आज १२ जानेवारी म्हणजेच राष्ट्रीय युवा दिन. १२ जानेवारी १८६३ ला कोलकात्यामध्ये स्वामी विवेकानंदांचा जन्म झाला होता. स्वामी विवेकानंदांचा जन्मदिन हा राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. स्वामी विवेकांनदांचे जीवन हे सर्व लोकांसाठी खूप प्रेरणादायी आहे. त्यातल्या त्यातच स्वामी विवेकानंदांचा तरुणांच्या क्षमतेवर प्रगाढ विश्वास होता. तरुणांच्या सामर्थ्यांची जाणीव त्यांना होती. तारुण्याच्या वाटेवर असताना अनेक आव्हानात्मक स्पर्धांना सामोरे जाणारा तरुण हा स्वत:मध्ये जग बदलवण्याची ताकद ठेवतो असे विचार असणारे विवेकानंद अनेक तरुणांचे प्रेरणास्थान आहे. त्यात बॉलिवूडमधील तरुण देखील मागे नाही. आज युवा दिनाच्या निमित्ताने आपण बॉलिवूडच्या अशाच काही तरुण अभिनेत्यांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी स्व बळावर या मायानगरीत नाव कमावले.
आयुष्मान खुराणा :
आयुष्मानने २०१२ साली ‘विकी डोनर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्याने त्याच्या पहिल्याच चित्रपटातून प्रेक्षक आणि समीक्षकांना स्वतःची दखल घ्यायला भाग पडले. आयुष्मानने मसाला चित्रपटांपेक्षा अधिक प्राधान्य इतर चित्रपटांना दिले. त्यामुळेच आज आयुष्मान यशस्वी कलाकारांच्या यादीत समाविष्ट आहे.
आयुष्मानने ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’, ‘बाला’, ‘आर्टिकल 15’ अशा काही दर्जेदार चित्रपटांमध्ये काम केले आहे. आयुष्मानने त्याच्या अभिनयासाठी भरपूर पुरस्कार जिंकले असून, त्यात राष्ट्रीय पुरस्कारांचा देखील समावेश आहे.
राजकुमार राव :
राजकुमार रावने २०१० साली ‘लव्ह सेक्स और धोका’ चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. पण दुर्दैवाने हा सिनेमा काही चालला नाही चालला आणि राजकुमारलाही त्याचं नाणं खणखणीत आहे दाखविण्याची संधी मिळाली नाही. मात्र राजकुमार रावने हार न मानता त्याचे प्रयत्न सुरु ठेवले. हळू हळू राजकुमार कमर्शियल चित्रपटांपेक्षा इतर विषयांच्या चित्रपटांमध्ये दिसू लागला. यातूनच त्याने त्याच्या जबरदस्त अभिनयाचे दर्शन लोकांना आणि समीक्षकांना घडवले. राजकुमाराने ‘स्त्री’, ‘शाहिद’, ‘ओमार्टा’, ‘न्यूटन’, ‘सिटीलाईट्स’ यांसारख्या आशयसंपन्न चित्रपटांमध्ये काम करत स्वतःची ओळख निर्माण केली.
रणवीर सिंह :
२०१० साली रणवीरने ‘बँड बाजा बारात’ चित्रपटातून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले. पहिल्याच सिनेमातून रणवीरने त्याची ओळख संपूर्ण जगाला करून दिली. जबरदस्त ऊर्जा असणारा रणवीर त्याच्या चित्रपटांसोबतच विचित्र वेषभूषेसाठीही ओळखला जातो. रणवीरला प्रचंड फॅन फॉलोविंग आहे. तो देखील त्याचे फॅन्सबद्दलचे प्रेम नेहमी दाखवत असतो. रणवीर लवकरच ‘८३’ सिनेमात दिसणार आहे.
विकी कौशल :
विकी कौशल हा प्रसिद्ध स्टंट दिग्दर्शक श्याम कौशल यांचा मुलगा आहे. विकीने ‘गँग्स ऑफ वासेपूर’ चित्रपटासाठी अनुराग कश्यपसाठी सहायक म्हणून काम केले. विकीने बऱ्याच सिनेमात छोटे छोटे रोल देखील केले. २०१५ साली विकीने ‘मसान’ चित्रपटातून अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. या चित्रपटात त्याच्या भूमिकेसाठी त्याला सगळ्यांकडून खूप वाहवा मिळाली. मात्र २०१९ साली आलेल्या ‘उरी द सर्जिकल स्ट्राइक’ चित्रपटाने विकीला हिरो बनवले.
टायगर श्रॉफ :
२०१४ साली ‘हिरोपंती’ चित्रपटातून टायगर श्रॉफने रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. जॅकी श्रॉफचा मुलगा अशी ओळख असलेला टायगर त्या चित्रपटातून सर्वाना टायगर श्रॉफ म्हणून माहित झाला. टायगर त्याच्या डान्स आणि ऍक्शनमुळे खूप प्रसिद्ध आहे. २०१६ साली आलेल्या ‘बागी’ चित्रपटाने टायगरला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. त्यानंतर आलेल्या ‘बागी २’ने टायगरला टॉप कलाकारांच्या यादीत समावेश करून दिला. २०१९ साली आलेल्या ऋतिक आणि टायगरच्या ‘वॉर’ सिनेमाने हिंदी चित्रपटांच्या इतिहासातील सर्वात मोठी ओपनिंग करत रेकॉर्ड केला होता.