Monday, July 1, 2024

Nawazuddin Siddiqui : ‘स्मिता पाटील यांच्यापेक्षा सुंदर अभिनेत्री नाही’, नवाजुद्दीन सिद्दीकी असं का म्हणाला?

बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक असलेला नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui )नेहमी या ना त्या कारणाने चर्चेत असतो. नवजुद्दीनला अनेकदा त्याच्या दिसण्यावरुन ट्रोल केले जाते. पण ट्रोलिंगला बळी न पडता सिद्दीकीने आपल्या दमदार अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलंय. अशातच, एका मुलाखतीत बोलताना नवाजुद्दीननं दिसण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. यावेळी त्याने दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील(Smita Patil ) यांच्या नावाचा उल्लेख केला.

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत त्याने दिसण्यावर भाष्य केलं. जेव्हा आपल्या प्रोफेशनचा विचार केला जातो तेव्हा एखाद्या अभिनेत्याचा लूक कॅमेराद्वारे पाहिला जातो. चांगलं दिसण्याबाबत प्रत्येक व्यक्तीच्या स्वतःच्या कल्पना असतात.
तुम्ही भारतातील ज्या पुरुषाला किंवा स्त्रीला सुंदर दिसणारे मानता त्याच व्यक्तीला फ्रान्स किंवा जर्मनीमध्ये चांगले दिसणारे मानत नाहीत. ‘आपल्या देशात विशिष्ट शरीरयष्टी आणि त्वचेचे काही रंग चांगले दिसण्याची मानके मानली जातात.

त्यावरुन सुंदरतेची व्याख्या ठरवली जाते. पण आजपर्यंत माझ्यासाठी स्मिता पाटील यांच्यापेक्षा सुंदर अभिनेत्री नाही. असे वाटते की त्या केवळ कॅमेरासाठीच बनलेल्या होत्या. अशा शब्दात सिद्दीकीने स्मिता यांच्या सुंदरतेचे कौतुक केले.

कॅमेराचा दृष्टीकोन वेगळा असतो. आम्हा लोकांना लेन्सच्या माध्यमातून पाहिले जाते. आणि आपण लोकांना बिना कॅमेरा पाहतो आणि ठरवतो समोरचा चांगला दिसतोय की नाही…. पण, जेव्हा चित्रपटांचा विचार केला जातो, तेव्हा एखादा अभिनेता चांगला दिसतो की नाही हे त्या व्यक्तिरेखेच्या दृष्टीकोनातून पाहूनच ठरवले पाहिजे.

‘आपण स्मिता पाटील यांना इथे उभं केलं असतं तर त्या एका सामान्य भारतीय मुलीसारख्या दिसल्या असत्या. पण, त्या कॅमेऱ्यासमोर येताच त्यांच्यापेक्षा सुंदर कोणीही दिसायचे नाही. त्या आज हयात असती तर आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्मात्यांसाठी एक आनंदाची बाब ठरली असती.

तसेच, यावेळी त्याने स्लमडॉग मिलेनियरमध्ये दिसलेली अभिनेत्री फ्रीडा पिंटोचे उदाहरण दिलं. ‘मी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये होतो. मला तिथे फ्रिडाचे मोठे होर्डिंग दिसले. आपल्यापैकी बऱ्याच जणांसाठी ती आजूबाजूच्या इतर मुलींसारखी असू शकते, परंतु तिथे लोक म्हणत होते की, ती हॉलीवूडच्या मोठ्या अभिनेत्रीपेक्षाही सुंदर दिसते. लोक त्या होर्डिंगचे फोटो क्लिक करत होते. “याच गोष्टी, लोकांच्या धारणातील फरक दर्शवतात. असं नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणाला.

हे देखील वाचा