Friday, November 22, 2024
Home बॉलीवूड देशात काय विदेशातही होता लता दीदींच्या आवाजाचा डंका, ‘ही’ पाकिस्तानी अभिनेत्री होती मोठी फॅन

देशात काय विदेशातही होता लता दीदींच्या आवाजाचा डंका, ‘ही’ पाकिस्तानी अभिनेत्री होती मोठी फॅन

स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनाने संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. भारतरत्न लता मंगेशकर या भारतीय संगीत क्षेत्रातील असामान्य व्यक्तिमत्व होते. त्यांनी या क्षेत्रात तब्बल सात दशके निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले होते. देशातील प्रत्येकजण त्यांच्या जादूई आवाजाचा चाहता होता, त्यामुळेच त्यांच्या जाण्याने देशाची शान हरपली असे मत प्रत्येकजण व्यक्त करत आहे.

गाणकोकिळा लता मंगेशकर यांच्या मृत्युने सगळीकडेच दुःखाचा डोंगर पसरला आहे. लता दीदींच्या आवाजाने फक्त देशातच नव्हेतर पाकिस्तानमध्ये सुद्धा असंख्य चाहते होते, म्हणूनच पाकिस्तानमधून सुद्धा त्यांच्या मृत्युने अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. कलेला मर्यादा नसते हेच यावरुन सिद्ध होते. आताच नव्हेतर पूर्वीपासूनच लता दीदींच्या आवाजाचे पाकिस्तानात असंख्य चाहते होते. खुद्द पाकिस्तानाची लोकप्रिय गायिका नूरजहां सुद्धा दीदींची फॅन होती याचा एक किस्सा ही त्यांनी सांगितला होता.

पाकिस्तानी गायक नूरजहां ही त्या काळातील प्रसिद्ध गायिका होती. लता मंगेशकर यांची त्यांच्याशी खूप कमी वयात भेट झाली होती. या भेटीची आठवण त्यांनी एका मुलाखतीत सांगितली होती. त्या म्हणतात की त्यांची नूरजहां सोबत पहिली भेट कोल्हापूरमध्ये ‘बडी माँ’ चित्रपटावेळी झाली होती. त्यावेळी त्या कलाकार म्हणून चित्रपटात काम करत होत्या. या चित्रपटात नूरजहां अभिनेत्री म्हणून काम करत होती. त्यावेळी लता दीदींना नूरजहांने भेटीसाठी बोलावले होते. या भेटीत तिने दीदींना गाणे गायला लावले होते. त्यावेळी लता दीदींच्या आवाजाने ती खूपच भारावून गेली. तिने दीदींना “छान गातेस, शास्त्रीय संगिताचा अजून सराव कर” असा सल्ला ही दिला होता.

याच भेटीतील आणखी एक प्रसंग लता दीदींनी सांगितला होता. त्यावेळी नूरजहां नमाज पडत होती आणि लता दीदी कुतुहलाने बघत होत्या. नमाज पडता पडता ती अचानक रडायला लागली ज्यामुळे लता दीदीही घाबरल्या होत्या. त्यांनी जेव्हा तिला “तु का रडत आहेस?” असा प्रश्न केला तेव्हा तीने काही चुका झाल्यानंतर माफी मागायची असते असे उत्तर दिले होते. पाकिस्तानातील कलाकाराने लता दीदींच्या आवाजाचे कौतुक करणे ही त्यांच्या असामान्य कर्तृत्वाचीच देण होती.

हेही वाचा :

 

author avatar
Chinmay Remane

हे देखील वाचा