Tuesday, July 9, 2024

‘नट्टू काका’च्या निधनावर पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले दुःख, अरविंद त्रिवेदींनाही वाहिली श्रद्धांजली

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये नट्टू काकाची भूमिका साकारणारे घनश्याम नायक यांचे २ ऑक्टोबर रोजी, वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे शोची संपूर्ण टीम आणि कलाकार दु:खी झाले आहेत. अनेक कलाकारांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आणि त्यांच्याशी संबंधित आठवणी चाहत्यांसोबत शेअर केल्या. आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील नट्टू काकांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे आणि त्यांच्यासोबतचा एक फोटो ट्वीटरवर शेअर केला आहे. त्यांनी घनश्याम नायक यांचे प्रतिभाशाली अभिनेता म्हणून वर्णन केले आणि त्यांचे कौतुक केले.

पंतप्रधान मोदींनी दोन दिग्गज कलाकारांच्या निधनाबद्दल व्यक्त केले दु:ख
पंतप्रधान मोदींनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले की, “गेल्या काही दिवसांत आपण दोन प्रतिभावशाली कलाकार गमावले आहेत. या दोन्ही कलाकारांनी आपल्या कामातून लोकांची मने जिंकली होती. श्री घनश्याम नायक त्यांच्या बहुमुखी पात्रांसाठी लक्षात राहतील, विशेषत: लोकप्रिय ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ शोमध्ये ते अत्यंत दयाळू आणि नम्र होते.” या ट्वीटसह पंतप्रधान मोदींनी शेअर केलेल्या फोटोत ते ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या टीमसोबत उभे आहेत. या फोटोत शोचे निर्माते असित मोदी, नट्टू काका आणि बाघा दिसत आहेत.

पंतप्रधान मोदींनी पुढे ट्वीट करत लिहिले की, “आपण श्री अरविंद त्रिवेदी यांना गमावले, जे केवळ एक असाधारण अभिनेतेच नव्हते, तर ते लोकसेवेबद्दल उत्कट होते. भारतातील सर्व येणाऱ्या पिढ्यांसाठी त्यांनी रामायण या टीव्ही सीरियलमध्ये साकारलेल्या भूमिकेसाठी त्यांची आठवण राहील. अरविंद त्रिवेदी यांचे कुटुंब आणि चाहत्यांसाठी मी प्रार्थना करतो. ओम शांती”

घनश्याम नायक गेल्या अनेक दिवसांपासून कर्करोगाशी झुंज देत होते आणि त्यांच्यावर उपचारही चालू होते. त्यांच्या घशाची शस्त्रक्रिया झाली होती आणि यामुळे ते शूटिंगपासूनही दूर होते. अलीकडेच, त्यांच्या आजाराबद्दल माध्यमांशी केलेल्या संभाषणात त्यांनी सांगितले होते की, त्यांच्या घशातून आठ गाठी काढण्यात आल्या आहेत आणि इतक्या गाठी कशा बनल्या हे त्यांना माहित नव्हते. शस्त्रक्रियेद्वारे या सर्व गाठी काढण्यात आल्या. त्यांनी सांगितले की, त्यांची शस्त्रक्रिया चार तास चालली.

धनश्याम यांचा मुलगा विकासनेही माध्यमांना सांगितले होते की, त्याच्या वडिलांनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये घशाची शस्त्रक्रिया केली होती. ज्यामध्ये त्यांच्या आठ गाठी काढण्यात आल्या होत्या. यानंतर, जेव्हा यावर्षी एप्रिलमध्ये त्यांच्या वडिलांच्या घशाचे पॉझिट्रॉन एमिशन टोमोग्राफी स्कॅनिंग करण्यात आले, तेव्हा त्यात काही स्पॉट दिसले. त्याने पुढे सांगितले की, जेव्हा त्याच्या वडिलांच्या गळ्यात काही स्पॉट दिसले, तेव्हा त्यांना कोणतीही समस्या नव्हती, तरीही त्यांची केमोथेरपी केली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बॉलिवूडला ‘राम राम’ ठोकल्यानंतर, ‘दंगल गर्ल’ झायरा वसीमने प्रथमच शेअर केला तिचा फोटो

-शूटिंगच्या पहिल्याच दिवशी संजय मिश्रा यांनी दिले होते २८ टेक, अखेर कंटाळून दिग्दर्शकाने केलं ‘हे’ काम

-‘कसं काय पावनं बरं हाय का?’ मृण्मयीने शेअर केला आदिनाथसोबतचा दिलखेचक फोटो

हे देखील वाचा