प्रसिद्ध दिग्दर्शक रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या कार्यक्रमातील आणखी एका प्रसिद्ध कलाकाराचे निधन झाले आहे. या कार्यक्रमात निषाद राज ही भूमिका साकारणारे अभिनेते चंद्रकांत पंड्या यांनी गुरुवारी (२१ ऑक्टोबर) अखेरचा श्वास घेतला. ते ७८ वर्षांचे होते. चंद्रकांत हे अनेक आजारांनी ग्रस्त होते. त्यामुळे त्यांच्या निधनाचे कारण त्यांचे आजार असल्याचे सांगितले जात आहे.
चंद्रकांत यांच्या निधनाची पुष्टी ‘रामायण’मध्ये सीतेची भूमिका साकारणाऱ्या दीपिका चिखलियाने केली आहे. दीपिकाने अधिकृत इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत चंद्रकांत यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले. त्यांचा एक फोटो शेअर करत दीपिकाने लिहिले कॅप्शनमध्ये की, “तुमच्या आत्म्याला शांती मिळो चंद्रकांत पंड्या, रामायणचे निशाद राज.”

याव्यतिरिक्त अरुण गोविल यांनीही चंद्रकांत यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. (Ramayans Nishad Raj AKA Chandrakanth Pandya Passes Away At Age of 78 )
चंद्रकांत यांच्याबद्दल बोलायचं झालं, तर त्यांचा जन्म १ जानेवारी, १९४६ रोजी गुजरातच्या बनासकांठा येथे झाला होता. इथे ते भीलडी या गावचे रहिवासी होते. व्यावसायाशी संबंध असणाऱ्या चंद्रकांत यांचे कुटुंब फार वर्षांपूर्वी गुजरात येथून मुंबईत स्थायिक झाले होते. चंद्रकांत यांचे शिक्षण मुंबईतच झाले होते. यानंतर त्यांनी लहान-मोठ्या भूमिका साकारून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यांनी नाटकातही काम केले. दुसरीकडे ‘रावण’ म्हणजेच अरविंद त्रिवेदी यांच्यासोबतही त्यांनी थिएटरमध्ये काम केले होते.
असे असले, तरीही चंद्रकांत यांना खरी ओळख ही रामानंद सागर यांच्या ‘रामायण’मधूनच मिळाली होती. त्यांच्या निषाद राज या पात्राला चांगलीच पसंती मिळाली होती. हे पात्र श्री रामांच्या खूप जवळ होते. रामायणाव्यतिरिक्त त्यांनी ‘महाभारत’, ‘विक्रम बेताल’, ‘होते होते प्यार हो गया’, ‘पाटली परमार’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केले होते.
त्यांनी अनेक मालिंकासोबतच अनेक चित्रपटांमध्येही काम केले. त्यांचा पहिला चित्रपट गुजराती होता, ज्याचे शीर्षक ‘कडू मकरानी’ असे होते. या चित्रपटातून त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली आणि ते गुजराती चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार बनले होते. त्यांनी जवळपास १०० टीव्ही शो आणि चित्रपटात काम केले होते.
चंद्रकांत यांच्यापूर्वी ‘रामायण’मध्ये रावणाची भूमिका साकारणारे अरविंद त्रिवेदी यांचेही निधन झाले होते.
त्यांची एक खास ओळख म्हणजे, ते दिग्गज बॉलिवूड अभिनेते अमजद खान यांचे जवळचे मित्र होते. दोघांचीही मैत्री कॉलेजच्या दिवसांपासून होती. ते एकाच कॉलेजात शिक्षण घेत होते.
चंद्रकांत यांच्या निधनामुळे इंडस्ट्रीचे मोठे नुकसान झाले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अनन्या पांडेच्या घरी NCB अधिकारी, चौकशीसाठी अभिनेत्रीला समन्स
-ब्रेकिंग! आर्यन खान प्रकरण आणखी खोलात, शाहरुखच्या ‘मन्नत’वर पडली रेड










