‘फ्रुटी’ हे नाव उच्चारताच आजच्या काळातील मुलांना ‘फ्रुटी’ नावाचे पेय आठवेल, मात्र ९० च्या दशकातील मुलांना ‘फ्रुटी’ म्हणताच ‘सोन परी’ आठवेल. आता तुम्ही म्हणाल अचानक ‘फ्रुटी’, ‘सोन परी’ हे शब्द आठवायला काय झाले? झाले काही नाही हो फक्त आज आम्ही तुमच्या आमच्या सर्वांच्या लाडक्या ‘फ्रुटी’ म्हणजेच तन्वी हेगडे बद्दल काही माहिती सांगणार आहोत.
९०च्या दशकात आलेला ‘सोन परी’ हा जादुई शो तुफान हिट झाला. जवळपास त्यावेळच्या सर्वच लहान मुलांनी आणि मोठ्यांनी सुद्धा हा कार्यक्रम पाहिला असेलच. ही मालिका इतकी यशस्वी झाली की मालिका संपून जवळपास १५ वर्ष झाले, तरी मालिकेतील सर्व पात्र आजही सर्वानी अगदी लख्य आठवतात. या मालिकेतील सर्व पात्र खूप लोकप्रिय झाले होते. फ्रुटी म्हणजेच तन्वी हेगडे, सोन परी म्हणजेच मृणाल कुलकर्णी, अल्तु म्हणजेच अशोक लोखंडे ही सर्व पात्र आपल्या डोक्यात घर करून आहे. यातलीच मुख्य बालकलाकार फ्रुटी म्हणजेच तन्वी हेगडे आज खूप मोठी झाली आहे.
तन्वीचा जन्म ११ नोव्हेंबर १९९१ मध्ये झाला. ती फक्त तीन वर्षाची असताना तिने तिच्या करियरला सुरवात केली. तीन वर्षाच्या तन्वीने ‘रसना बेबी कॉन्टेस्ट’ मध्ये सहभाग घेऊन ही स्पर्धा जिंकली, आणि तिच्या करियरला सुरुवात झाली. त्यानंतर तन्वीने अनेक जाहिराती केल्या. काही काळानंतर तिची ‘सोन परी’ मालिकेतल्या ‘फ्रुटी’ या मुख्य पात्रासाठी निवड झाली. ‘फ्रुटी’ने तन्वीला प्रचंड लोकप्रियता दिली. आजही तन्वीला ‘फ्रुटी’ म्हणूनच ओळखले जाते. २६८ भागांच्या पूर्तीनंतर ‘सोन परी’ मालिका बंद त्यानंतर तन्वी अनेक जाहिरातींमध्ये झळकली. ‘शकलाका बूम बूम’ आणि ‘खिचडी’ मालिकेत ती काही भागांसाठी दिसली. तिने ‘गजगामिनी’ या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर ती ‘चॅम्पियन’, ‘राहुल’, ‘चल चले’, ‘वाह! लाईफ हो तो ऐसी’, ‘पिता’, ‘विरुद्ध’ आदी सिनेमातून काम केले.
तन्वीने २०१६ साली ‘अथांग’ या मराठी सिनेमातून तन्वी मुख्य नायिकेच्या रूपात सर्वांसमोर आली. याशिवाय तन्वी अनेक जाहिरातींमधून दिसत असते.