Wednesday, June 26, 2024

हिंदी सिनेसृष्टीवर दिग्गज अभिनेते नसीरुद्दीन शाह नाराज; म्हणाले, ‘दम नाही…’

दिग्गज अभिनेते नसीरुद्दीन शाह (Nasiruddin shah)सध्या त्यांच्या एका वक्तव्यामुळं चर्चेत आले आहेत. नसीरुद्दीन यांनी हिंदी सिनेसृष्टीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. बेधडक वक्तव्यामुळं ओळखले जाणारी नसीरुद्दीन शाह मध्यंतरी ‘द केरला स्टोरी’ व ‘गदर २’सारख्या चित्रपटांबद्दल वादग्रस्त विधान केल्याने चर्चेत आले होते. आता त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीवर ताशेरे ओढले आहेत. नसीरुद्दीन शाह यांनी हिंदी चित्रपट बघणं बंद केले असल्याचे म्हटले आहे.

एका मुलाखतीदरम्यान, नसीरुद्दीन शाह यांनी हिंदी चित्रपटांवर नाराजी व्यक्त करत निर्माते व दिग्दर्शक हे केवळ पैशाच्या मागे धावत असल्याने उत्कृष्ट कलाकृती तयार होत नसल्याची चिंता व्यक्त केली आहे. आपण गेली १०० वर्षे एकाच प्रकारचा चित्रपट बनवत आहोत आणि आपण ही गोष्ट अभिमानाने मिरवतो आहोत हे पाहून मला याचा प्रचंड राग आहे. आणखी किती वर्ष आपण तेच चित्रपट लोकांना दाखवणार आहोत. मी तर हिंदी चित्रपट पाहायचं केव्हाच बंद केलं आहे, मला ते चित्रपट अजिबात आवडत नाहीत. असे परखड मत नसीरुद्दीन यांनी मांडले आहे.

तसेच ते पुढे म्हणाले, जगभरात हिंदी चित्रपट पाहिले जातात कारण भारतीयांना त्यांच्या मूळ आणि त्यांच्या मातृभूमीशी कनेक्ट करतात. पण जर या गतीने आणि अशा रीतीने गोष्टी चालू राहिल्या तर लवकरच सर्वांना कंटाळा येईल. भारतीय पदार्थ सर्वत्र आवडतात कारण त्यात दम आहे. हिंदी चित्रपटांत दम आहे का? असा सवाल करत नसीरुद्दीन शाह म्हणाले, त्याच्यावर सर्वांचं लक्ष आहे. किती परदेशी, किती भारतीय, किती रंगीत. लवकरच त्यांना त्याचा कंटाळा येईल कारण त्यात काही दम नाही.

आता सुधारण्यासाठी खुप उशीर झाला आहे असा असं सांगत नसीरुद्दीन शाह म्हणाले, पैसे कमवण्याचे साधन मानणे बंद केले तरच हिंदी सिनेसृष्टीत चांगलं काही होऊ शकेल. मात्र, आता खूप उशीर झाला असून त्यावर उपाय नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्याच्या दाव्यांचे समर्थन करताना,ते म्हणाले की, ‘कारण ज्या चित्रपटांना हजारो लोक पाहत आहेत, ते बनतच राहतील आणि देव जाणो लोक किती काळ ते पाहत राहतील. त्यामुळे ज्यांना गंभीर चित्रपट बनवायचे आहेत, त्यांच्यावर आजचे वास्तव दाखवून देण्याची जबाबदारी आहे आणि अशाप्रकारे बनवावे लागतीत की त्यांना कोणताही फतवा मिळणार नाही किंवा ईडीची धाड पडणार नाही.

तर काही दिवसांपूर्वी, ‘सिरियल किसर’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या इमरान हाश्मीनेदेखील हिंदी चित्रपटसृष्टीला फटकारले होते. यावेळी त्याने दक्षिण सिनेसृष्टीचे कौतुक केले होते. दक्षिण चित्रपट निर्माते आपल्यापेक्षा अधिक शिस्तप्रिय आहेत. ते आपल्या चित्रपटांवर खर्च होणार पैसा स्क्रीनवर दाखवतात. हिंदी चित्रपटसृष्टीत चुकीच्या गोष्टींवर पैसा खर्च केला जाते ज्याच्या उपयोग स्क्रीनवर होत नाही. असं मत इमरान हाश्मीने यावेळी मांडले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

‘मला चित्रपट करण्यात रस नाही, माझी काळजी करू नका’ आयेशा टाकियाने मांडले मत
12Th Fail फेम विक्रांत मेस्सीने विकी कौशलचे केलं तोंडभरुन कौतुक, म्हणाला…

हे देखील वाचा