हरियाणामधील अनेक कलाकार आज बॉलिवूडमध्ये काम करत आहेत. यामध्ये जयदीप, सतीश कौशिक, राजकुमार राव, यशपाल शर्मा या कलाकारांचा समावेश होतो. या सगळ्या कलाकारांमध्ये एक नाव असे आहे, ज्या नावाने आज बॉलिवूडमध्ये काम करून त्याचे एक जबरदस्त स्थान तयार केले आहे. तसेच हरियाणवी चित्रपटसृष्टीमध्ये देखील त्याने अनेक कामे केली आहेत. ते नाव म्हणजे रणदीप हुड्डा होय. आतापर्यंत ३२ पेक्षाही जास्त चित्रपटात काम करणारा रणदीप बॉलिवूडमध्ये गेल्या २ दशकापासून काम करत आहे. रविवारी (20 ऑगस्ट) रणदीप त्याचा 47 वा वाढदिवस साजरा करत आहे. चला तर जाणून घेऊया त्याच्या आयुष्यातील कधीही न ऐकलेल्या गोष्टी…
रणदीप हुड्डाचा जन्म हरियाणामधील रोहतक जिल्ह्यामध्ये 20 ऑगस्ट, 1975 रोजी झाला आहे. त्याचे वडील पेशाने सर्जन होते, तर आई एक समाजसेविका होती. रणदीप जेव्हा 8 वर्षाचा होता, तेव्हा त्याला परिवाराने एमएनएसएस बोर्डिंग शाळेत पाठवले होते. तिथेच त्याने त्याचे प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्याने दिल्लीमध्ये शिक्षण घेतले. त्यानंतर त्याने त्याचे उच्च शिक्षण ऑस्ट्रेलियामध्ये पूर्ण केले. तिथे त्याने मार्केटिंग आणि मास्टर्स इन बिझनेस मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले. ऑस्ट्रेलियामध्ये शिक्षण चालू असताना त्याने एका चायनीज रेस्टॉरंटमध्ये काम केले. तसेच त्याने अनेक गाड्या साफ केल्या. एवढंच काय तर त्याने टॅक्सी देखील चालवली आहे. यानंतर 2 वर्षांनी तो भारतात परत आला आणि त्यान एका एअर लाईन्सच्या मार्केटिंग डिपार्टमेंटमध्ये जॉब केला. (randeep hooda’s birthday know some untold facts about sarabjit actor)
रणदीप हुड्डाचा चित्रपटसृष्टीतील प्रवास 2001 मध्ये ‘मान्सून वेडींग’ या चित्रपटातून सुरू झाला. या चित्रपटात त्याने एनआरआयचे पात्र निभावले होते. असे म्हटले जाते की, त्याचा ऑस्ट्रेलियन एक्सेंट चांगला असल्याकारणाने त्याला या चित्रपटात काम मिळाले होते. यानंतर 4 वर्षांनी त्याला दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये काम मिळाले. यामध्ये त्याला रामगोपाल वर्मा यांची साथ मिळाली होती.
यानंतर 2005 मध्ये अंडरवर्ल्डवर आधारित असलेला ‘डी’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात रानदीपने काम केले होते. तिथूनच त्याला खरी ओळख मिळाली. हा चित्रपट म्हणजे त्याच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट होता. जिथून त्याच्या भरभराटीला सुरुवात झाली. यानंतर त्याने परत कधीच मागे वळून पाहिले नाही. रणदीपने बॉलिवूडमध्ये 32 पेक्षाही जास्त चित्रपटात काम केले आहे. आता तो सलमान खानसारख्या सुपरस्टारसोबत स्क्रीन शेअर करतो.
रणदीप त्याच्या कामाबाबत खूप गंभीर असतो. या गोष्टीचा अंदाज येथूनच येतो की, त्याने ‘सरबजीत’ या चित्रपटासाठी त्याचे वजन खूप कमी केले होते. माध्यमातील वृत्तानुसार, रणदीपचे वजन कमी झाल्याने त्याला चित्रपटाच्या सेटवर चक्कर आली होती आणि तो बेशुद्ध झाला होता. या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार देखील मिळाला होता.
दिसायला अत्यंत स्मार्ट आणि हँडसम असणाऱ्या रणदीप हुड्डाचे नाव इंडस्ट्रीमधील अनेक मोठमोठ्या अभिनेत्रींसोबत जोडलेले होते. यामधील सर्वात जास्त चर्चेत असणारे नाव म्हणजे सुष्मिता सेन. ते दोघे अनेक दिवस एकमेकांना डेट करत होते. त्यांचे रिलेशन खूप चर्चेत होते. परंतु काही कारणांनी नंतर त्यांचे ब्रेकअप झाले. ब्रेकअपनंतर 2-3 वर्षांनंतर त्याचे नाव नीतू चंद्रासोबत जोडले होते. ते अनेक दिवस डेट करत होते. त्यांच्या नात्याची देखील चर्चा अनेक दिवस चालली होती. नीतूसोबत तो 2010 पासून ते 2013 पर्यंत रिलेशनमध्ये होता. यानंतर त्याचे नाव अदिती राव हैदरी, चित्रांगदा सिंग आणि लिसा हेडन यांच्याशी जोडले होते.
रणदीपने त्याच्या करिअरमध्ये ‘राधे’, ‘एक्स्ट्रॅक्शन’, ‘सरबजीत’, ‘हायवे’, ‘दो लफ्जों की कहाणी’, ‘जिस्म 2’, ‘किक’, ‘सुलतान’, ‘लाल रंग’, ‘मर्डर 3’, ‘बाघी 2’, ‘लव्ह आज कल’, ‘जन्नत 2’, ‘हिरोईन’, ‘कॉकटेल’, ‘रिस्क’, लव्ह खिचडी’ यांसारख्या अनेक चित्रपटात काम केले आहे.
हेही नक्की वाचा-
–अभिनेत्री मानसी नाईकने सांगितला ‘तो’ धक्कादायक किस्सा; म्हणाली, ‘चालकाला झोप लागली अन् आमची गाडी…’
–शॉल्लेट! कियाराचे ‘असे’ फोटो तुम्ही कधीच पाहिले नसतील