हिंदी सिनेसृष्टीमधे फक्त सौंदर्य असून कोणाचेही काम भागत नाही. लुक्ससोबतच प्रतिभा असणे देखील खूप महत्वाचे आहे. तुमच्या नावामागे किती मोठे आणि प्रसिद्ध आडनाव असले, पण तुमच्यात प्रतिभा नसेल तर पुढे काहीही होऊ शकत नाही. मोठ्या आडनावामुळे नक्कीच सुरुवात तर चांगली मिळते, मात्र नंतर प्रवास सुरु ठेवण्यासाठी प्रतिभा आवश्यक आहे. कोणत्या कलाकाराला आपलेसे करायचे आणि कोणाला नाकारायचे हे सर्व मायबाप प्रेक्षकांच्या हातात असते. अशी अनेक उदाहरणं आहेत जे आपल्या आडनावामुळे या क्षेत्रात आले, परंतु दुर्दैवाने त्यांना यश मिळाले नाही. असेच काहीसे घडले कपूर घराण्यातील एका अभिनेत्याबद्दल.
बॉलिवूडमध्ये कपूर खानदानाचे योगदान सर्वात मोठे आहे. अगदी पृथ्वीराज कपूर यांच्यापासून आजच्या काळातील करीना कपूरपर्यंत या घराण्यातील सर्वांनीच कमी जास्त फरकाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. याच कपूर घराण्यातील शो मॅन म्हणून ओळख मिळवलेले सुपरस्टार अभिनेते, दिग्दर्शक राज कपूर यांचे चिरंजीव असलेल्या राजीव कपूर यांच्यासोबत काहीसे असेच झाले. आज राजीव कपूर (rajiv kapoor) यांची जयंती. राजीव कपूर यांच्या निधनानंतर हा त्यांचा पहिलाच वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्याबद्दल अधिक माहिती.
राजीव कपूर यांचा जन्म 25 ऑगस्ट 1962साली झाला. राजीव हे राज कपूर आणि कृष्णा राज कपूर यांचे सर्वात लहान चिरंजीव. राजीव यांना लहानपणापासूनच चित्रपटांचे वातावरण मिळाले. राजीव मोठे होऊन चित्रपटांमध्ये आले नसते तरच नवल. राजीव यांनी देखील इतर दोघं भावांच्या पावलावर पाऊल टाकत अभिनयात पदार्पण करण्याचे ठरवले. राजीव यांनी त्यांच्या बॉलिवूड करिअरची सुरुवात ‘एक जान हैं हम’ या चित्रपटापासून केली होती. मात्र 1985मध्ये आलेल्या ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटाने त्यांना बॉलिवूडमध्ये ओळख मिळवून दिली. एकीकडे हा सिनेमा सुपरहिट झाला आणि दुसरीकडे मात्र याच सुपरहिट चित्रपटांमुळे राज कपूर आणि राजीव कपूर या बाप-लेकाच्या नात्यात कायमचा दुरावा निर्माण झाला. आता तुम्ही म्हणाल सिनेमा सुपरहिट झाला मग दुरावा का आला? (rajiv kapoor birthday special)

मधु जैन यांनी त्यांच्या ‘द कपूर्स’ या पुस्तकात राज कपूर आणि राजीव कपूर यांच्या नात्याविषयी काही गोष्टी उघड केल्या आहेत. त्यात त्यांनी या दोघांच्या बिनसलेल्या नात्याबद्दल देखील लिहिले आहे. राज कपूर यांनी त्यांचा सर्वात लहान मुलगा असलेल्या राजीव कपूर यांना ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये लॉन्च केले. हा चित्रपट तुफान गाजला. मात्र या चित्रपटाच्या हिट होण्यामागे धबधब्याखाली अंघोळ करताना दिसलेल्या मंदाकिनीचा सीन होता. सर्वत्र या चित्रपटाची आणि चित्रपटातील ‘त्या’ सीनची चर्चा वाढायला लागली. तर दुसरीकडे राज कपूर आणि राजीव कपूर यांच्या नात्यात दुरावा यायला लागला. मंदाकिनीचा ‘तो’ सीन राज आणि राजीव यांच्या नात्यात मिठाचा खडा टाकून गेला. या सिनेमाचा राजीव यांच्या करियरला कोणताच फायदा झाला नाही, याउलट मंदाकिनी रातोरात हिट झाल्या.
राजीव यांचे करियर जिथून सुरु झाले तिथेच थांबले आणि मंदाकिनी यांची गाडी सुसाट धावायला लागली. राजीव कपूर यांना वाटायला लागले की, त्यांच्या या परिस्थितीला त्यांचे वडील राज कपूर जबाबदार आहेत. ‘राम तेरी गंगा मैली’ नंतर राजीव कपूर ‘अंगारे’, ‘जलजला’, ‘लवर ब्वॉय’, ‘शुक्रिया’, ‘हम तो चले परदेस’ या चित्रपटांमध्ये दिसले. पण त्यांचे हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षित कमाल दाखवू शकले नाही. त्यामुळे राज कपूर यांनी पुन्हा आपल्यासाठी एक सिनेमा तयार करावा आणि तो पूर्णतः राजीव यांच्यावर केंद्रित असावा असे वाटायचे. जसा ‘राम तेरी गंगा मैली’ सिनेमाचा मंदाकिनी यांना फायदा झाला, तसा नवीन सिनेमाचा आपल्याला फायदा व्हावा अशी त्यांची इच्छा होती.

मात्र राज कपूर यांनी असे काहीच न करता राजीव कपूर यांना त्यांचे असिस्टंट म्हणून ठेऊन घेतले. राजीव कपूर स्पॉट बॉय आणि असिस्टंट यांच्या युनिटमधील सर्व काम करायचे. जसा काळ पुढे गेला तसे राज कपूर आणि राजीव कपूर यांच्यातील नातेसंबंध आणखीच बिघडत गेले. या दोघांमध्ये असलेला दुरावा, तणाव इतका मोठा होता की, राज कपूर यांच्या निधनानंतरही तो कमी झाला नाही किंवा संपला नाही. राज यांच्या निधनानंतर राजीव त्यांच्या अंत्यसंस्कारांला देखील गेले नाही. इतकेच काय ते त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर कुटुंबापासून दूर तीन दिवसांपर्यंत दारूच्या नशेत होते.

एकीकडे राजीव यांचे व्यावसायिक आयुष्य खूपच वाईट सुरु असताना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात देखील खूप काही खास घडत नव्हते. त्यांना खऱ्या प्रेमातही यश मिळत नव्हते. त्यांच्या आयुष्यात तीन महिला आल्या. त्यांचा पहिला सिनेमा ‘एक जान हैं हम’ हा 1983 साली आला, तेव्हा त्यांच्या आयुष्यात अभिनेत्री दिव्या राणा आल्या. दिव्या यांनी राजीव यांच्यासोबत ‘एक जान हैं हम’ या सिनेमात काम केले होते. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर या दोघांच्या अफेयरच्या चर्चा सुरु झाल्या. पुढील दोन वर्ष त्यांचे नाते खूप सिरीयस होते, मात्र दोन वर्षांनी दिव्या यांनी त्यांचे नाते तोडले आणि फजल नावाच्या व्यक्तीसोबत लग्न केले.

पुढे काही वर्षांनी त्यांच्या आयुष्यात आरती सबरवाल यांची एन्ट्री झाली आणि त्यांनी 2001 मध्ये लग्न केले. हे दोघं एकमेकांसोबत खूप खुश होते, परंतु मधेच माशी शिंकली आणि त्यांच्यात खटके उडू लागले. अवघ्या वर्षभरातच ते वेगळे झाले आणि २००३ साली त्यांनी घटस्फोट घेतला. पुढे बराच काळ ते एकटे होते. मात्र एकदा त्यांची भेट सुनीता यांच्याशी झाली. त्या एयरलाइनमध्ये काम करायच्या. दोघे एकमेकांच्या प्रेमात होते. काही दिवस ते लिव्ह इनमध्ये देखील होते. त्यांच्या घरी याबद्दल सर्व माहित होते, मात्र कोणी त्यांना लग्नाबद्दल विचारले नाही. ना कधी राजीव यांनी सुनीता यांना आरके हाऊसमध्ये आणले, नाही त्या कधी आल्या. याच वर्षी १० फेब्रुवारी रोजी राजीव कपूर यांचे वयाच्या 58 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
हेही नक्की वाचा-
‘या’ प्रसिद्ध गायकाची तब्येत खालावली; लाईव्ह शोज रद्द झाल्याने 15 कोटींचं नुकसान
‘जय हो’मध्ये सलमानसोबत काम केलेल्या डेझी शाहने केलाय त्याच्याच गाण्यात बॅकग्राउंड डान्स, वाचा तिचा प्रवास