मागच्या वर्षी म्हणजेच २०२१ मध्ये काळजाला घरे पडतील अशा काही घटना मनोरंजन क्षेत्रातून समोर आल्या आहेत. त्यातीलच एक बातमी म्हणजे दाक्षिणात्य अभिनेता पुनीत राजकुमार याचा मृत्यू. त्याच्या मृत्यूने सगळ्यांना धक्का बसला. अणे सुपरहिट चित्रपट दिलेला अभिनेता आज आपल्यात नाही याचे सगळ्यांना दुःख होत आहे. अशातच शुक्रवार (१७ मार्च) रोजी पुनीतची दुसरी जयंती आहे. यावेळी देखील त्याच्या चाहत्यांना त्याची आठवण येत आहे. चला तर जाणून घेऊया आपल्या आवडत्या कलाकाराबाबत काही खास गोष्ट.
पुनीत राजकुमारचा (punit rajkumar) जन्म १७ मार्च, १९७५ रोजी चेन्नईमध्ये झाला होता. टेलिव्हिजन अभिनेता, गायक, निर्माता अशा अनेक भूमिका साकारणाऱ्या पुनीतने बालकलाकार म्हणून अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्याला अभिनयाचा वारसा त्याच्या घरातूनच मिळाला. त्याचे वडील राजकुमार हे कन्नड सिनेसृष्टीतील दिग्ग्ज अभिनेते होते. राजकुमार हे कन्नड इंडस्ट्रीमधील ‘अमिताभ बच्चन’ म्हणून ओळखले जायचे. राजकुमार यांनी बहुतकरून अध्यात्मिक चित्रपटांमध्ये खूप काम केले.
पुनीत हा त्याच्या आई-वडिलांचा सर्वात लहान मुलगा होता. तो सहा वर्षाचा असताना त्याचे कुटुंब म्हैसूरला शिफ्ट झाले. पुनीतचे वडील त्याला आणि त्याच्या बहिणीला नेहमीच चित्रपटांच्या सेटवर घेऊन जायचे. यातूनच त्याची या ग्लॅमर जगाशी ओळख झाली आणि तो इकडे आकर्षित झाला. पुनीत लहान असताना त्याने ‘प्रेमदा कनिके’, ‘आरती’, ‘सनदी अप्पान्ना’, ‘थयगे ठक्का मागा’, ‘वसंत गीता’, ‘भूमिगे बंदा भगवंता’ आदी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. १९८३ पुनीतला सर्वोत्कृष्ट बाल अभिनेता (पुरुष) साठीचा पहिला कर्नाटक राज्य चित्रपट पुरस्कार मिळाला. ‘भक्त प्रल्हादा’, ‘प्रल्हादा’, आणि ‘एराडू नक्षत्रगालू’ यासाठी त्याला सर्वोत्कृष्ट बाल अभिनेत्याचा दुसरा कर्नाटक राज्य चित्रपट पुरस्कार मिळाला. १९८५ मध्ये आलेल्या ‘बेट्टद होवू’ या सिनेमासाठी पुनीतला सर्वोत्कृष्ट बालकलाकारांचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
पुढे २००२ साली त्याने पुरी जग्गनाथ यांच्या ‘अप्पू’ चित्रपटात पहिल्यांदाच मुख्य अभिनेत्याची भूमिका साकारली. त्याच्यासोबत या सिनेमात अभिनेत्री रक्षिता झळकली होती. पहिल्याच सिनेमाने त्याला यशाची चव चाखवली. या सिनेमातून त्याच्या अभिनयाचे कौतुक प्रेक्षकांसह समीक्षकांनी देखील केले. त्यानंतर तो अनेक हिट चित्रपटांमध्ये झळकला. करिअरच्या मधल्या काळात त्याने अपयश देखील पाहिले. मात्र, अपयश जास्त काळ टिकले नाही आणि पुन्हा त्याने यश मिळवले. पुनीतने जवळपास २९ चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या.
पुनीतने २०१२ साली ‘कौन बनेगा करोडपती’चे कन्नड व्हर्जन असलेल्या ‘कन्नडा कोट्याधिपती’ शोचे सूत्रसंचालन केले. याशिवाय त्याने ‘फॅमिली पॉवर’ शोचे देखील होस्टिंग केले. तसेच पुनीतने अनेक चित्रपटांमध्ये पार्श्वगायन देखील केले. ‘वामशी’, ‘अप्पू’, ‘जॅकी’, ‘लव्ह कुश’ आदी अनेक चित्रपटांमध्ये त्याने गाणी गायली. याशिवाय पुनीत आयपीएल फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर बेंगलोर संघाचा ब्रँड एंबेसेडर देखील होता. पुनीत पीआरके म्युझिक या यूट्यूब चॅनेलचा फाऊंडर होता.
पुनीतबद्दल नेहमी कलाकार सांगायचे की, पुनीत खूपच चांगला, साधा, शिस्तप्रिय होता, मोठ्या घरातून असून सुद्धा त्याच्यामध्ये अजिबात गर्व अहंकार नव्हता. यशस्वी किंबहुना सुपरस्टार असूनही त्याचे पाय कायम जमिनीवर असायचे. पूर्वी मोठ्या कलाकारांना व्हॅनिटी व्हॅन नसल्यामुळे कॅरिव्हान दिली जायची. मात्र, लहान कलाकारांना ही सुविधा नव्हती. त्यावेळी पुनीत त्याची कॅरिव्हॅन महिला कलाकारांना द्यायचा. अतिशय कमी वयात पुनीतने मनोरंजन विश्वात मोठे नाव कमावले.
आज पुनीत जरी आपल्यात नसला, तरीही त्याच्या आठवणी आपल्यासोबत नेहमीच असतील शिवाय त्याच्या चित्रपटातून तो नेहमीच त्याच्या चाहत्यांच्या जवळ असेल.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
भारतातील मुलींच्या लग्नाच्या अवाजवी अपेक्षेवर सोनाली कुलकर्णी म्हणाली “मुलगा हवाय की मॉलमधील ऑफर?
स्वराच्या कव्वाली नाईट फंक्शनमध्ये पोहोचले अखिलेश यादव, अभिनेत्री पाेस्ट शेअर करत म्हणाली…