बॉलिवूडमधील हॉटेस्ट कपल म्हणून रणबीर आणि आलिया खूप प्रसिद्ध आहे. अनेक ठिकाणी सोबत दिसून नेहमी चर्चेत येणारे हे कपल पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. नुकतेच रणबीर कपूरने एका मुलाखती दरम्यान आलियाला त्याची गर्लफ्रेंड म्हणून संबोधले. ज्यात त्याने लोकांना पडलेल्या प्रश्नाचे उत्तर दिले. जर यावर्षी कोरोना नसता तर कदाचित आमचे लग्न झाले असते असे त्याने सांगितले.
रणबीर कपूरने नुकतीच पत्रकार राजीव मसंद यांना एक मुलाखत दिली. त्यात रणबीरने आलियासह अनेक गोष्टींवर मनमोकळी उत्तरं दिली आहेत. त्याने सांगितले की, “२०२० ची सुरुवात आणि नंतर काही महिने आमच्यासाठी खूप कठीण होते. मात्र त्यानंतर मी आणि आलियाने लॉकडाऊनमध्ये खूप वेळ एकत्र घालवला. दिवसभर मी चित्रपट आणि मालिका बघायचो, तर आलिया काहीतरी नवीन शिकत होती. मी काही पुस्तके वाचायला आणि माझ्या परिवाराला वेळ देत होतो. मी दिवसातून बरेच चित्रपट बघायचो. माझी जी गर्लफ्रेंड आहे आलिया ती ओव्हर अचिव्हर आहे. तिने गिटारपासून स्क्रिप्ट रायटिंगपर्यंत शक्य तेवढे सर्व ऑनलाइन क्लास केले. तिच्यासमोर मी स्वतःला काहीसा अंडरअचिव्हर समजतो. कारण मी तिच्या तुलनेत एवढे कोणतेच क्लास केले नाही.”
पुढे तो त्याच्या आणि आलियाच्या लग्नाबद्दल बोलताना म्हणाला की, “मला वाटते की जर कोरोनासारख्या महामारीने आपल्या आयुष्यात प्रवेश केला नसता तर कदाचित आमचे लग्न झाले असते. मात्र मी अशा करतो की लवकरच माझ्या आयुष्याचे हे एक लक्ष मी पूर्ण करेन.”
आपले वडील आणि दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्याबद्दल बोलताना रणबीर काहीसा हळवा झाला. तो म्हणाला, ” ते जायच्या आधी मागचे दोन वर्ष मी यांच्यासोबत खूप वेळ घालवला. हॉटेलमध्ये राहण्यापासून ते त्यांना हॉस्पिटलमध्ये किमोथेरपीसाठी घेऊन जाण्यापर्यंत अनेक गोष्टी मी केल्या. मला माहित नाही आज माझ्याकडे ते शब्द सुद्धा आहेत की नाही, ज्यांनी मी माझ्या वडिलांना आणि माझ्यासाठी त्यांच्या स्थानाला स्पष्ट करू शकतो. माझ्यासाठी ते खूप महत्वाचे होते आणि नेहमीच राहतील. २०२० हे वर्ष खरंच सर्वांसाठी खूप कठीण राहिले. एकतर कोरोना आणि दुसरीकडे माझ्यासारख्या अनेक लोकांनी त्यांच्या सर्वात जवळच्या व्यक्तीला या वर्षी गमावले आहे.”
आलियाने नुकतेच एका मुलाखतीत सांगितले की, ‘मला एवढ्या लवकर लग्न करायचे नाहीये. मी अजून लग्नासाठी खूप लहान आहे. मी लग्न करेन पण लगेच नाही.’
रणबीर आणि आलिया लवकरच ‘ब्रह्मास्त्र’ या सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा येत्या २०२१ मध्ये प्रदर्शित होणार आहे.