Tuesday, July 9, 2024

भारतात भल्या भल्या कलाकारांना न जमलेली गोष्ट नेहा कक्करने करुन दाखवली, थेट…

इंडियन आयडल १२ ची परीक्षक आणि सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्कर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नेहाला यू-ट्यूबकडून डायमंड प्ले बटण मिळालं आहे, जे प्राप्त करणारी ती पहिली भारतीय गायिका ठरली आहे. नेहाने इंस्टाग्रामवर ही आनंदाची बातमी शेअर केली आणि तिचा पती रोहनप्रीत सिंग यानेही तिचं विशेष अभिनंदन केलं.

नेहाने डायमंड प्ले बटणसह इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिलं – “युट्यूबचं डायमंड प्ले बटण मिळवणारी एकमेव भारतीय गायिका. हे माझ्या कुटुंबाशिवाय शक्य झालं नसतं, ज्यात माझे पालक, भाऊ टोनी कक्कर आणि बहीण सोनू कक्कर आणि आपण (चाहते) यांचा समावेश आहे. मी आपल्या सर्वांचे पुरेसे आभारही व्यक्त करू शकत नाहीये.”

नेहाने रोहनप्रीतसाठी असं लिहिलं आहे की कुटुंबातील एका नवीन सदस्यावर तिचं खूपच प्रेम आहे. त्याला उत्तर म्हणून रोहनप्रीत याने आपल्या पत्नीला शुभेच्छा देऊन लिहिलं, “माझ्या सुंदर राणीचे अभिनंदन. माझ्या बाबूसाठी काहीही अशक्य नाही. आपण सुपरस्टार आहात. हे तर काहीच नाही आता आणखी पुरस्कार येणार आहेत. सदैव आपल्या पाठी देवाचा आशीर्वाद असेल.”

रोहनप्रीतशिवाय अवनीत कौर, गौहर खान यांच्यासह अनेक सेलिब्रिटीज आणि चाहत्यांनी नेहाचं अभिनंदन केलं आहे. नेहा सध्या इंडियन आयडल १२मध्ये परीक्षक आहे. विशाल दादलानी आणि हिमेश रेशमिया तिच्यासोबत शोचं परीक्षण करत आहेत. गेल्या वर्षी पंजाबी गायक रोहनप्रीत सिंगसोबत लग्नाची घोषणा करून नेहाने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. नेहाचं लग्नही बरंच चर्चेत होतं. नेहाने तिच्या या डायमंड प्ले बटण मिळाल्यावर युट्युबवर एक व्हिडिओ बनवून पोस्ट केला आहे.

युट्युब डायमंड प्ले बटण केव्हा दिलं जातं?
जेव्हा एखाद्या क्रिएटरच्या युट्युब चॅनलचे १ कोटी सबस्क्राईबर्स पूर्ण होतात तेव्हा त्या क्रिएटरला त्याच्या सन्मानार्थ युट्युब डायमंड प्ले बटण दिलं जातं. मिळालेल्या माहितीनुसार जून २०२० पर्यंत ६५० हून अधिक भारतीय क्रिएटर्सना हा पुरस्कार मिळाला आहे. नेहाच्या यूट्यूब चॅनलवर सध्या ११.८ मिलियन सबस्क्राईबर्स आहेत.

हे देखील वाचा