Saturday, June 29, 2024

हसवण्यासोबतच मातृत्वाची एक वेगळीच बाजू दाखवणारा संवेदनशील सिनेमा ‘मिमी’; पंकज त्रिपाठी- क्रिती सेननच्या अभिनयाने जिंकली मने

मागच्याच आठवड्यात क्रिती सेननचा बहुप्रतीक्षित आणि बहूचर्चित ‘मिमी’ हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. जेव्हापासून सिनेमाची घोषणा झाली तेव्हापासूनच या सिनेमाबद्दल सर्वांमध्ये खूपच उत्सुकता दिसून आली. मराठी सिनेमा ‘मला आई व्हायचंय’चा हिंदी रिमेक असणारा ‘मिमी’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांमध्ये असणारी उत्सुकता अधिकच वाढली. ‘सेरोगेट मदर’ या अत्यंत संवेदनशील आणि महत्वाच्या मुद्द्यावर भाष्य करणारा हा सिनेमा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘मिमी’ हा चित्रपट हसतहसत महत्वाच्या विषयाला हात घालतो. हा सिनेमा प्रदर्शित होताच रसिकांकडून आणि समीक्षकांकडूनही अतिशय चांगल्या आणि सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. अतिशय वेगळा पठडीबाहेर विषय असलेला ‘मिमी’ प्रेक्षकांना चांगलाच भावला आहे.

या सिनेमाची कथा अतिशय साधी, मात्र तरीही मनाला भावणारी आहे. कथा राजस्थानमध्ये घडते. मिमी (क्रिती सेनन) ही राजस्थानातील मोठ्या हॉटेल्समध्ये तिच्या डान्सने येणाऱ्या सर्व पर्यटकांचे मनोरंजन करते. मिमीचे वडील (मनोज पहावा) आणि आई (सुप्रिया पाठक) हे साधारण मध्यमवर्गीय कुटुंबातील जोडपे असल्याने, त्यांचे विचारही खूप साधे आणि सामान्य असतात. मिमीची जिवलग मैत्रीण शमा (सई ताम्हणकर). मिमीला बॉलिवूडची मोठी अभिनेत्री व्हायचे असते. हे एकच स्वप्न डोळ्यात साठवून मिमी प्रवास करत असते. तिला तिचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भरपूर पैशांची गरज असते. भानुप्रताप पांडे (पंकज त्रिपाठी) हा एक टॅक्सी ड्रायव्हर आहे. तो एक दिवस एक परदेशी जोडप्यांचे भाडे घेऊन मिमीच्या गावी जातो.

हे परदेशी जोडपे एका सेरोगेट मदरच्या शोधात असते. या जोडप्याला चांगली मुलगी मिळवून दिल्यास भानूला भरपूर पैसे मिळणार असतात. त्यासाठी भानू त्यांना मदत करतो. भानू त्यांना मिमीची ओळख करून देतो आणि सेरोगसीसाठी त्यांना मिमी आवडते. भानू मिमीला या कामासाठी २० लाख रुपयांची ऑफर देतो. बॉलिवूडचे स्वप्न या पैशातून पूर्ण होईल असे वाटत ती ही ऑफर स्वीकारते. मिमीची गर्भधारणा झाल्यानंतर काही दिवसांनी परदेशी जोडप्याला समजते की, होणारे बाळ मानसिकदृष्ट्या अपंग असणार आहे. हे ऐकून हे विदेशी जोडपे बाळ न घेताच भारतातून निघून जाते. यानंतर मिमीचा खरा प्रवास सुरु होतो. तिला बाळ होते, ते खरंच अपंग असते का?, तिच्या घरी खरे समजते का? पुढे मिमी बाळाचे काय करते? या सर्वांमधे पंकज त्रिपाठी आणि सई ताम्हणकर कसे तिला मदत करतात? या अशा अनेक प्रश्नांसाठी आपल्याला सिनेमा पाहावा लागेल.

या सिनेमात सर्वांचा अभिनय अतिशय प्रभावी आणि जिवंत आहे. या सर्वांमध्ये पंकज त्रिपाठी चांगलाच भाव खाऊन जातो. इतर सर्व कलाकारांचा अभिनय देखील उत्तम झाला आहे. लक्ष्मण उतेकरचा दिग्दर्शनातला अनुभव आणि त्याचा बारीक अभ्यास या सिनेमातून दिसून येत आहे. एकूणच काय तर हा सिनेमा तुम्हाला भरपूर हसवणारा, सोबतच रडवणारा आणि विचार करायलाही भाग पडणारा आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘…माझ्या मुलांसाठी आमच्या खासगी आयुष्याचा आदर करा’; ट्रोलिंगला कंटाळलेल्या शिल्पाने सोशल मीडियावर जारी केले स्टेटमेंट

-‘ये लाल इश्क, ये मलाल इश्क’, लाल साडीत खुललं आर्चीचं सौंदर्य; फोटोमधील लूकने चाहत्यांना पाडली भुरळ

-रणवीर सिंग का घालतो ‘असे’ कपडे? अभिनेत्याने स्वत: सांगितले त्याच्या अतरंगी फॅशन सेन्समागचे कारण

हे देखील वाचा