Thursday, March 28, 2024

बंगाली अभिनेत्रीच्या आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, ‘लिव्ह इन पार्टनर’ला अटक

प्रसिद्ध बंगाली टीव्ही अभिनेत्री पल्लवी डे (Pallavi Dey) (वय २५) हिचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याच्या बातमीने चांगलीच खळबळ माजली होती. पल्लवीचा मृतदेह रविवारी सकाळी कोलकाता येथील गरफा भागात असलेल्या एका फ्लॅटमध्ये फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्या फ्लॅटमध्ये पल्लवी तिच्या लिव्ह-इन-पार्टनरसोबत राहत होती. त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. घटनास्थळावरून कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नव्हती. आता या प्रकरणात नवीन ट्विस्ट समोर आला असून, पल्लवीचा प्रियकर शग्निक चक्रवर्तीला या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

अभिनेत्री पल्लवी डेच्या आई वडिलांनी शग्निक चक्रवर्ती विरोधात न्यायालयात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी या प्रकरणात शग्निक चक्रवर्तीची कसून चौकशी केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. अभिनेत्रीच्या आई वडिलांनी तिच्या मृत्यूनंतर शग्निक चक्रवर्तीनेच तिची हत्या केल्याचे आरोप लावले होते. प्राथमिक तपासात पोलिसांना समजले आहे की, शनिवारी रात्री पल्लवीचा तिच्या लिव्ह-इन-पार्टनरसोबत वाद झाला होता. त्याची पोलीस ठाण्यात चौकशी करण्यात येत आहे.

पल्लवी ही लोकप्रिय टीव्ही मालिका ‘मोन माने ना’ची मुख्य अभिनेत्री होती. दोन दिवसांपूर्वी १२ मे रोजी तिने शेवटचे शूटिंग केले. मृत्यूच्या १८ तास आधी तिने आपल्या लिव्ह-इन पार्टनरसोबत वीकेंडमध्ये एकत्र घालवलेल्या क्षणांचे काही फोटो पोस्ट केले होते.

पोलिसांनी पल्लवीचे पोस्टमार्टम केल्यानंतर तिने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले होते. मात्र तिच्या आईवडिलांनी घातपाताचा संशय व्यक्त केला होता. दरम्यान पल्लवी ‘रेशम झंपी’ या बंगाली मालिकेने घराघरात लोकप्रिय झाली होती. यानंतर तिने ‘आमी सिराजेर बेगम’ या मालिकेत काम केले, मात्र ही मालिका फार काळ चालली नाही. सध्या ती ‘मोन माने ना’ मध्ये मुख्य भूमिकेत होती. मात्र त्याआधीच या अभिनेत्रीच्या मृत्यूची बातमी समोर आल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा