Monday, July 8, 2024

‘महानायका’चा एकच शब्द आणि बदलला होता राष्ट्रपती भवनातील नियम, अभिमानाने फुगेल तुमचीही छाती

बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार म्हणून ओळखले जातात, ते राजेश खन्ना. राजेश खन्नांपूर्वी दिलीप कुमार, राज कपूर, राजेंद्र कुमार, देव आनंद यांसारख्या दिग्गज अभिनेत्यांचा दबदबा होता, पण जेव्हा राजेश खन्नांची एन्ट्री झाली, तेव्हा सर्वच चित्र पालटलं. त्यांनी इतर अभिनेत्यांना आपल्या यशाने मागं टाकलं, पण राजेश खन्ना यांचा सूर्यही कधी ना कधी डोंगराच्या पलीकडं जाणारंच होता आणि तो गेलाही. त्यानंतर एन्ट्री झाली ती म्हणजे अमिताभ बच्चन यांची. राजेश खन्नांनंतर बॉलिवूड कुणी गाजवलं असेल, तर ते म्हणजे अमिताभ बच्चन यांनीच. अमिताभ यांचा इतका दबदबा होता की, त्यांच्या शब्दाबाहेर दिग्दर्शकही जात नव्हते. कधीकधी तर ते स्वत:च स्क्रिप्टमध्ये बदल करायचे. सिनेमात एखाद्या अभिनेत्रीला घेणं न घेणं हेही त्यांच्यावरच असायचं. अमिताभ यांचा हा इतका दरारा फक्त सिनेमातच नव्हता, तर खऱ्या आयुष्यातही होता. एके दिवशी राष्ट्रपती भनवात डिनरसाठी गेले असताना त्यांनी थेट राष्ट्रपती भवनातील एक मोठा आणि महत्त्वाचा नियमच बदलला होता. काय होता तो नियम, चला तर पाहूया.

अमिताभ बच्चन यांच्या गाडीनं १९७४ सालच्या ‘रोटी कपडा और मकान’ या सिनेमापासून जो वेग धरला होता, तो काय थांबायचं नावंच घेत नव्हता. त्यांना त्यांच्या सिनेमांमुळे जबरदस्त प्रसिद्धी मिळत होती. अमिताभ करिअरच्या शिखरावर होते. महत्त्वाचं म्हणजे त्यांचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांंधी यांच्याशी जवळचे नाते होते. राजकारणाची दार त्यांच्यासाठी खुली होती, पण अमिताभ यांना काय राजकारणात रस नव्हता. पण राजीव गांधी यांच्यासोबत त्यांचे नाते इतक्या जवळचे होते की, ते दोघेही एकमेकांचा शब्द टाळत नव्हते. इतकेच नाही, तर रशीद किदवई यांनी त्यांच्या ‘नेत- अभिनेता: बॉलिवूड स्टार पावर इन इंडियन पॉलिटिक्स’ या पुस्तकात स्पष्ट केलंय की, अमिताभ आणि राजीव गांधी यांची इतकी जवळीक होती की, अनेकदा सरकारमधले काही महत्त्वाचे निर्णयदेखील ते अमिताभ बच्चन यांच्या सल्ल्यानेच घ्यायचे.

शेवटी राजीव गांधी यांच्या सांगण्यावरून १९८४ साली अमिताभ बच्चन यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यांनी उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री हेमवंती नंदन बहुगुणा यांच्याविरुद्ध इलाहाबाद येथून निवडणूक लढवली होती. सिनेमाच्या पडद्यावर यशाच्या पायऱ्या चढणाऱ्या अमिताभ बच्चन यांनी या निवडणूकीत कमाल दाखवली होती. ८व्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्यासोबत हजारो लोक उभे होते. या निवडणुकीत त्यांनी बहुगुणा यांचा पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला होता. ६८.२ टक्के मतांनी अमिताभ यांनी बहुगुणा यांना पराभूत केलं होतं. त्यांच्या मतांमधलं अंतर हे जवळपास पाऊणे दोन लाख इतकं होतं.

निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर आता अमिताभ हे संसदेचे सदस्य बनले होते. त्यांना इतर खासदारांसोबत राष्ट्रपती भवनात डिनरसाठी सांगावा धाडला होता. यावेळीही ते सर्वांसोबत नम्रपणे वागत होते. अर्थातच त्यांच्यात राजकारणाच्या वाटेवर बिनधास्तपणे चालण्याची क्षमताही होती. जेव्हा सर्वजण डिनरसाठी बसतात, तेव्हा त्यांचे लक्ष अचानक ताटाकडे जाते. त्यावेळी राष्ट्रपती भवनातील जेवणाच्या ताटांवर अशोक स्तंभाचे चिन्ह कोरलेले असायचे. राष्ट्रीय प्रतीक असलेले अशोक स्तंभ जेवणाच्या ताटावर पाहून अमिताभ बच्चन हे जरा अस्वस्थ झाले. आणि त्यांना हा राष्ट्रीय चिन्हाचा अपमान असल्याचे वाटले.

“राष्ट्रीय चिन्ह हे एखाद्याच्या जेवणाच्या ताटाचा भाग कसा असू शकतो”, असे म्हणत अमिताभ बच्चन यांनी तिथे बसलेल्या सर्वांसमोर आपले मत मांडले. अमिताभ बच्चन यांचे हे म्हणणे राजकीय नेत्यांमध्ये खूप प्रभावी ठरले. तिथे बसलेल्या बहुतांश व्यक्तींनी त्यांचे समर्थनही केले.

या घटनेच्या काही दिवसांनंतर, एक नवीन कायदा संमत करण्यात आला, ज्यात राष्ट्रपती भवनाच्या सर्व ताटांवरून राष्ट्रीय चिन्ह काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. अशाप्रकारे राष्ट्रपती भवनातील ताटांशी संबंधित हा नियम अमिताभ बच्चन यांच्या सांगण्यावरून बदलण्यात आला.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
अनिल कपूरला रक्तबंबाळ अवस्थेत पाहून जाम घाबरलेले लोक, भीतीमुळे थेट पोलिसांना लावलेला फोन
राज- नर्गिस ते दिलीप- मधुबाला, बॉलिवूडमधल्या ‘या’ जोड्या प्रेम एक होण्यासाठी तरसल्या
‘त्या’ भयानक किस्स्यामुळं इरफान अनेक दिवस बेडरूममध्येच होता पडून, बाहेर जाण्यासही भरायची धडकी

हे देखील वाचा