Friday, April 19, 2024

छोट्या पडद्यावर पदार्पण करण्यासाठी नीतू कपूर सज्ज, ‘या’ शोमध्ये सांभाळणार परिक्षकाची खुर्ची

सध्या अनेक रियॅलिटी शो टीव्ही इंडस्ट्रीमध्ये धुमाकूळ घालत आहेत आणि त्यांना परीक्षण करणारे सेलिब्रिटी देखील चर्चेत राहतात. बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty), मलायका अरोरा (Malaika Arora) आणि किरण खेर (Kirron Kher) दीर्घकाळापासून डान्स रियॅलिटी शोमध्ये जज म्हणून हजेरी लावत आहेत. त्याचबरोबर आता या यादीत नीतू कपूर (Neetu kapoor) यांचेही नाव जोडले जाणार आहे. चित्रपटांमध्ये चमक दाखवल्यानंतर आता नीतू कपूर टेलिव्हिजनमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. नीतू कपूर रियॅलिटी शोमध्ये परीक्षकांच्या भूमिकेत दिसणार आहेत, ही त्यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, नीतू कपूर एका डान्स रियॅलिटी शोमधून परीक्षक म्हणून टेलिव्हिजनमध्ये पदार्पण करत आहेत. त्या ‘डान्स दीवाने ज्युनियर’ या रियॅलिटी कार्यक्रमाच्या परीक्षकाची खुर्ची सांभाळणार आहेत. ज्यामध्ये ४ ते १४ वर्षे वयोगटातील मुले त्यांचे नृत्य कौशल्य दाखवतील. या कार्यक्रमाचा हा पहिला सीझन आहे, ज्यामध्ये लहान मुले दिसणार आहेत. या कार्यक्रमात नीतू कपूर यांच्यासोबत नोरा फतेही आणि कोरिओग्राफर आणि डान्सर मर्झी पेस्टोनजी दिसणार आहेत.

सध्या नीतू कपूर या कार्यक्रमात परीक्षक म्हणून काम करण्यासाठी खूप उत्सुक आहेत. त्यांनी या बातमीला दुजोरा दिला असून, डान्सची खूप आवड असल्याचे सांगितले आहे. नीतू कपूर म्हणतात की, “मी स्वत: फार चांगली डान्सर नाही पण मला नेहमीच नृत्याची आवड आहे. टीव्हीच्या माध्यमातून लोकांच्या घरोघरी पोहोचण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.”

नीतू कपूर यांचा हा पहिला रियॅलिटी शो आहे, पण मर्झी आणि नोरा फतेही याआधी रिअ‍ॅलिटी शोमध्ये जज म्हणून दिसले आहेत. मर्झीने ‘डान्स इंडिया डान्स’, ‘डान्स इंडिया डान्स सुपर मॉम’ सारख्या कार्यक्रमांचे परीक्षण केले आहे. त्याचबरोबर मलायका अरोराची जागा नोराने डान्स दीवानेमध्ये परीक्षक म्हणून घेतली होती. आता हे तिन्ही स्टार रिअ‍ॅलिटी शोमध्ये एकत्र दिसणार आहेत. त्यामुळे त्यांचे चाहते खूप उत्सुक आहेत.

हेही वाचा –

हे देखील वाचा