मिका सिंगला घाबरून केआरकेने सोडले घर; गायक म्हणाला, ‘तुला धडा शिकवायचा होता…’


मागच्या अनेक दिवसांपासून कमाल आर खान वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. बॉलिवूडच्या अनेक कलाकारांसोबत पंगा घेतलेला केआरके हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. आधी सलमान खानला त्याच्या आणि त्याच्या राधे चित्रपटावरून बोल लावणाऱ्या केआरकेवरच्या आरोपांविरोधात मिका सिंगने सलमानला पाठिंबा दिला होता. यावर केआरकेने मिकाला त्याच्या ट्विटमध्ये चिरकूट आणि लुख्खा गायक म्हटले होते. आता केआरकेच्या या आरोपांवर मिकाने समोर येत जशाच तसे उत्तर दिले आहे.

मिकाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यात मिका केआरकेच्या मुंबईमध्ये असलेल्या घराच्या बाहेर उभा आहे. यात तो केआरकेला त्याच्या घरी पुन्हा परतण्याबद्दल बोलत आहे. मिका या व्हिडिओमध्ये म्हणतोय, “हे केआरकेचे घर होते, या घराच्या बाहेर केआरके देखील लिहिले होते. आता मी हे नाही सांगू शकत की तो मला घाबरून पळून गेला आहे की, त्याच्या वैयक्तिक कारणामुळे माहित नाही. मात्र, आता त्याने या घराबाहेर असलेला नावाचा बोर्ड काढून टाकला आहे. केआरके तू कायमच माझा मुलगा राहशील. माझा तुझ्याशी कोणताही वाद नाही. तू हे घर विकून टाकले आहेस. मात्र, आता जेवढे घरं बाकी आहेत ते विकू नकोस. तुझ्याशी माझे वैयक्तिक भांडण नाही, मला तू बिल्कुल घाबरू नकोस. तुला धडा शिकवायचा होता. मात्र, इतका मोठा नाही की तू तुझे घरच विकून जावे.”

मिकाचा हा व्हिडिओ पाहून एका चाहत्याने एक व्हिडिओ शेअर करत मिकाला ट्वीट केले आहे की, “मिका पाजी केआरकेसोबत हिंदी सिनेसृष्टीतील करण जोहर, शाहरुख खान आदी कलाकार जे करू शकले नाही ते तुम्ही करून दाखवले.”

या ट्विटला उत्तर देताना मिकाने लिहिले, “अरे भावा ते सर्व त्यांच्या आयुष्यात व्यस्त आहेत. आता उरला प्रश्न घर विकायचा, तर भावा आम्ही पंजाबी लोकं कोणासोबत वाद उकरून काढत नाही, आणि जर कोणी स्वतःहून वाद सुरू केला तर तुम्हाला सर्व माहीतच आहे. असो, तो माझा मुलगा आहे. माझी त्याच्यासोबत वाद किंवा भांडण करण्याची कोणतीच इच्छा नाही.”

सलमान खानने काही दिवसांपूर्वी केआरकेवर मानहानीचा गुन्हा दाखल केला होता. याचे कारण म्हणजे त्याने सलमान खानवर भ्रष्ट असल्याचा आणि बिइंग ह्युमनवर मनी लाँड्रिंगचा आरोप केला. यावर मिकाने केआरकेला धडा शिकवायला सलमानने उशीर केल्याचे म्हटले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.