‘जाम टेन्शन आलं होतं पण त्यांनी सहजपणे आपलंसं केलं’, म्हणत भरत जाधवकडून अशोक मामांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

actor bharat jadhav and sachin pilgaonkar give birthday wishes to ashok saraf


मराठी चित्रपटसृष्टीतील ‘मामा’ म्हणजेच दिग्गज अभिनेते अशोक सराफ. केवळ मराठीच नव्हे तर बॉलिवूडमध्येही अभिनय करून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. विनोदी पण दमदार अशा अभिनयाने, त्यांनी तब्बल तीन दशके प्रेक्षकांचे मनोरंजन केले. आज म्हणजेच ४ जून रोजी, अशोक सराफ त्यांचा ७४ वा वाढदिवस साजरा करत आहेत.

अशोक सराफ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, त्यांच्यावर सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. चाहत्यांपासून ते मोठमोठ्या कलाकारांपर्यंत सर्वजण त्यांना भरभरून शुभेच्छा देत आहेत. एवढेच नव्हे तर त्यांच्या पोस्ट देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सुप्रसिद्ध अभिनेता सचिन पिळगावकर यांनीही अशोक सराफ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी इंस्टाग्रामवर त्या दोघांचा फोटो शेअर करून, अशोक यांचे अभिनंदन केले आहे. फोटोखाली कॅप्शनमध्ये सचिन यांनी लिहिले आहे की, “माझ्या प्रिय मित्रा, माझा सहकलाकार आणि एक उत्तम अभिनेता म्हणून मी तुला पाहतो. खूप साऱ्या आठवणी. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अशोक.” सचिन आणि अशोक यांनी ‘गंमत जंमत’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘नवरा माझा नवसाचा’, ‘माझा पती करोडपती’ अशा चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.

इतर कलाकारांप्रमाणे, अशोक यांचे सहकलाकार आणि अभिनेता भरत जाधव यांनी देखील त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. भरत यांनी त्या दोघांचा एक फोटो शेअर करत, कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “हिरो म्हणून करिअरचा पहिलाच सिनेमा ‘चालू नवरा भोळी बायको’ आणि समोर सहकलाकार होते दस्तुर खुद्द अशोक सराफ..! सुरुवातीला जाम टेन्शन आल होत पण त्यांनी सहजपणे आपलंसं केलं. जितक्या सहजतेने गेली ४ दशकांहून अधिक त्यांनी महाराष्ट्राला खळखळून हसवलं. त्यांच्याबद्दल लिहावं बोलावं तितकं कमीच आहे. त्यांच्या ‘आयत्या घरात घरोबा’ सिनेमातला शेवटचा सीन खुप सुंदर आहे. हातातली छत्री गोल गोल फिरवत जाणाऱ्या अशोक मामांकडे बोट दाखवत सचिनजी म्हणतात, बघितलंस मधुरा, सर्वांच्या आयुष्यात आनंद वाटून जगातला सर्वात मोठा श्रीमंत चाललाय! खुप खरं आहे ते. अशोक मामा तुमच्या सारखा श्रीमंत माणूस शोधूनही सापडणार नाही.

तसेच भरत आणि अशोक यांनी ‘लपून छपून’, साडे माडे तीन’, ‘निशाणी डावा अंगठा’, ‘टाटा बिर्ला आणि लैला’ या चित्रपटांमध्ये  स्क्रिन शेअर केली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.