अभिजित पानसे दिग्दर्शित ‘रानबाजार’ या वेबसीरिजचा टिझर आला आणि एकच धमाका झाला. प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडित यांच्या बोल्ड अवताराने चांगलाच बज निर्माण केला. या सिरीजची सोशल मीडियावर खूपच चर्चा होत आहे. रानबाजारचे दोन टिझर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित केले गेले आणि चर्चांना चांगलेच उधाण आहे. अतिशय बोल्ड असणारी ही सिरीज वेबविश्वाला हादरवून टाकणारी असल्याचे देखील म्हटले जात आहे. या सीरिजच्या टीझरनंतर सर्वांनाच उत्सुकता होती ती सीरिजच्या ट्रेलरची. आता या सिरीजचा उत्कंठावर्धक असा ट्रेलर देखील प्रदर्शित कऱण्यात आला आहे.
टिझर सारखाच ट्रेलरमध्ये तेजस्विनी आणि प्राजक्ता यांचा कमालीचा बोल्ड अवतार पाहायला मिळत आहे. या सिरीजच्या ट्रेलरची सुरुवात होते ती मकरंद अनासपुरेच्या आवाजाने. ट्रेलरनुसार तेजस्विनी आणि प्राजक्ता या दोघी देहविक्री करणाऱ्या दाखवल्या आहेत. तेजस्विनी ही मॉडर्न आणि हायक्लास देहविक्री करणारी महिला दिसत असून, प्राजक्ता रेडलाईट भागात राहणारी आहे. या सिरीजमध्ये प्रेक्षकांना पॉलिटिकल क्राइमचा थरार अनुभवायला मिळणार आहे. एका मोठ्या पॉलिटिकल क्राइमभोवती या सिरीजची कथा फिरताना दिसते.
सिरीजमध्ये अनेक मोठमोठे कलाकार महत्वाच्या भूमिकेत आहे. प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडीत यांच्याबरोबर डॉ. मोहन आगाशे, मोहन जोशी, सचिन खेडेकर, अनंत जोग, जयंत सावरकर, मकरंद अनासपूरे, वैभव मांगले, माधुरी पवार, उर्मिला कानेटकर, सुरेखा कुडची, जयवंत वाडकर, नम्रता गायकवाड, अशी तगडी मंडळी सिरीजमध्ये दिसणार आहे.
मुख्य म्हणजे या सिरीजमध्ये सत्य घटनांचा संदर्भ घेतल्याचा आणि मराठी वेबसीरिजच्या विश्वात इतका बोल्ड, संवेदनशील विषय हातळण्याची ही पहिलीच वेळ असल्याचा दावा दिग्दर्शक आणि निर्मात्यांकडून करण्यात आला आहे. या सिरीजचा टिझर आल्यानंतर प्राजक्ता आणि तेजस्विनी यांना सोशल मीडियावर तुफान ट्रोल केले गेले. दोघींनाही एवढ्या बोल्ड रूपात पाहिल्यावर त्यांच्यावर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला. मात्र दोघीनी देखील त्याकडे दुर्लक्ष करत भूमिकेची गरज असल्याचे सांगितले तर काहींनी त्याच्या या भूमिकेचे कौतुक देखील केले आहे. रेगे आणि ठाकरे या चित्रपटांच्या यशानंतर अभिजीत पानसे यांची रानबाजार ही वेबसीरीज येत्या २० मेला रिलीज होणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा