Tuesday, April 23, 2024

पुण्यातून अभिनयाचे धडे गिरवणारे मिथुन चक्रवर्ती आहे तब्बल 292 कोटींच्या संपत्तीचे मालक, भावाच्या मृत्यूनंतर सोडला होता नक्षलवाद

हिंदी सिनेसृष्टीत ऐंशी आणि नव्वदच्या दशकात अनेक मोठे कलाकार होऊन गेले आणि आहेत, ज्यांनी त्यांच्या अभिनयाने चित्रपटांना आणि अभिनयाला एक उंची प्राप्त करून दिली. शिवाय याच दशकांमध्ये सिनेमातील गाण्यांमध्ये डान्स ही व्याख्या फिट होऊ लागलीय. ऐंशी आणि नव्वदच्या आधी देखील सिनेमांमध्ये डान्स असायचे. मात्र, ते डान्स तेवढ्यापुरते होते. या दशकातील कलाकारांनी देखील डान्सला चित्रपटांमध्ये महत्त्व मिळवून देण्यास मोठा वाटा उचलला. याच दशकात ‘डिस्को डान्सर’ म्हणून एका नवीन अभिनेत्याचा उदय झाला, आणि तो अभिनेता म्हणजे मिथुन चक्रवर्ती.

मिथुन चक्रवर्ती (mithun chakraborty) यांनी आपल्या अभिनयाने, डान्सने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले. त्यांचा डान्स पाहून अनेक तरुणी त्यांच्यासाठी वेड्या व्हायच्या. मिथुन यांना त्यांचा भारदस्त आवाज आणि डान्ससाठी ओळखले जायचे. शुक्रवारी(16 जून)ला मिथुन चक्रवर्ती आपला 72वा वाढदिवस साजरा करत आहेत. 16 जून, 1950रोजी बांग्लादेशमध्ये मिथुन यांचा जन्म झाला. त्यांचे खरे नाव गौरंगा चक्रवर्ती. त्यानंतर त्यांचं कुटुंब भारतात स्थलांतरित झालं. अभिनय क्षेत्रात येण्याआधी मिथुन चक्रवर्ती एका नक्षलवादी समूहात कार्यरत होते. मात्र, एका अपघातात मिथुन चक्रवर्ती यांच्या भावाचं निधन झालं. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी मिथुन यांच्यावर आली. त्यामुळे त्यांनी नक्षलवाद सोडला आणि ते पुन्हा कुटुंबीयांकडे आले.

मिथुन चक्रवर्ती यांना लहानपणापासूनच डान्सची आवड होती. त्यामुळे सुरुवातीच्या काळात ते अनेक डान्स शो करत. मिथुन यांनी हेलन यांना देखील डान्समध्ये असिस्ट केलं होतं. कोलकाता इथं केमिस्ट्रीमध्ये पदवीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते पुण्यात आले. पुण्यातील फिल्म इन्स्टिट्युटमध्ये त्यांनी अभिनयाचे धडे गिरवले.

सन 1976मध्ये ‘मृगया’ सिनेमातून त्यांनी त्यांची अभिनयाची कारकीर्द सुरु केली. त्यांनी त्यांच्या पहिल्याच सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार पटकावत त्यांच्यातील अभिनयाची ताकद सर्वाना दाखवली. त्यांनी त्यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीमध्ये बंगाली, हिंदी, ओड़िया, भोजपुरी, तमिळ, तेलुगु, कन्नड, पंजाबी अशा भाषांमधील 350पेक्षा अधिक सिनेमांमध्ये काम केले.

मिथुन चक्रवर्ती हे त्यांच्या करियरमध्ये यशस्वी होत असतानाच दुसरीकडे त्यांचे वैयक्तिक आयुष्य देखील जोरदार गाजले होते. मिथुन यांचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले. मात्र, त्यांच्या आणि श्रीदेवीच्या नात्याची चर्चा खूप झाली. मिथुन आणि श्रीदेवी यांची पहिल्यांदा भेट 1984 साली आलेल्या ‘जाग उठा इंसान’ सिनेमाच्या सेटवर झाली. त्यानंतर या सिनेमादरम्यान ते जवळ आले आणि मीडियामध्ये त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगायला लागल्या. एका मुलाखतीदरम्यान मिथुन यांनी मान्य केले होते की, त्यांनी श्रीदेवी यांच्याशी लग्न केले होते.

मात्र, त्यांचे लग्न फक्त 3 वर्षच टिकले. माध्यमांतील वृत्तानुसार, श्रीदेवी आणि मिथुन यांच्या लग्नाबद्दल मिथुन यांच्या पत्नी असलेल्या योगिता बाली यांना समजले आणि त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेमुळे मिथुन यांनी त्यांच्या आणि श्रीदेवी यांच्या नात्यातून माघार घेतली, आणि ते पुन्हा त्यांच्या परिवाराकडे आणि मुलाकडे परत आले. दुसरीकडे श्रीदेवी यांनी 1996मध्ये बोनी कपूर यांच्याशी लग्न केले.

मिथुन यांचे पहिले लग्न हेलेना ल्यूक यांच्यासोबत झाले होते. हेलेना फॅशन इंडस्ट्रीमधले मोठे नाव होत्या. त्यांनी अनेक सिनेमात काम केले. मात्र, त्या जास्त काळ बॉलिवूडमध्ये राहिल्या नाहीत. या दरम्यानच मिथुन आणि हेलेना प्रेमात पडले. मिथुन त्यांच्या प्रेमात वेडे झाले होते. या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांचे लग्न टिकले नाही. अवघ्या चारच महिन्यात त्यांनी घटस्फोट घेतला.

मिथुन यांच्यासाठी 1993 ते 1998 हा काळ सर्वात कठीण होता. कारण या दरम्यान त्यांचे एक दोन नव्हे, तर तब्बल 33सिनेमे लगातार फ्लॉप ठरले. मात्र, तरीही त्यांचे स्टारडम कमी झाले नाही. या काळातही त्यांनी 12 सिनेमे साईन केले होते.

मिथुन यांनी 1979मध्ये योगिता बाली यांच्याशी लग्न केले. त्या लग्नाला अनेक मोठमोठे कलाकार आले होते. मात्र, किशोर कुमार या लग्नामुळे नाराज झाले होते. कारण 1976साली किशोर कुमार यांनी योगिता बाली यांच्यासोबत लग्न केले होते. मात्र, दोनच वर्षात त्यांनी घटस्फोट घेतला. या घटस्फोटाला मिथुन जबाबदार असल्याचे मानले. पुढे त्यांनी मिथुन यांच्यासाठी कधीच गायन न करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय त्यांनी स्वतःच काही वर्षात संपुष्टात आणला आणि मिथुन यांच्यासाठी त्यांनी गायन केले.

चित्रपटांमधील अभिनयासोबतच मिथुन यांनी एक यशस्वी व्यासायिक म्हणून देखील त्यांची एक ओळख निर्माण केली. मिथुन हे आजच्या घडीला 100कोटींपेक्षा अधिक संपत्तीचे मालक आहेत. 2014साली त्यांनी राज्यसभेत सादर केलेल्या ऍफेडेव्हिट नुसार 2012-2013 आली त्यांचे वार्षिक उत्पन्न 10 कोटी एवढे होते, तर त्यांच्या पत्नीचे योगिता बाली यांचे उत्पन्न 12 लाख एवढे होते. मिथुन 60 कोटींपेक्षा अधिक चल संपत्तीचे मालक असून, त्यांची पत्नी 2 कोटींपेक्षा अधिक संपत्तीची मालकीण आहे.

त्यांच्या अचल संपत्तीबद्दल सांगायचे झाले, तर त्यांच्याकडे 28 कोटींपेक्षा अधिकची आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर 10 कोटींपेक्षा अधिक अचल संपत्ती आहे. त्यांच्याकडील चल संपत्तीमध्ये शेत जमीन, कमर्शियल बिल्डिंग, रहिवासी बिल्डिंग आहे. सोबतच त्यांच्याकडे अनेक मर्सिडीज, फोक्सवॅगन, इनोव्हा, फॉर्च्युनर अशा काही पॉश गाड्या देखील आहेत. एका वृत्तानुसार, त्यांच्याकडे 292कोटी रुपयांची संपत्ती आहे. मिथुन हे मोनार्क ग्रुप ऑफ हॉटेल्सचे मालक असून मुंबईसोबतच उटी, मसुरी आदी अनेक ठिकाणी त्यांची मोठमोठी हॉटेल्स आहेत.

मिथुन आणि योगिता चक्रवर्ती यांना महाअक्षय चक्रवर्ती, नमाशी चक्रवर्ती, ऊष्मी चक्रवर्ती हे तीन मुले असून दिशांनी नावाची एक मुलगी आहे. मिथुन आणि योगिता यांनी दिशानीला दत्तक घेतले आहे.(mithun chakraborty birthday special know unknown fact about his life)

अधिक वाचा
अरमान मलिकचा भाऊ देखील आहे प्रसिद्ध गायक, सलमान खानच्या ‘या’ चित्रपटात गायली आहेत गाणी
श्रीदेवीशी केले गुप्तपणे लग्न, एकेकाळी होता नक्षलवादाशी संबंध; वाचा मिथुन चक्रवर्तींचे न ऐकलेले किस्से

हे देखील वाचा