राजेश खन्ना भारतीय हिंदी सिनेसृष्टीतील ‘पहिले सुपरस्टार.’ १९६९ ते १९७१ या काळात त्यांनी एकापाठोपाठ एक असे १५ हिट सिनेमे दिले आणि त्यांना बॉलिवूडचा सुपरस्टार हा किताब मिळाला. त्यांनतर प्रत्येक दिग्दर्शक आणि निर्मात्याला राजेश यांच्यासोबतच काम करायचं होतं. सिनेमात राजेश खन्ना असणं हीच गोष्ट तो सिनेमा हिट करण्यासाठी पुरेशी होती. राजेश खन्ना यांच्या करियरमधील मैलाचा दगड ठरलेला ‘आराधना’ हा सिनेमा आजही राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर, चित्रपटाची कथा, अभिनय तसेच गाण्यांसाठी ओळखला जातो. या दोन्ही कलाकारांना एका रात्रीत स्टारडम देणारा हा सिनेमा होता. परंतु या सिनेमाला राजेश खन्ना नेहमी नकार देत होते. जाणून घेऊया यामागचे कारण.
राजेश खन्ना यांच्यासोबत काम करण्याची त्यावेळच्या सर्वच दिग्दर्शक आणि निर्मात्यांची इच्छा होती. यातलेच एक दिग्दर्शक होते शक्ती सामंत. शक्ती सामंत हे ‘आराधना’ चित्रपट बनवण्याच्या तयारीत होते. त्यांची इच्छा होती की, या सिनेमात राजेश खन्ना यांनी मुख्य भूमिकेत काम करावे.
जेव्हा शक्ती सामंत यांनी राजेश खन्ना यांना ‘आराधना’ सिनेमाची कथा ऐकवली, तेव्हा मात्र त्यांना ती आवडली नाही. मध्यंतराच्या आधी नायकाचा होणारा मृत्यू आणि डबल रोलमधील त्यांची दुसरी म्हणजे नायकाच्या मुलाची भूमिका मध्यंतरानंतर उशिरा एन्ट्री घेत होती, हेच राजेश खन्ना यांना खटकत होते.
याच कारणामुळे राजेश खन्ना यांनी हा सिनेमा करायला नकार दिला. पण कुठेतरी शक्ती सामंत यांचा त्यांच्या कथेवर पूर्ण विश्वास होता. हा सिनेमा यशस्वी होणार हे त्यांना मनापासून वाटत होते. शिवाय या चित्रपटासाठी त्यांना एक नवीन आणि साधा मुलगा पाहिजे होता आणि म्हणूनच त्यांना त्यांच्या सिनेमात राजेश खन्ना हवे होते.
पण राजेश खन्ना काही केल्या मानेनाच. मग दिग्दर्शकाने राजेश खन्ना यांना सिनेमा फ्लॉप गेला तरी पूर्ण मानधन देण्याचे कबूल केले. तसेही शक्ती सामंत यांनी ठरवले होते की, जर सिनेमा हिट झाला तर चित्रपटाच्या प्रॉफीटमधून कलाकारांना देखील काही भाग देणार. शक्ती सामंतांच्या अनेक प्रयत्नांनी अखेर राजेश खन्ना हा सिनेमा करण्यासाठी तयार झाले.
एका मुलाखतीदरम्यान राजेश खन्ना यांनी सांगितले होते की, जेव्हा ते या सिनेमाची शूटिंग करत होते, तेव्हा त्यांना असे जाणवत होते की हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप खास काही करू शकणार नाही. मात्र, हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि त्याने यशाचे झेंडे गाडले. अगदी चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या इतक्यावर्षांनी या सिनेमाची गाणी प्रेक्षकांच्या तोंडावर सहज रेंगाळतात.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…