Monday, July 1, 2024

‘महानायका’च्या सुरेक्षत तैनात असलेला पोलीस हेड कॉन्स्टेबल निलंबित; वर्षाला कमवायचा १.५ कोटी?

बॉलिवूड कलाकारांच्या सुरक्षेचा मुद्दा हा कळीचा विषय असतो. त्यांच्या सुरक्षेसाठी बॉडीगार्डसोबतच पोलीस अधिकारीही तैनात असतात. हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांना एक्स कॅटेगरीमधील सुरक्षा पुरवली जाते. त्यांच्या चारही बाजूंना चार लोक असतात. त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एका माजी कान्स्टेबलबद्दल मोठी बातमी समोर येत आहे, जी वाचून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल. 

खरं तर अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या माजी कॉन्स्टेबलने १ कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली आहे. यामुळे त्या कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आलं आहे. एका अधिकाऱ्याने बुधवारी (१६ फेब्रुवारी) सांगितले की, मुंबई पोलीसमधील एक कॉन्स्टेबल, ज्याने ऑगस्ट २०२१ पर्यंत अमिताभ बच्चन यांचा बॉडीगार्ड म्हणून काम केले होते, त्याला कथितरीत्या सेवा नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल निलंबित करण्यात आले आहे.

कॉन्स्टेबल जितेंद्र शिंदे यांना करण्यात आले निलंबित
कॉन्स्टेबल जितेंद्र शिंदे (Jitendra Shinde) यांच्या निलंबनाचे आदेश मंगळवारी (१५ फेब्रुवारी) जारी करण्यात आले असून त्यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. शिंदे यापूर्वी मुंबई पोलिसांच्या संरक्षण व सुरक्षा शाखेत कार्यरत होते. त्यांनी २०१५ ते ऑगस्ट २०२१ पर्यंत अमिताभ बच्चन यांचे अंगरक्षक म्हणून काम केले. त्यांचे वार्षिक उत्पन्न १.५ कोटी रुपये असल्याचे समोर आल्याने मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नागराळे यांनी त्यांची हकालपट्टी केली. ऑगस्ट २०२१ नंतर शिंदे यांची मुंबईतील डीबी मार पोलीस ठाण्यात नियुक्ती झाली होती.

जितेंद्र यांच्या निलंबनामागचे नेमके कारण विचारले असता, मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, कॉन्स्टेबलने त्यांच्या वरिष्ठांना न कळवता किमान चार वेळा दुबई आणि सिंगापूरचा प्रवास केला होता. ते म्हणाले की, “सेवा नियमांनुसार त्यांनी परदेशात जाण्यासाठी वरिष्ठांची परवानगी घ्यायला हवी होती.” अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, “जितेंद्र यांनी पत्नीच्या नावावर एक सुरक्षा एजन्सी देखील उघडली आहे, जी बच्चन कुटुंबाला सुरक्षा पुरवत होती. परंतु शुल्काचे व्यवहार त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यात नाही, तर त्यांच्या बँक खात्यात दिसतात.”

चौकशी समिती केली स्थापन
“पहिल्यांदा समोर आले की, जितेंद्र यांनी काही मालमत्ताही विकत घेतल्या होत्या, ज्याचा खुलासा त्यांनी केला नाही. जितेंद्र यांना निलंबित केल्यानंतर मुंबई पोलीस आयुक्तांनी अतिरिक्त पोलिस आयुक्त (दक्षिण) दिलीप सावंत यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली,” असे अधिकाऱ्याने सांगितले.

अमिताभ यांना एक्स कॅटेगरीची सुरक्षा पुरवली जाते, ज्या अंतर्गत चार पोलीस हवालदार त्यांना दोन शिफ्टमध्ये सुरक्षा देतात. आता या प्रकरणात आणखी कोणते अपडेट येतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही पाहा- सुपरस्टार्ससोबत काम करणारी आंचल सिंग एका वेबसीरिजमुळे आली चर्चेत। Who Is Anchal Singh

अमिताभ यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर ते ‘गुडबाय’, ‘मेडे’, ‘झुंड’ यांसारख्या सिनेमात झळकणार आहेत.

हेही वाचा-

हे देखील वाचा