Thursday, November 21, 2024
Home बॉलीवूड राकेश रोशन यांनी ‘या’ कारणासाठी त्यांच्या कारकिर्दीमध्ये महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत केले नाही काम

राकेश रोशन यांनी ‘या’ कारणासाठी त्यांच्या कारकिर्दीमध्ये महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत केले नाही काम

असं म्हणतात आपण जो सिनेमा पडद्यावर बघतो तो दिग्दर्शकाच्या नजरेतूनच बघत असतो. बॉलिवूडची ही स्वप्ननगरी अनेक लोकांच्या अभिनेता, अभिनेत्री होण्याच्या स्वप्नांना सत्यात उतरवण्याचे काम करते. मात्र या कलाकरांना घडवणारे आणि त्यांच्याकडून उत्तम अभिनय करू घेणारे दिग्दर्शक नेहमीच पडद्यामागे राहून त्यांचे काम करत असतात. दिग्दर्शक हा संपूर्ण चित्रपटाच्या जहाजाचा कॅप्टन असतो. बॉलिवूडमध्ये अगदी पहिले दिग्दर्शक म्हणून ओळखले जाणारे दादासाहेब फाळके यांच्यापासून ते अगदी सध्याच्या करण जोहरपर्यंत अनेक दिग्गज आणि महान दिग्दर्शक होऊन गेले. या दिग्दर्शकांनी त्यांच्या कल्पनेतला सिनेमा प्रेक्षकांसमोर आणत अनेक विषय अगदी जिवंत केले.

अनेक उत्तमोत्तम कलाकृती त्यांनी प्रेक्षकांसमोर आणलेल्या. याच दिग्दर्शकांच्या व्हिजनवर हा संपूर्ण सिनेमा तयार होतो. बॉलिवूडमध्ये यशस्वी दिग्दर्शकांच्या यादीत एक नाव आग्रहाने घ्यावेच लागेल आणि ते नाव आहे, राकेश रोशन. ‘करण अर्जुन’, ‘किंग अंकल’, ‘कोयला’, ‘कहो ना प्यार हैं’, ‘कोई मिल गया’, ‘क्रिश’ आदी अनेक हिट चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे राकेश रोशन बुधवारी(6 सप्टेंबर) त्यांचा वाढदिवस साजरा करत आहे. दिग्दर्शक, अभिनेते, निर्माता, पटकथा लेखक अशा विविध भूमिका साकारणारे राकेश रोशन एक बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया त्यांच्याबद्दल काही खास माहिती.

राकेश रोशन यांच्या जन्म 6 सप्टेंबर1949 रोजी मुंबईमध्ये झाला. आज ते त्यांचा 73 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यांचे पूर्ण नाव राकेश रोशनलाल नागरनाथ आहे. त्यांचे वडील रोशनलाल नागरनाथ हे हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक होते. त्यामुळे राकेश लहानपणापासूनच चित्रपटांच्या स्वप्ननगरीशी जोडले गेले. सुरुवातीला राकेश यांच्या घरची परिस्थिती फार बिकट होती. ते मुंबई वर्सोवामधील एका गॅरेजमध्ये राहत होते. हळूहळू परिस्थिती सुधारत गेली आणि राकेश यांना साताऱ्यातील सैनिक शाळेत त्यांच्या वडिलांनी प्रवेश घेऊन दिला. त्यानंतर राकेश यांनी पुण्यातील वाडिया महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. सर्व काही सुरळीत सुरु होते. पण मध्येच त्यांच्या सुखाने भरलेल्या दुधाच्या भांड्यात माशी पडली आणि त्यांच्या वडिलांनी या जगाचा निरोप घेतला.

त्यानंतर त्यांच्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आल्याने त्यांनी शिक्षण सोडून दिग्दर्शक व्हायचे ठरवले. दिग्दर्शनात त्यांचा हातखंडा होता. परंतु त्यांना अभिनय करण्याची इच्छा झोप लागून देत नव्हती. त्यावेळी राजेंद्र कुमार यांच्या सहकार्याने राकेश यांनी त्यांचा मोर्चा अभिनयाकडे वळवला. ‘घर घर की कहाणी’ या चित्रपटामधून ते पडद्यावर झळकले. यानंतर त्यांनी आयुष्यात येणाऱ्या अडचणींच्या लाटा मागे सारत अभिनयाशी एकरूप झाले. ‘पराया धन’मध्येही त्यांनी अभिनय केला. परंतु अभिनयमध्ये त्यांचे जहाज फार काळ तग धरू शकले नाही.

राकेश रोशन यांनी दिग्दर्शनात जे यश मिळवले ते त्यांना अभिनयात मिळवता आले नाही. आज राकेश रोशन आणि अनेक यश हे दोन शब्द सोबतच घेतले जातात. आजच्या पिढीने राकेश रोशन यांच्या डोक्यावर कधीच केस पाहिले नाही. मात्र आपण जर त्यांचे जुने सिनेमे पाहिले तर त्यांच्या लक्षात येईल की, त्यांच्या डोक्यावर भरपूर केस होते. मग अचानक ते केस काढून का राहू लागले? त्यांच्या डोक्यात आता केस नसण्याचे नक्की कारण कोणते? खरतर यामागे कोणतेही आजाराचे कारण नाही. राकेश यांनी त्यांच्या पहिल्या ‘खुदगर्ज’ या चित्रपटावेळी तिरुपती बालाजीला नवस मागितला होता. त्यांनी ते आपले केस दान करणार असे कबुल केले होते. परंतु हा नवस ते विसरले. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात अनेक अडचणी येऊ लागल्या. त्यानंतर त्यांनी बालाजी देवस्थानी केस दान केले आणि इथून पुढे कधीच केस येऊ देणार नाही अशी शपथ घेतली.

राकेश रोशन यांनी अमिताभ बच्चन यांच्या बरोबर एवढ्या वर्षांमध्ये एकही चित्रपट केला नाही. यामागचे कारण राकेश यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले होते. राकेश म्हणाले की, “माझा ‘किंग अंकल’ हा चित्रपट मी अमिताभ यांच्यासोबत करणार होतो. अमिताभ यांना समोर ठेवूनच हा चित्रपट मी लिहिला होता. सर्व तयारी झाली होती. परंतु ऐन वेळी अभिताभ यांनी या चित्रपटामध्ये काम करण्यास नकार दिला. यासाठी त्यांनी त्याचे खासगी कारण सांगितले होते. त्यामुळे मी पुढे त्याच्याबरोबर एकही चित्रपट करायचा नाही असे ठरवले”

त्यावेळी त्यांनी एका ज्योतिषाच्या सांगण्यावरून आपल्या चित्रपटांची नावे ‘क’ या अक्षरापासून ठेवायला सुरुवात केली. ज्योतिषाचे म्हणणे खरे देखील ठरले, आणि त्यांचे ‘क’ अक्षरापासून सुरु होणारे सर्वच चित्रपट हिट झाले. त्यांची अशी भावना आहे की, ‘क’ हे अक्षर त्यांच्यासाठी आणि त्यांच्या चित्रपटासाठी खूप शुभ आहे. राकेश यांनी ऋतिक बरोबर केलेले सर्व सिनेमे हिट झाले. त्या चित्रपटांची नावे त्यांनी ‘क’ वरुनच ठेवली होती. ‘कहो ना प्यार है’, ‘कारोबार : द बिझनेस ऑफ लव’, ‘कोई मिल गया’, ‘क्रिश’, ‘क्रेजी 4’, ‘क्रिश 3’ आदी अनेक चित्रपटांचा या यादीत समावेश आहे.

राकेश रोशन यांचा या वयातील फिटनेसदेखील वाखाणण्याजोगा आहे. राकेश यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या घशाच्या कर्करोगावर यशस्वी मात केली. राकेश रोशन यांनी नेहमीच त्यांच्या तत्वावर काम केले आणि ते यशस्वी देखील झाले.

हेही नक्की वाचा- 
गायक नाहीतर ‘हे’ होते हार्डी संधूचे स्वप्न, एका अपघाताने बदलला निर्णय
विस्कटलेले केस आणि रस्त्याने बडबडताना दिसली राखी सावंत? अभिनेत्रीचा लूक पाहून नेटकरी हदरले

 

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा