हिंदी चित्रपट जगतातील अभिनेते त्यांच्या नाविण्यपुर्ण आणि आव्हानात्मक भूमिका साकारण्यासाठी प्रसिद्ध आहेत. या कलाकारांच्या अनेक आव्हानात्मक भूमिका चांगल्याच चर्चेत असतात. आता हिंदी चित्रपटात तृतीयपंथी भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्यांबद्दल नेहमीच प्रश्न उपस्थित केले जातात. अशा भूमिका फक्त पुरूष कलाकारांनाच मिळत असल्याचाही आरोप अनेकवेळा झाला आहे. नुकताच प्रदर्शित झालेला ‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपटातही अभिनेता विजय राजने तृतीयपंथी व्यक्तीरेखा साकारली होती. यावर अभिनेत्री नव्या सिंगने आक्षेप घेतला होता. आता तिने ‘अर्ध’ चित्रपटातील राजपाल यादवच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. काय आहे हे सगळे हे प्रकरण, चला जाणून घेऊ.
अभिनेता राजपाल यादवने ‘अर्ध’ चित्रपटात साकारलेली तृतीयपंथी व्यक्तीची भूमिका सध्या सगळीकडे चर्चेत आहे. त्याच्या या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे,मात्र ट्रांसक्विन नव्या सिंगने मात्र यावर आपली नाराजी व्यक्त केली आहे. नव्या सिंगही मनोरंजन क्षेत्रात नेहमीच चर्चेत असते. तिने या चित्रपटात राजपाल यादवला दिलेल्या या तृतीयपंथी भूमिकेचा विरोध केला आहे. याबद्दल ती म्हणते की, “जेव्हा जेव्हा चित्रपटात अशा व्यक्तीरेखा साकारल्या जातात तेव्हा प्रत्येकवेळी एखाद्या मोठया कलाकाराला ही भूमिका दिली जाते. आम्हाला अशा भूमिकेसाठी कोणी विचारत नाही, आम्ही जगत असलेले आयुष्य आम्हाला पडद्यावर मांडायचे असते, मात्र यासाठी आम्हाला कोणी संधी देत नाही,”अशी खंत तिने यावेळी बोलून दाखवली.
याबद्दल पुढे बोलताना ती म्हणाली की, “आम्ही अनेक वर्ष आमच्या हक्कांसाठी लढा देत आहोत मात्र आमचा आवाज कोणीही ऐकत नाही.लोक करतात एक आणि बोलतात एक. माझी सर्व निर्माते आणि दिग्दर्शक यांना विनंंती आहे की, कोणीतरी आमच्याकडेही पाहावे, आम्हालाही काम करण्याची संधी निर्माण करून द्यावी. जेणेकरून आम्ही ही समाजात ताठ मानेने जगू शकु आणि आम्हालाही मान सन्मान मिळेल.” दरम्यान नव्या सिंगही ट्रांसजेंडर क्वीन म्हणून प्रसिद्ध आहे.