Friday, March 29, 2024

सारेगमपा लिटील चॅम्प मराठीच्या नवीन पर्वाला लवकरच सुरवात, पाहा कोण असणार आहेत परिक्षक

गेल्या काही वर्षात अनेक रियालिटी कार्यक्रम टीव्हीवर मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. या कार्यक्रमांमुळे यातील कलाकारांच्या कलेला मोठया प्रमाणात वाव मिळाला आहे. अगदी छोट्या छोटया गावातूनसुद्धा स्पर्धक या कार्यक्रमात सहभागी झालेले आपण आजवर बघितले आहेत. अशाच काही कार्यक्रमांपैकी प्रेक्षकांच्या मनात कायमचे घर करून राहिलेला कार्यक्रम म्हणजेच सा रे ग म प लिटील चॅम्प मराठी हा होय. यातील लहान मुलांमधील कमालीची कला आणि काहीतरी करून दाखवण्याची धडपड प्रत्येकालाच काहीतरी शिकवून गेली.

सा रे ग म प लिटील चॅम्प या कार्यक्रमाची सुरवात १८ सप्टेंबर २००६ साली झाली होती. आजवर या कार्यक्रमात पल्ल्लवी जोशी यांच्या गोड आवाजाने सूत्रसंचालनात एक वेगळीच मज्जा बघायला मिळाली आहे. कार्यक्रमात सूत्रसंचालनाची भूमिका आजवर त्यांनी कमालीच्या ताकदीने पार पाडली आहे. त्यातच तोडीस तोड परीक्षक अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांनी मुलांना कायमच योग्य मार्गदर्शन करत त्यांच्यातल्या कलेला मोठया प्रमाणात वाव दिला.

सा रे ग म प लिटील चॅम्प परत एकदा सगळ्यांच्या भेटीला येत आहे. एक काळ असा होता की, जेव्हा मुग्धा वैशंपायम, आर्या आंबेकर, प्रथमेश लघाटे, रोहित राव, कार्तिकी गायकवाड या पंचरत्नांनी सा रे ग म प चे व्यासपीठ खूप गाजवले होते आणि आता हेच स्पर्धक येत आहेत,आपल्या भेटीला ते ही परीक्षकाच्या भूमिकेतून. ‘गाईन गीत सुरेल नवे’ म्हणत या पंचरत्नांनी प्रेक्षकांच्या मनावर अशी काही जादू केली होती की, जी आजही तशीच सर्वत्र बघायला मिळते.

हे पंचरत्न जेव्हा स्पर्धक म्हणून या स्पर्धेत आले होते तेव्हा प्रत्येकाच्या गाण्यात एक वेगळी खासियत प्रेक्षकांना बघायला मिळावी होती. प्रथमेशचा शास्त्रीय संगीताचा बाज, रोहितची उडत्या चालीची गाणी, मुग्धाच्या आवाजातला सुरेल गोडवा,आर्याच्या आवाजातील वेगळेपणा आणि कार्तिकीच्या आवाजातला वेगळाच बास या सगळ्यांनी कमल करून दाखवली होती.

आता हे सगळेच पंचरत्न परीक्षकांच्या भूमिकेतून सगळ्यांसमोर येत आहेत. अशातच हे व्यासपीठ नवीन येणाऱ्या स्पर्धकांना दणाणून सोडण्याची संधी मिळणार आहे. यातही सर्वांना उत्सुकता लागली आहे की आजवरचे हे लिटिल चॅम्प आता मुलांना कसे मार्गदर्शन करणार याची. यामुळे यावेळी सा रे ग म प लिटील चॅम्प मराठी हा कार्यक्रम नेहमीपेक्षा वेगळा असणार यात शंका नाही.

सा रे ग म प च्या प्रवासानंतर आर्या आंबेकर हिने अनेक मालिकांचे शीर्षकगीत, तसेच चित्रपटात गाणे गात आपल्या आवाजाची  जादू प्रेक्षकांवर केली आहे, तर रोहितने अजून काही स्पर्धांमध्ये सहभागी होत आपले नाव मोठे केले.

हे देखील वाचा