमीच तिच्या अभिनयाला भरभरून प्रतिसाद देत असतात. प्रिया सोमवारी (18सप्टेंबर ) तिचा 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. चला तर जाणून घेऊया तिच्याबाबत कधीही न ऐकलेल्या गोष्टी.

प्रिया बापटचा (Priya Bapat)जन्म 18 सप्टेंबर, 1986 रोजी मुंबई येथे झाला आहे. तिचे प्राथमिक तसेच महाविद्यालयीन शिक्षण देखील मुंबईमध्येच पूर्ण झाले आहे. तिने मास कम्युनिकेशनमध्ये पदवी संपादन केली आहे. शिक्षण पूर्ण करतानाच तिचा कल अभिनयाकडे होता. तिने 2000 साली तिच्या या अभिनयाच्या करिअरला सुरुवात केली. तिने ‘डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. त्यांनतर तिने ‘भेट’ या चित्रपटात काम केले. तिच्या अभिनयाचे कौशल्य पाहून तिला बॉलिवूडमधून देखील ऑफर आल्या. (Marathi actress priya bapat celebrate her birthday, let’s know about her)

तिने 2003 साली ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या चित्रपटात काम केले. त्यानंतर लगेच तिने ‘लगे रहो मुन्नाभाई’ या चित्रपटात देखील काम केले. यानंतर अभिनयाच्या रुळावरील तिची गाडी आणखीन धाव घेऊ लागली आणि तिला एका पाठोपाठ अनेक चित्रपटाच्या ऑफर आल्या. तिने ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘आनंदी आनंद’, ‘काकस्पर्श’, ‘टाईम प्लीज’, ‘आंधळी कोशिंबीर’, ‘हॅप्पी जर्नी’, ‘टाईमपास २’, ‘वजनदार’, ‘गच्ची’, ‘आम्ही दोघी’ या चित्रपटात काम केले.

चित्रपटासोबत प्रियाने छोट्या पडद्यावर काम करून देखील प्रेक्षकांचे प्रेम मिळवले आहे. तिने ‘शुभमकरोति’, ‘अधुरी एक कहाणी’, ‘बंदिनी’, ‘दामिनी’, ‘दे धमाल’, ‘आभाळमाया’ यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. सोबतच तिने ‘मायानगरी’, ‘सिटी ऑफ ड्रीम्स’, ‘आणि काय हवं’ या वेबसीरिजमध्ये काम केले आहे. या वेबसीरिजच्या पुढच्या दोन सिझनमध्ये देखील प्रियाने काम केले आहे. ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या वेबसीरिजमधील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले आहे.

प्रिया बापटने अभिनेता उमेश कामत याच्याशी 2011मध्ये विवाह केला आहे. प्रिया आणि उमेश हे सध्या इंडस्ट्रीमधील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहे. प्रिया जेव्हा इयत्ता दहावीला होती, तेव्हा उमेश आणि तिची पहिली भेट झाली होती. त्या दोघांच्या वयामध्ये आठ वर्षाचे अंतर आहे. ती 19 वर्षाची असताना ते दोघे रिलेशनमध्ये आले होते. नंतर काही वर्षांनी सप्तपदी चालून त्यांनी त्यांचे प्रेम पूर्णत्वाला नेले. प्रिया आणि उमेशने ‘टाईमप्लीज’ आणि ‘भेट’ या दोन चित्रपटात एकत्र काम केले आहे. तसेच त्यांनी ‘आणि काय हवं’ या वेबसीरिजमध्ये देखील एकत्र काम केले आहे. त्या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना नेहमीच आवडते.

हेही नक्की वाचा-
देसी गर्लने पतीला दिल्या अनोख्या अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा, लिपलॉकचे फोटो झाले व्हायरल
नुसरत भरुचाचे ‘हे’ बोल्ड फोटो पाहणार असाल तर एकट्याच पाहा बरं का!

हे देखील वाचा