[rank_math_breadcrumb]

सलमानसोबत काम केलेल्या रुखसार, 19 वर्षांत आई, घटस्फोटाचा अनुभव, तर मुलगी करते हे काम

रुखसार रहमान ही भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन अभिनेत्री असून, बॉलीवूड चित्रपटांसह टीव्ही मालिकांमधील तिच्या दमदार अभिनयासाठी ती ओळखली जाते. 90च्या दशकाच्या सुरुवातीला तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं, मात्र वैयक्तिक कारणांमुळे तिला करिअरमधून दीर्घ ब्रेक घ्यावा लागला. 2000 नंतर तिने पुन्हा एकदा इंडस्ट्रीत जोरदार पुनरागमन केलं आणि आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली.

रुखसारला सुरुवातीला 1991 साली प्रदर्शित ‘सनम बेवफा’ या सलमान खान अभिनीत चित्रपटात मुख्य अभिनेत्रीची भूमिका मिळाली होती. मात्र चित्रपटाच्या करारावरून तिच्या वडिलांना आक्षेप होता. एका मुलाखतीत रुखसारने सांगितले की, कराराच्या अटी त्यांना मान्य नव्हत्या आणि त्यामुळे तिला हा प्रोजेक्ट सोडावा लागला. विशेष म्हणजे, तिने 3-4 दिवस शूटिंगही केलं होतं आणि चित्रपटातील पात्राचं नावही ‘रुखसार’ असंच ठेवण्यात आलं होतं. तिच्या जागी अभिनेत्री चांदनी हिला कास्ट करण्यात आलं आणि ‘सनम बेवफा’नंतर ती रातोरात स्टार झाली.

जरी रुखसारला (Rukhsar)हा मोठा ब्रेक मिळू शकला नाही, तरी 17 वर्षांनंतर तिने सलमान खानसोबत 2008 मधील ‘गॉड तुस्सी ग्रेट हो’ या चित्रपटातून पुनरागमन केलं. या चित्रपटात तिने सलमानच्या बहिणी मधु प्रजापतीची भूमिका साकारली. सलमानसोबत पुन्हा काम करण्याचा अनुभव अत्यंत आनंददायी असल्याचं तिने सांगितलं.

रुखसारने फक्त चित्रपटच नव्हे तर टेलिव्हिजन आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवरही आपला ठसा उमटवला आहे. ‘पीके’, ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’, ‘83’, ‘खुदा हाफिज 2’ यांसारख्या चित्रपटांसह ‘कुछ तो लोग कहेंगे’, ‘तुम्हारी पाखी’, ‘द गॉन गेम’ आणि ‘द नाईट मॅनेजर’सारख्या वेब सीरिजमध्येही ती झळकली आहे.

वैयक्तिक आयुष्यात रुखसारला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अरेंज मॅरेजनंतर 19व्या वर्षी आई बनलेल्या रुखसारने अवघड वैवाहिक आयुष्यातून बाहेर पडत, आपल्या आठ महिन्यांच्या मुलीसह नव्या आयुष्याची सुरुवात केली. घटस्फोटानंतर तिने आपल्या गावात कपड्यांचा बुटीक सुरू केला. आज रुखसार अभिनय क्षेत्रात सक्रिय असून, आपली मुलगी आयशा अहमद हिच्या करिअरलाही पाठिंबा देत आहे.

हेही वाचा

जुळ्या मुलींच्या जन्मानंतर 2 वर्षांनी ‘छोटी बहू’ दुसऱ्यांदा आई होणार; व्हिडिओ शेअर करत दिली आनंदाची बातमी