×

मदर्स डेच्या निमित्ताने प्रिया बापटने आई आणि वडिलांना उद्देशून शेअर केली भावनिक पोस्ट, म्हणाली…

आज (८ एप्रिल) सर्वत्र मदर्स डे साजरा केला जात आहे. आईबद्दल आपल्या मनात असणारे प्रेम, कृतज्ञता, आदर व्यक्त करण्यासाठी सर्वच लोकं सोशल मीडियावर त्यांच्या भावना व्यक्त करताना दिसत आहे. कलाकार देखील आज सोशल मीडियावर त्यांच्या आईच्या आठवणी शेअर करत आईसोबतचे फोटो शेअर करत आहे. आजच्या दिवसाचे औचित्यसाधत मराठी मनोरंजनविश्वातील आघाडीची अभिनेत्री असलेल्या प्रिया बापटने देखील तिच्या आईबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. मात्र प्रियाची ही पोस्ट इतर कलाकारांच्या पोस्टपेक्षा अधिक वेगळी आणि गाजत आहे, याचे कारण म्हणजे आजच्या दिवशी मदर्स डे सोबत तिच्या वडिलांचा वाढदिवस देखील असल्यामुळे तिने आई आणि वडिलांना उद्देशून एक सुंदर पोस्ट शेअर करत तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

प्रिया बापटने तिच्या आईबाबांचा एक जुना फोटो आणि आई बाबांसोबतच प्रिया आणि तिच्या बहिणीचा फोटो शेअर केला आहे. प्रिया बापटने तिच्या पोस्टमध्ये लिहिले, “प्रिय आई – बाबा,
बाबा, वडील म्हणून, मुलगा म्हणून तुम्ही बेस्ट आहातच आणि कायम असाल. पण, तुमच्या आणि आईच्या ३८ वर्षांच्या संसारात तुम्ही सर्वांत बेस्ट होतात. आर्थिक बाजू तर तुम्ही सांभाळलीच पण सांसारिक सर्व जबाबदार्यांमधे तुमच्या आणि आईच्या पार्टनरशिपला तोड नाही. मुलांचे लाडही दोघांनीही केले आणि आोरडाही दोघांनीही दिला. शाबासकी, कौतुक दोघांनी केलं. अगदी आई घरी नसताना स्वयंपाकाही केलात आणि कधीही अवलंबून न राहण्याची शिकवण दिलीत. आर्थिक अडचण आोढवल्यावर मॅट्रीकही न झालेली आईने घराबाहेर पडून तुमच्या बरोबरीने काम करून आर्थिक जबाबदारी पार पाडली. एरवी नाजूक तब्बेतीची आई तुम्हाला जरा बरं नाहीसं झालं तर सगळं बळ एकवटून झाशीची राणी व्हायची. आणि आईसाठी तुम्ही जे गेली ३ वर्ष केलत, तिची सेवा, प्रेम ते क्वचितच कोणी नवरा आपल्या बायकोसाठी करत असेल. इतकं निस्वार्थ प्रेम.”

View this post on Instagram

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

पुढे प्रियाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले, “तुम्हा दोघाची मुलं म्हणून श्वेता आणि मी जन्माला आलो, तुमच्या सारख्या आई वडिलांची सेवा करता येणं हेच आमच्या जन्माचं सार्थक आहे. आईची कमतरता कायमच जाणवेल. आज तुमच्या वाढदिवशी Mother’s Day आहे म्हणून दोन्ही शुभेच्छा तुम्हालाच आईकडे आता जादूची कांडी आहे, तुमच्या कडे आशिर्वाद आहेत. ते दोन्ही आमच्या पाठीशी असू देत. तुम्हाला उत्तम आरोग्य आणि दिर्घायुष्य लाभो.” प्रियाच्या या पोस्टवर अनेक कलाकार आणि तिचे फॅन्स कमेंट्स करत आहे.

प्रियाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर तिने मालिका, चित्रपट, नाटकं, वेबसिरीज आदी मनोरंजनविश्वातील सर्वच माध्यमांमध्ये काम केले. यासोबतच तिने हिंदीमध्ये देखील काम करत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. आता प्रियाने निर्मिती क्षेत्रात देखील पदार्पण केले असून, तिची निर्मिती असलेले ‘दादा एक गुड न्यूज आहे’ नावाचे नाटकं तुफान गाजत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

Latest Post