Tuesday, July 9, 2024

‘तुमची खूप आठवण येते पप्पा’, नताशा स्टॅनकोविकची सासऱ्यांच्या निधनावर भावुक पोस्ट

भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्याचे वडील हिमांशु पांड्या यांचे १६ जानेवारीला निधन झाले. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने ७१ व्या वर्षी त्यांचे निधन झाले आहे. आज नताशा स्टॅनकोविकने सासऱ्याच्या आठवणीत सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेयर करत, त्यांचे काही फोटो देखील तिने शेयर केले आहे.

नताशाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले की, “तुम्ही आता आमच्यात नाही यावर अजूनही माझा विश्वास बसत नाहीये. तुम्ही कुटुंबातील प्रेमळ, तसेच मजबूत आणि मजेशीर व्यक्ती होता. तुम्ही आपल्या मागे अनेक सुंदर आठवणी सोडल्या आहेत. आता हे घर पूर्वीसारखे राहिले नाही. आपले घर रिकामे झाले आहे. तुमची आणि तुमच्या विनोदांची खूप आठवण येते आहे. मला याचा आनंद आहे की तुम्ही तुमचे संपूर्ण आयुष्य एका राजासारखेच राजेशाही पद्धतीने जगलात. तुम्ही आमचे खरे रॉकस्टार आहात. मी आपल्या अगस्त्यला नक्कीच सांगेन की त्याचे आजोबा किती छान होते. तुम्ही सतत हसत रहा. सगळ्या गोष्टींसाठी तुमचे खूप आभार आणि बाबा तुमच्यावर आमचे खूप प्रेम आहे.”

हार्दिक आणि कृणालचे वडील हिमांशु पांड्या यांनी आपल्या दोन्ही मुलांना क्रिकेटपटू बनविण्यासाठी खूप कष्ट घेतले होते. आर्थिक परिस्थिती साधारण असतानाही त्यांनी मेहनतीने पैसे उभे केले आणि त्यांच्या दोन्ही मुलांना किरण मोरे क्रिकेट अकादमीमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी पाठवले. हार्दिकने देखील सोशल मीडियावर त्याच्या वडिलांबद्दल अनेकदा सांगितले आहे.

वडिलांच्या निधनानंतर हार्दिकने वडिलांचे अनेक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले. यावेळी त्याने लिहिले की, “माझ्या वडिलांसाठी आणि माझ्या हिरोसाठी तुम्हाला गमावले आहे हे गोष्ट स्वीकारणे माझ्यासाठी अत्यंत कठीण गोष्ट आहे. पण तुम्ही आमच्यासाठी अनेक आठवणी मागे सोडून गेला आहात. ज्या आठवणींमध्ये आम्ही तुम्हाला फक्त हसतानाच पाहत आहोत.”

हे देखील वाचा