Sunday, April 5, 2026
Home बॉलीवूड ‘ज्या वातावरणात लेखन होते त्याचा प्रभाव लेखनात येतो’, म्हणत प्रसून जोशी यांनी केला तारे जमीन पर’बद्दल खुलासा

‘ज्या वातावरणात लेखन होते त्याचा प्रभाव लेखनात येतो’, म्हणत प्रसून जोशी यांनी केला तारे जमीन पर’बद्दल खुलासा

चित्रपटाची कथा हा त्या सिनेमाचा श्वास असतो. मात्र चित्रपटातील गाणी आणि संगीत हा त्या सिनेमाचा आत्मा असतो. चित्रपटाच्या कथेला साजेसे गाणे हे त्या चित्रपटाला पुढे नेण्यात महत्वाचा वाटा निभावतात. अर्थपूर्ण आणि साजेशी गाणे चित्रपटाला मिळणे देखील चित्रपटाचे भाग्य असते. आमिर खानचा ‘तारे जमीन पर’ हा सिनेमा सर्वांनाच आठवत असेल. या सिनेमाची कथा, कलाकारांचा अभिनय, गाणी सर्वच गोष्टींनी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. आज या सिनेमाच्या इतक्या वर्षांनी गीतकार प्रसून जोशी यांनी या सिनेमातील गाण्यांच्या शब्दांबद्दल खुलासा केला आहे.

नुकताच मुंबईतील वरळीतील नेहरु सेंटर येथे १७ वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव संपन्न झाला. या महोत्सवासाठी अनेक दिग्गज मंडळींनी हजेरी लावली होती. यावेळी बॉलिवूडमधील प्रसिद्ध कवी, लेखक, गीतकार, पटकथा लेखक आणि संवाद लेखक प्रसून जोशी देखील उपस्थित होते. या महोत्सवात त्यांनी ‘द आर्ट ऑफ स्टोरीटेलिंग’ या विषयावर व्याख्यान देखील दिले. यावेळी त्यांनी ‘प्रत्येक माणूस एक अलिखित स्टोरी आहे’ सांगत त्यांनी ‘तारे जमीन पर’ सिनेमाबद्दल देखील काही खुलासे केले.

जोशी म्हणाले, “तुम्ही ज्या ठिकाणी बसून जेव्हा कथा, कविता, संवाद लेखन करता त्या ठिकाणाचा प्रभाव तुमच्या लेखनावर नेहमीच पडतो. मी जेव्हा ‘तारे जमीन पर’ सिनेमा लिहित होतो, तेव्हा मी डोंगराळ भागात होतो. त्यामुळे तुम्हाला त्यात अनेक त्या बाजूचे त्या प्रदेशात वापरले जाणारे शब्द ऐकायला मिळतील. कोणीही स्वत: ला त्याच्या मुळांपासून आणि वास्तविकतेपासून दूर करू नये कारण, त्याचा त्याच्या लेखनावर खूप प्रभाव पडतो.”

पुढे प्रसून जोशी म्हणाले, “आपल्याकडे अनेक चित्रपट निर्माते अतिशय दर्जेदार चित्रपट बनवतात. मात्र काही निर्माते ओढून ताणून सिनेमा बनवताना दिसतात. मला वाटते चित्रपट निर्मिती सोपी असावी. यामुळे अनेक तरुणांची स्वप्ने आणि कथा जिवंत होतील. चित्रपट निर्मिती ही धैर्याने नव्हे, तर प्रतिभेने चालविली पाहिजे. अंतिम सत्य समजून घेणे फार कठीण आहे. प्रत्येकाची आकलन शक्ती वेगळी असते. त्यामुळे त्याला त्यानुसार गोष्टी समजतात आणि ते तसेच त्या पडद्यावर उतरवतात.”

प्रसून जोशी बॉलिवूडमधील अतिशय मोठे आणि प्रसिद्ध नाव आहे. त्यांनी आतापर्यंत त्यांच्या लेखनाच्या माध्यमातून अनेक चित्रपटांना एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

 

हे देखील वाचा