प्रियदर्शनने (Priydarshan) ‘पूचक्कोरू मुक्कुथी’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. आता तो आपला १०० वा चित्रपट घेऊन येत आहे. आपल्या १०० व्या चित्रपटात प्रियदर्शन त्याच अभिनेत्यासोबत काम करणार आहे, ज्याच्यासोबत त्याने पदार्पण केले होते.
प्रियदर्शन आणि मोहनलाल ही एक खास जोडी आहे, कारण प्रियदर्शनच्या पदार्पणाच्या ‘पूचक्कोरू मुक्कुथी’ या चित्रपटातही मोहनलालनेच मुख्य भूमिका साकारली होती. आता मोहनलाल आपल्या १०० व्या चित्रपटातही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
प्रियदर्शन यांच्या १०० व्या चित्रपटाचे शीर्षक अद्याप निश्चित झालेले नाही. तो एक विनोदी चित्रपट नसून, एक संगीतप्रधान चित्रपट असू शकतो. चित्रीकरण लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे, शक्यतो २०२६ च्या सुरुवातीलाच. अँटनी पेरुंबावूर यांची कंपनी या चित्रपटाची निर्मिती करणार असून, बिनू जॉर्ज अलेक्झांडर सह-निर्माते असतील.
\मोहनलाल यांनी इन्स्टाग्रामवर चित्रपटाबद्दल एक भावनिक पोस्ट शेअर केली. त्यांनी लिहिले की, हा क्षण केवळ एका व्यक्तीचा नाही, तर हा प्रवास अनुभवलेल्या प्रत्येकाचा आहे. त्यांनी प्रियदर्शन यांचे अभिनंदन केले आणि म्हटले की, १०० चित्रपट हा केवळ एक आकडा नाही, तर आयुष्यभराची आवड, समर्पण आणि सिनेमाची जादू आहे. या ऐतिहासिक चित्रपटाचा भाग असल्याचा त्यांना खूप आनंद आणि सन्मान वाटतो.
प्रियदर्शन यांनी १९८४ मध्ये ‘पूचक्कोरू मुक्कुथी’ या विनोदी चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. त्यांनी आपल्या पहिल्याच चित्रपटात मोहनलाल यांना मुख्य अभिनेता म्हणून घेतले. त्या दिवसापासून मल्याळम चित्रपटसृष्टीतील त्यांच्या सहकार्याची सुरुवात झाली, जे आता त्यांच्या १०० व्या चित्रपटापर्यंत पोहोचले आहे.










