महाराष्ट्रासाठी नव्हे संपूर्ण देशासाठी दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे आभाळाएवढे कर्तृत्व जगासमोर आणण्याचा अनेक दिग्दर्शकांनी त्यांच्या परीने प्रयत्न केला. ह्या आराध्य दैवताला लहान आणि मोठ्या पडद्यावर साकारायला मिळावे अशी सर्वच कलाकारांची इच्छा असते. सुदैवाने सूर्यकांत मांढरे, महेश मांजरेकर, चिन्मय मांडलेकर, अमोल कोल्हे, शंतनू मोघे ते अगदी शरद केळकरपर्यंत सर्वानाच ही भूमिका साकारायला मिळाली.
मात्र यात असेही काही कलाकार आहेत ज्यांनी ही भूमिका साकारायला मिळावी यासाठी अनेक प्रयत्न केले, पण ते शक्य झाले नाही. यातलाच एका कलाकार म्हणजे आर. माधवन. हो दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी ते हिंदी सिनेसृष्टी असा प्रवास करणारा, हरहुन्नरी अभिनेता म्हणजे आर.माधवन.
नुकतेच आर. माधवाने त्यांच्या इंस्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले. हे फोटो शेयर करतांना त्याने म्हटले की, ‘आतापर्यंत मोठ्या पडद्यावर मला ज्या भूमिका कधीही साकारायला मिळाल्या नाहीत, सोबत त्याने त्याच्या फॅन्सला एका प्रश्न देखील विचारला आहे. तुम्हाला काय वाटते कोणती भूमिका माझ्यासाठी चांगली आहे आणि कोणी नाही.’ आर. माधवच्या या फोटोंमधून त्याला या विशिष्ट्य भूमिका साकारायला न मिळाल्याची त्याला वाटत असलेली खंत देखील व्यक्त होत आहेत.
माधवनने एकूण आठ फोटो त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेयर केले आहेत. प्रत्येक फोटोत त्याचा वेगळा लुक पाहायला मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते अल्लाउद्दीन खिलजीपर्यंत अनेक रूपात त्याचे फोटो त्याने पोस्ट केले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रुपातला त्याचा फोटो अतिशय सुंदर आहे. त्याने ऑडिशन देऊनही त्याला ही भूमिका मिळाली नसल्याचे दुःख त्याने सांगितले. माधवनच्या महाराजांच्या रूपातल्या फोटोला सर्वात जास्त लाईक्स आणि कमेंट्स येत आहे.
५० वर्षीय माधवनने त्यांच्या अभिनयाने हिंदीसोबतच तमिळ, कन्नड, मल्याळम, तेलुगू, इंग्लिश भाषेतील प्रेक्षकांनाही वेड लावले. प्रत्येक चित्रपटातून त्याने त्याच्या अभिनयाचे वेगवेगळे पैलू प्रेक्षकांसमोर अगदी ताकदीने मांडले. मग ‘तनु वेड्स मनु’ , ‘थ्री इडियट’, ‘मुंबई मेरी जान’, रंग दे बसंती, गुरु, ‘रेहना हैं तेरे दिल मै’ आदी चित्रपटांचा विशेष उलेख्ख करावा लागेल. शिवाय साऊथ चित्रपट वेगळेच.
आर. माधवन लवकरच ‘रॉकेट्री : द नंबी इफेक्ट’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही महिन्यांपूर्वी चित्रपटाचे शूटींग सुरू झाले आहे. या चित्रपटातील त्याचा लूक पाहून त्याला ओळखताही येणे अशक्य आहे. पांढरी दाढी, पांढरे केस, वाढलेले वजन अशा निराळ्याच लूकमध्ये तो चित्रपटात दिसणार आहे.
‘रॉकेट्री : द नंबी इफेक्ट’हा चित्रपट इस्रोमधील ज्येष्ठ शास्रज्ञ नंबी नारायणन यांच्या जीवनावर आधारित आहे. १९९४ साली त्यांना हेरगिरीच्या खोट्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. परंतु त्यांच्यावरचे हे सर्व आरोप खोटे ठरले आणि त्यांना निर्दोष म्हणून घोषित केले होते. या चित्रपटातून आर. माधवन दिग्दर्शनात आपले पाऊल टाकत आहे.